महाशिवरात्री का साजरी करतात? शिव उपासनेमागील नेमके शास्त्र काय? पाहा, व्रताचे शुभ-लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 14:30 IST2025-02-13T14:30:33+5:302025-02-13T14:30:59+5:30

Mahashivratri 2025 Vrat Significance In Marathi: संपूर्ण देशभरात महाशिवरात्रीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा महाकुंभमेळ्याची सांगता महाशिवरात्रीला होणार आहे. जाणून घ्या...

maha shivratri 2025 why is mahashivratri celebrated and what is the exact scripture behind shiva worship to get auspicious benefits in marathi | महाशिवरात्री का साजरी करतात? शिव उपासनेमागील नेमके शास्त्र काय? पाहा, व्रताचे शुभ-लाभ!

महाशिवरात्री का साजरी करतात? शिव उपासनेमागील नेमके शास्त्र काय? पाहा, व्रताचे शुभ-लाभ!

Mahashivratri 2025 Vrat Significance In Marathi: फेब्रुवारी महिन्याची सांगता होताना माघ महिन्यातील महत्त्वाचा सण म्हणजे महाशिवरात्री आहे. १४४ वर्षांनंतर आलेला महाकुंभमेळा सुरू आहे. या महाकुंभमेळ्याची सांगता महाशिवरात्रीला होणार आहे. संपूर्ण देशभरात महाशिवरात्रीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी लाखो भाविक महादेवांचे पूजन, उपासना, नामस्मरण, अभिषेक करतात. या दिवशी मंदिरात जाऊन महादेवांचे दर्शन घेणे शुभ मानले जाते. परंतु, महाशिवरात्री का साजरी केली जाते. महाशिवरात्री का साजरी करतात? शिव उपासनेमागील नेमके शास्त्र काय? पाहा, व्रताचे लाभ, फायदे, महात्म्य, महत्त्व आणि काही मान्यता...

महाशिवरात्री हे शिवभक्तांच्या दृष्टीने अत्यंत पवित्र असे एक व्रत आहे. तसे पाहिले तर प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्दशीची रात्र ही शिवरात्र मानली जाते; परंतु माघ वद्य चतुर्दशीची रात्र ही महाशिवरात्र म्हणून विख्यात असून, त्या रात्री शंकराची पूजा केली असता सर्व प्रकारच्या पापांचा नाश होऊन शिवलोकाची प्राप्ती, शिवाशी तादात्म्य, मोक्ष इ. फळे मिळतात, अशी शिवभक्तांची श्रद्धा असते. चतुर्दशी दोन दिवसांत विभागलेली असेल, तर ज्या मध्यरात्री चतुर्दशी येत असेल, ती शिवरात्र मानली जाते. प्रत्येक प्रांतानुसार त्या-त्या ठिकाणी असणाऱ्या पद्धतीनुसार महाशिवरात्र साजरी केली जाते. देशभरात महाशिवरात्र सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.

महाशिवरात्री व्रताचे प्रकार आणि उपासनेचे शास्त्र

महाशिवरात्री व्रताचे दोन प्रकार आहेत– काम्य आणि नैमित्तिक. उपवास, पूजा आणि जागरण ही महाशिवरात्र व्रताची तीन अंगे आहेत. २६ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजून ०८ मिनिटांनी माघ वद्य चतुर्दशी सुरू होत आहे. तर २७ फेब्रुवारी २०२५ रोजी ०८ वाजून ५४ मिनिटांनी चतुर्दशीची सांगता होत आहे. अन्य व्रतांमध्ये पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा आहे. परंतु, महाशिवरात्री व्रतात निशीथकालाला महत्त्व असून, या दिवशी करायचे शिवपूजन प्रदोष काळानंतर रात्री केले जाते. त्यामुळे २६ फेब्रुवारी २०२५ च्या रात्री शिवपूजन करावे, असे सांगितले जात आहे. शिवाच्या पिंडीतून प्रक्षेपित होणारे तेज हे सर्वसामान्य पूजकाला पेलवणारे नसते. त्यामुळे शिवपिंडीचे दर्शन घेताना ते नंदीच्या दोन्ही शिंगातून घ्यावे असे शास्त्र सांगते. पिंडीचे प्रत्यक्ष दर्शन घेताना पिंडी आणि नंदी यांच्यामध्ये उभे न राहता किंवा न बसता, पिंडी अन् नंदी यांना जोडणार्‍या रेषेच्या शेजारी (बाजूला) उभे राहावे, असे सांगितले जाते. 

महादेवाच्या मंदिरात गेल्यावर प्रदक्षिणा घालण्याचे शास्त्र

महाशिवरात्रीच्या दिवशी लाखो भाविक देशभरातील विविध मंदिरात जाऊन शिवदर्शन घेतात. कोणत्याही शिवमंदिरात गेल्यावर अर्धीच प्रदक्षिणा घालावी, असे सांगितले जाते. शिवलिंगाला जोडून जी मर्यादा आखून दिली आहे, तिला शिव निर्माल्य असे म्हणतात. ते ओलांडून जाऊ नये, असे सांगितले जाते. शिवमंदिरात गेल्यावर एका बाजूने प्रदक्षिणा घालण्यास सुरुवात करावी. जेथे शिवतीर्थ किंवा शिव निर्माल्य येते, तेथून माघारी फिरावे आणि पुन्हा देवासमोर यावे. यानंतर दुसऱ्या बाजूने प्रदक्षिणेस सुरुवात करावी. पुन्हा शिवतीर्थ किंवा शिव निर्माल्य येते, तेथपर्यंत जावे आणि परत मागे फिरून देवासमोर यावे. अशा पद्धतीने एक प्रदक्षिणा पूर्ण होते. अनेकदा एका बाजूने गेल्यावर शिवतीर्थ किंवा शिव निर्माल्य येते, तेथे वाट बंद केलेली असते, तेथून मागे फिरल्यानंतर देवासमोर येऊन नमस्कार करून अनेक जण प्रदक्षिणेतून बाहेर पडतात. दुसऱ्या बाजूने पुन्हा शिवतीर्थ किंवा शिव निर्माल्य असते, तेथे जात नाहीत. मात्र, असे केल्यास प्रदक्षिणा अपूर्ण राहते. ती पूर्ण मानली जात नाही. त्यामुळे योग्य पद्धतीने प्रदक्षिणा घालावी, असे सांगितले जाते.

शिवाला बेलपत्र वाहण्याचे शास्त्र

शिवपूजनात बेलपत्र वाहण्याचा अनन्य साधारण असे महत्त्व आहे. तीन पाने असलेले, त्रिगुणाप्रमाणे असलेले, तीन डोळ्यांप्रमाणे असणारे, तीन आयुधे असल्याप्रमाणे असणारे आणि तीन जन्मांची पापे नष्ट करणारे असे हे बिल्वदल मी शंकराला अर्पण करतो, असे म्हणत शिवाला बेल अर्पण करावे, असे सांगितले जाते. बेलाचे पान शिवपिंडीवर उपडे वाहिल्यावर त्यातून निर्गुण स्तरावरील स्पंदने अधिक प्रमाणात प्रक्षेपित होतात. त्यामुळे बेलाच्या पानाचा भाविकाला अधिक लाभ होतो, अशी मान्यता आहे. आयुर्वेदातील कायाकल्पात त्रिदलरससेवनाला महत्त्व दिले आहे. 

महाशिवरात्रीला आवर्जून करा 

- दिवसभर भगवान शिवाचे नामस्मरण करा.

- शिवपिंडीला अभिषेक करा.

- अक्षता, पांढरी फुले, बेल अर्पण करून भगवान शंकराची पूजा करा.

- भगवान शिवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्या.

- सर्व मनोकामना पूर्ण होतील.

- कुमारिकांना मनासारखा वर मिळेल.

- विवाहित स्त्रियांचे सौभाग्य टिकेल, असे शिवाचे आशिर्वचन आहे, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.

॥ हर हर महादेव ॥
 

Web Title: maha shivratri 2025 why is mahashivratri celebrated and what is the exact scripture behind shiva worship to get auspicious benefits in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.