भगवान बुद्धांनी सांगितला, सतत आनंदी राहण्याचा मार्ग; कोणता? तो तुम्हीही जाणून घ्या!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: February 25, 2021 08:00 AM2021-02-25T08:00:00+5:302021-02-25T08:00:22+5:30

त्रासाच्या क्षणांमध्ये सुखाचे क्षण लोप पावत जातात. आयुष्याचा भरभरून आनंद घ्या. जे ओझं त्रास देतं, ते काढून टाका. प्रवास आपोआप सोपा होत जाईल.

Lord Buddha said, the way to be constantly happy; Which one Let him know you too! | भगवान बुद्धांनी सांगितला, सतत आनंदी राहण्याचा मार्ग; कोणता? तो तुम्हीही जाणून घ्या!

भगवान बुद्धांनी सांगितला, सतत आनंदी राहण्याचा मार्ग; कोणता? तो तुम्हीही जाणून घ्या!

googlenewsNext

अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे भगवान बुद्ध आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येकाचे शंका निरसन करत असत. समस्येतून उपाय सांगत असत. त्यांच्याकडे आलेला कोणीही विन्मुख होऊन परतत नसे. त्यामुळे प्रत्येक जण आपल्या दुःखाची उकल करण्यासाठी भगवान बुध्दांकडे येत असे. 

एक दिवस एक व्यक्ती एक प्रश्न घेऊन भगवान बुद्धांच्या भेटीस आली. भगवान बुद्धांच्या नुसत्या दर्शनाने त्या व्यक्तीचे मन शांत झाले. ही मनःशांती सातत्याने अनुभवता यावी, म्हणून त्या व्यक्तीने भगवान बुद्धांना प्रश्न विचारला, 'भगवान, आम्ही संसारी माणसं छोट्या छोट्या गोष्टींनी त्रासून जातो. आम्हाला तुमच्यासारखं कायम आनंदी, कायम सुखी कसं बरं राहता येईल? कृपया मार्गदर्शन करा.' 

भगवान किंचित हसले. ते म्हणाले, 'यावर उपाय तुला आज नाही, उद्या देतो. उद्या सकाळी मी प्रभात फेरीसाठी जंगलात जाणार आहे, तेव्हा तू सुद्धा माझ्याबरोबर ये!'

त्या व्यक्तीला वाटले, उचित जागी, उचित वेळी भगवान आपल्याला काहीतरी मंत्र सांगणार असावेत. त्याने होकार दिला आणि तो आनंदाने परतला. 

दुसऱ्या दिवशी सकाळी ठरलेल्या वेळी भगवान फेरफटका मारायला निघाले. तेव्हा ती व्यक्ती वेळेआधीच हजर झाली आणि भगवान बुद्धांबरोबर चालू लागली. भगवान शांतपणे चालत होते. व्यक्तीच्या मनात चलबिचल सुरू होती. भगवान तो मंत्र कधी देतील याची त्याला उत्सुकता लागली होती. तेव्हा भगवान बुद्धांनी वाटेत पडलेला एक जड दगड उचलला आणि काही न बोलता त्या व्यक्तीच्या हाती दिला. त्यानेही तो निमूटपणे हातात घेतला. दोघे चालत राहिले. ठराविक अंतर कापून परतीच्या मार्गाला लागले. तरीही भगवान काहीच बोलेना. त्याची चिडचिड होऊ लागली आणि दगड हातात धरून हात प्रचंड दुखू लागला. त्याच संयम संपला. तो म्हणाला, 'भगवान, हे ओझं आणखीन उचलवत नाही. हा दगड आता खाली ठेवून देऊ का?'

भगवान हसून म्हणाले, 'अरे, तू हातात दगड घेऊन चालतोय हे मी केव्हाच विसरलो. तुला त्या दगडाचं ओझं होत होतं, तर कधीच टाकून द्यायचंस नाही का? माझ्या सांगण्याची काय वाट बघत बसलास?' 

'पण भगवान, तुमच्या आज्ञेशिवाय मी खाली कसा ठेवणार होतो?' असे म्हणत तो मनुष्य हतबल झाला. 

भगवान म्हणाले, 'अरे पण यामुळे वेदना तर तुलाच सहन कराव्या लागल्या ना? हेच तुझ्या प्रश्नाच उत्तर आहे. आपण आयुष्यभर अनेक विषयांचं ओझं अकारण वाहत राहतो. त्याचा त्रास आपल्यालाच होतो. आपल्याला होणाऱ्या त्रासाची दुसऱ्याला कल्पनाही नसते. त्याच्या सांगण्याची वाट पाहत न बसता, हे ओझं लवकरात लवकर टाकून देण्याची कला आत्मसात कर. मग बघ, आयुष्यभर सुखी होशील आणि आनंदीही!'

एखाद्याच्या बोलण्याचा, वागण्याचा आपण इतका त्रास करून घेतो, मनाला लावून घेतो, परंतु ज्याच्यामुळे आपल्याला त्रास झाला, त्याच्या हे गावीही नसतं. मग आपण तरी त्रास का करून घ्यायचा? कोणाकोणाचा त्रास करून घ्यायचा? त्रासाच्या क्षणांमध्ये सुखाचे क्षण लोप पावत जातात. आयुष्याचा भरभरून आनंद घ्या. जे ओझं त्रास देतं, ते काढून टाका. प्रवास आपोआप सोपा होत जाईल.  

Web Title: Lord Buddha said, the way to be constantly happy; Which one Let him know you too!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.