प्रेम सप्ताह सुरू झाला, तुमचेही प्रेम दीर्घकाळ टिकावे वाटत असेल तर 'ही' महत्त्वाची अट मान्य करा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 16:56 IST2022-02-07T16:56:13+5:302022-02-07T16:56:45+5:30
प्रेम केवळ सप्ताहापुरते मर्यादित नको, ते आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत टिकवता आले पाहिजे!

प्रेम सप्ताह सुरू झाला, तुमचेही प्रेम दीर्घकाळ टिकावे वाटत असेल तर 'ही' महत्त्वाची अट मान्य करा!
भय नाहीसे करण्याचा उपाय म्हणजे लोकांवर विनाअट प्रेम करा. तुमच्या मनात जर काही अटी असतील, तर तुम्ही कधीच प्रेम करू शकणार नाही. त्या अटीच तुमच्या मार्गातील अडथळे बनतील. प्रेम करण्याचा लाभ तुम्हाला स्वत:ला होत असतो. मग अटी कशासाठी हव्यात? प्रेम तुम्हाला इतका लाभ करून देते, इतक्या आशीर्वादाचा वर्षाव करते की त्या प्रेमाच्या बदल्यात तुम्हाला काहीच मागण्याची गरज उरत नाही. म्हणून विनाअट प्रेम करा. तुम्हाला लक्षात आले, की प्रेम करण्यानेच निर्भयता विकसित होऊ शकते, म्हणजे तुम्ही स्वाभाविकपणे प्रेम कराल. मग तुम्ही प्रेमाच्या आनंदासाठी प्रेम कराल.
सर्वसामान्यपणे आपल्या अटी पुऱ्या झाल्या की लोक प्रेम करतात. लोक म्हणतात, तू असा वागलास तर मी तुझ्यावर प्रेम करेन. या अटींमध्ये प्रेम गुदमरून जाते. प्रेम म्हणजे अनंत आकाश आहे. त्याला तुम्ही अटींच्या सीमित, संकुचित अंगणात कसे उतरवू शकाल? तुम्ही घरात तजी हवा घेऊन या. मग घर कडेकोट बंद करून टाका. लवकरच ती हवा नासायला लागेल. प्रेम स्वतंत्र आहे, त्याला घराच्या भिंतीत कोंडून ठेवू नका.
तुम्ही प्रेमात पडता, तेव्हा सारे काही सुंदर वाटते. कारण त्या घडीला तुमच्या मनात कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा नसते. कोणत्याही अटी नसतात. दोन माणसं काहीही अपेक्षेविना एकमेकांच्या जवळ आलेली असतात. पण एकदा ते एकत्र राहायला लागले, अनोळखीपण संपले की अटी थोपवायला सुरुवात होते. अशा वेळी तुम्ही प्रेमाचा सौदा करता.
प्रेम करणे हेच प्रेमाचे साध्य असले पाहिजे. तिथे कसलीही अपेक्षा नसेल, तरच प्रेमाचा निर्भेळ आनंद घेताही येईल आणि देताही येईल.