Magh Maas 2025: माघी गणेश जन्म, महाशिवरात्री आणि वसंताचे आगमन; वाचा माघ मासाचे वैशिष्ट्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 07:00 IST2025-01-29T07:00:00+5:302025-01-29T07:00:01+5:30

Magh Maas 2025: ३० जानेवारीपासून माघ मास सुरु होत आहे आणि त्याबरोबरच पौषात थांबलेली लग्नसराईसुद्धा; या मासाची सविस्तर ओळख करून घेऊ!

Magh Maas 2025: Maghi Ganesh birth, Mahashivaratri and the arrival of spring; Read the features of Magh Maas! | Magh Maas 2025: माघी गणेश जन्म, महाशिवरात्री आणि वसंताचे आगमन; वाचा माघ मासाचे वैशिष्ट्य!

Magh Maas 2025: माघी गणेश जन्म, महाशिवरात्री आणि वसंताचे आगमन; वाचा माघ मासाचे वैशिष्ट्य!

या महिन्याच्या पौर्णिमेला अथवा तिच्या आधी किंवा नंतर 'मघा' नक्षत्र येते, म्हणून या मासाला 'माघ' असे नाव प्राप्त झाले आहे. याचे प्राचीन नाव `तप' असे आहे.  या मासातील बहुतेक व्रतांमध्ये पौष मासाप्रमाणे तिळाचा अधिक उपयोग केल जातो. भगवान शिवशंकराची महाशिवरात्री आणि कश्यप अदितीचा पुत्र म्हणून गणपतीने `महोत्कट विनायक' म्हणून ज्या तिथीला अवतार घेतला, ती विनायकी ही गणेशजयंती अशा पिता पुत्राच्या अवतारांनी हा माघ महिना सर्व शिवभक्तांना तसेच गणेशभक्तांना अतिप्रिय आहे.

याशिवाय माघातील शुद्ध सप्तमीला येणारी 'रथसप्तमी' ही सूर्योपासकाां 'पर्वणी' वाटते. तर त्याच्या दुसऱ्या दिवशी येणारी भीमाष्टमी ही भिष्म पितामहांच्या श्राद्धकर्मासाठी आपल्या धर्मधुरिणांनी आग्रहपूर्वक तसेच आदरपूर्वक राखून ठेवल्याने भारतीय संस्कृतीचा एक वेगळा हृदयंगम असा पैलू अखिल जगाला दाखवून देते. कृष्णपक्षातील 'दासनवमी' ही समर्थभक्तांसाठी आणि समर्थ सांप्रदायिकांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. हा नेमक्याच परंतु अतिमहत्त्वाच्या तिथ्यांमुळे माघ महिना आपले वेगळे आणि महत्त्वाचे स्थान दाखवतो. या मासात विशेष कोणती व्रते नाहीत. तरीही त्याचे उत्साहाने स्वागत केले जाते. पौषामुळे साखरपुडा, मुंज, गृहप्रवेश इ. खोळंबलेल्या शुभ कार्यांना माघ मासामुळे पुनश्च चालना मिळते. 

माघ मासात वसंत ऋतूचे आगमन होते. वसंत ऋतू हा समस्त ऋतूंचा राजा. वसंताचे आगमन ही सृष्टीसाठीदेखील एक सुंदर कलाटणी असते. शिशिराची पानगळती संपवून वसंताची चाहूल लागताच कोकीळ कूजन कानावर पडू लागते. झाडावर फुटलेली नवीन पालवी वसंतोत्सवाची वर्दी देते. निष्पर्ण झालेली झाडे इवल्याशा पानांनी साजिरी दिसू लागतात आणि पाहता पाहता निसर्गाचे रूप पालटू लागते. याच काळात रसिकजनांना साहित्य संगीताची मेजवानी मिळावी, म्हणून वसंत व्याख्यानमाला, वसंत संगीत महोत्सव इ. कार्यक्रमांची आखणी केली जाते. दूरदर्शनपूर्वीच्या काळात  असे कार्यक्रम लोकांचे मनोरंजन आणि प्रबोधन करत असत. आजच्या मोबाईलयुगात या कार्यक्रमांचे स्वरूप पालटले असले, तरीही सातत्य कायम आह़े. 

माघ मासात दानाला अतिशय महत्त्व आहे. येनकेनप्रकारेण आपल्या हातून पुण्य घडावे, हा त्यामागील आशय आहे. आपल्या उत्पन्नाचा दहावा भाग समाजासाठी, देशासाठी खर्च व्हावा. कारण आपण जसे समाजाकडून घेत असतो, तसे आपण समाजाचे देणेही लागतो. व्रत वैकल्याच्या निमित्ताने ही छोटीशी परतफेड करावी, हा आपल्या संस्कृतीने आपल्यावर घातलेला संस्कार आहे.

याशिवाय माघ मासातील दिनविशेष आणि सण उत्सवांची महती आणि माहिती वेळोवेळी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूच, तुर्तास एवढेच!

Web Title: Magh Maas 2025: Maghi Ganesh birth, Mahashivaratri and the arrival of spring; Read the features of Magh Maas!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.