Magh Amavasya 2023: माघी अमावस्येला मौनी अमावस्यादेखील म्हटले जाते, या दिवसाचे महत्त्व आणि व्रतविधी जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2023 07:00 IST2023-02-20T07:00:00+5:302023-02-20T07:00:02+5:30
Magh Amavasya 2023: माघी अमावस्या सोमवारी आल्यास ती पुण्यप्रद मानली जाते, या सोमवती अमावस्येच्या निमित्ताने केला जाणारा सहज सोपा व्रत विधी जाणून घ्या!

Magh Amavasya 2023: माघी अमावस्येला मौनी अमावस्यादेखील म्हटले जाते, या दिवसाचे महत्त्व आणि व्रतविधी जाणून घ्या!
यंदा सोमवारी अर्थात २० फेब्रुवारी रोजी माघी अमावस्या आहे. या अमावस्येला रुद्र, अग्नी तसेच ब्राह्मणाची पूजा करण्याची प्रथा आहे. त्यांना उडीद, दही, पुरी असा नैवेद्य दाखवून व्रतकर्त्याने स्वत: या पदार्थांचे एकवेळ सेवन करावे, असे शास्त्रात म्हटले आहे. माघ अमावस्येला सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या चार वारांपैकी एक असेल तर या अमावस्येला व्रताचे फळ सूर्यग्रहणापेक्षा अधिक मानले जाते. यंदा हे व्रत शनिवारी आले आहे. या अमावस्येचा विशेष म्हणजे या तिथीला युगारंभ झाला असे मानतात. युगारंभ अर्थात आपल्या पूर्वजांचा जन्म. म्हणून या दिवशी पितरादिकांचे स्मरण करून अपिंडक श्राद्ध करावे असे म्हटले जाते. अपिंडक श्राद्ध म्हणजे पिंड आणि अन्य विधी न करता केवळ पितरांच्या नावे दान करणे अपेक्षित असते.
हे व्रत तसे सोपे आहे. त्यामुळे करण्यास हरक नाही. मात्र, शास्त्रात म्हटल्याप्रमाणे उडीद, दही असे वेगवेगळे देण्याऐवजी कालानुरुप त्यात बदल करून दहीवडे, श्रीखंडपुरी, पुरीभाजी अशी एकवेळच्या जेवणाची सोय होईल अशा बेताने गरजू व्यक्तीला दान करावे. तुम्हाला दान केल्याचा आणि दान स्वीकारणाऱ्याला भोजनतृप्तीचा आनंद निश्चितच मिळेल.
माघी अमावस्येला मौनी अमावस्या असेही म्हणतात. या दिवशी मौनाने प्रयागक्षेत्री त्रिवेणीसंगमात स्नान करणे ही माघस्नानाची पर्वणी मानली जाते. ही तिथी सोमवारी आली तर ती या स्नानासाठी अधिक पुण्यप्रद समजतात.
आयुष्यात एखाद्या वेळी तरी या व्रताच्या निमित्ताने प्रयागक्षेत्री जाऊन पर्यटनाचा आनंद घ्यायला हरकत नाही. प्रयागक्षेत्री दरवर्षी जाणे शक्य नाही. त्याऐवजी शुचिर्भूत होऊन आपल्या राहत्या ठिकाणी आसपासच्या नदी समुद्रावर जाऊन निदान हात पाय धुवून अर्घ्य द्याव़े शेवटी काय, तर आपले सर्व सण, वार, उत्सव, तिथी आपल्याला निसर्गाशी आणि परस्परांशी जोडणारे आहेत. सदर व्रतांचा आधार घेत देव, देश, धर्म आणि समाजकार्यात आपण खारीचा वाटा उचलावा, हाच त्यामागचा मूळ हेतू आहे.