Lunar Eclipse September 2025: चातुर्मास काळ सुरू आहे. यंदा, २०२५ रोजी भाद्रपद पौर्णिमेला खग्रास चंद्रग्रहण लागणार आहे. वास्तविक पाहता चंद्रग्रहण ही खगोलीय घटना आहे. पौर्णिमेच्या दिवशी सूर्याची चंद्राशी प्रतियुती असते चंद्र व सूर्य यांच्या दरम्यान पृथ्वी येते, पृथ्वीची चंद्रावर सावली पडते, तेव्हा चंद्रग्रहण लागते, असे म्हटले जाते. रविवार, ०७ सप्टेंबर २०२५ रोजी खग्रास चंद्रग्रहण आहे. भाद्रपद पौर्णिमेचे चंद्रग्रहण शनिचे स्वामित्व असलेल्या कुंभ राशीत लागणार आहे.
चंद्रग्रहणाचे विविध प्रकार सांगितले जातात. सूर्य-चंद्राची युती किंवा प्रतियुती राहू किंवा केतू या बिंदूजवळ होईल तेव्हाच ग्रहणे होतात. म्हणजेच सूर्य अमावास्येला अगर चंद्र पौर्णिमेला राहुच्या किंवा केतुच्या जवळच असावा लागतो. प्रत्येक अमावास्या आणि पौर्णिमेला ग्रहण लागत नाही. भाद्रपद पौर्णिमेला चंद्र ग्रह कुंभ राशीत आहे. याच राशीत राहु आहे. तर समसप्तक स्थानी सिंह राशीत सूर्य, केतु आणि बुध आहेत. बुधादित्य राजयोगात २०२५ मधील खग्रास चंद्रग्रहण लागणार आहे.
खग्रास चंद्रग्रहण म्हणजे काय?
खग्रास चंद्रग्रहण म्हणजे असे चंद्रग्रहण ज्यामध्ये पृथ्वीच्या पूर्ण सावलीमुळे चंद्र पूर्णपणे झाकला जातो आणि चंद्र काही काळासाठी गडद रंगाचा किंवा लालसर दिसतो. जेव्हा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत येतात आणि चंद्र पृथ्वीच्या गडद सावलीतून जातो, तेव्हा खग्रास चंद्रग्रहण होते. खग्रास ग्रहणात पृथ्वीच्या गडद सावलीत आल्यामुळे चंद्र खरे तर गडप व्हायला हवा. निदान काळा दिसायला हवा, परंतु तसे होत नाही. पृथ्वीने सूर्यकिरण अडवले तरी पृथ्वी भोवतालच्या वातावरणात शिरणारे किरण चंद्रापर्यंत पोहोचतात, त्यामुळे चंद्र तांबूस दिसतो. मुख्यत: वातावरणातील बदलांमुळे चंद्र काही वेळा पृथ्वीच्या छायेत असूनही चंद्राला ग्रहण लागले आहे की नाही, हे सहजी कळू नये इतका तो प्रकाशित दिसतो. असे १९ मार्च १८४८ रोजी झालेल्या चंद्रग्रहणात घडले होते. खग्रास चंद्रग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी १ तास ४२ मिनिटे असतो. स्पर्शापासून मोक्षापर्यंत जास्तीत जास्त ३ तास ४८ मिनिटे एवढा काळ जाऊ शकतो. चंद्र पृथ्वीभोवती फिरताना पश्चिमेकडून पूर्वेकडे जात असल्यामुळे, चंद्रग्रहणात चंद्राचा पृथ्वीच्या सावलीतील प्रवेश (स्पर्श) चंद्रबिंबाच्या पूर्व बाजूकडून होतो अर्थात मोक्ष चंद्रबिंबाच्या पश्चिम बाजूस होतो. लागोपाठच्या अमावास्येला सूर्यग्रहण होऊ शकते, परंतु लागोपाठच्या पौर्णिमांना चंद्रग्रहण होऊ शकत नाही.
२०२५ मधील खग्रास चंद्रग्रहण कधी लागणार?
२०२५ मधील भाद्रपद पौर्णिमेला लागणारे चंद्रग्रहण संपूर्ण भारतात दिसणार आहे. ०७ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ०९ वाजून ५७ मिनिटांनी खग्रास चंद्रग्रहणाचा स्पर्श असून, मध्यरात्री ०१ वाजून २७ मिनिटांनी खग्रास चंद्रग्रहणाचा मोक्ष आहे. खग्रास चंद्रग्रहणाचा पर्वकाळ ०३.३० तास आहे. ०७ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजून ३७ मिनिटांपासून ग्रहण मोक्षापर्यंत वेध पाळावेत, असे सांगितले जात आहे.