वैशाखाच्या रणरणत्या उन्हात गारवा देणारे सण आणि उत्सवाचे क्षण कोणते ते जाणून घेऊया!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 07:05 IST2025-04-28T07:00:00+5:302025-04-28T07:05:02+5:30

२८ एप्रिलपासून वैशाख मास सुरू होत आहे, या महिन्यात येणारे सण, उत्सव आणि महत्त्वाचे प्रसंग यांची माहिती करून घेऊया.

Let's find out what are the festivals and festive moments that will bring a refreshing breeze in the scorching sun of Vaishakh! | वैशाखाच्या रणरणत्या उन्हात गारवा देणारे सण आणि उत्सवाचे क्षण कोणते ते जाणून घेऊया!

वैशाखाच्या रणरणत्या उन्हात गारवा देणारे सण आणि उत्सवाचे क्षण कोणते ते जाणून घेऊया!

हिंदु पंचांगानुसार चांद्रवर्षाचा हा दुसरा महिना. २८ एप्रिल रोजी वैशाख सुरू होत आहे. 'धर्मबोध' या ग्रंथात ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांनी वैशाखाचे सुंदर वर्णन केले आहे. या महिन्याची पौर्णिमा विशाखा नक्षत्राने युक्त असते अथवा विशाखा नक्षत्र पौर्णिमेच्या आधी वा नंतर असते, म्हणून या महिन्याला `वैशाख' असे म्हणतात. या मासातही उत्तरायण असते. या मासाचे प्राचीन काळातील प्रचलित नाव `माधव' असे आहे. ज्ञानदेवांनी ज्ञोश्वरीत या `माधव' चा उल्लेख `माधवी' असा केला आहे. 

'ना तरि उद्यानी माधवी घडे। ते वनशोभेची खाणि उघडे।'

अर्थात जसा वसंतऋतूच्या आगमनाने उपवनात सर्व वृक्षवल्लींना बहर येतो, वनश्रीचे भांडार उघडते, चैत्राप्रमाणेच हा महिनादेखील वसंतऋतूचा मास म्हणून ओळखला जातो. प्रसन्नतेचे शितल शिंपण करणारा हा ऋतू! अण्णासाहेब किर्लोस्करांच्या `सौभद्र या सदाबहार नाटकातील-

वैशाखमासि वासंतिक समय शोभला,
आम्रासव पिउनि गान करिती कोकिला।

या गीतातून या प्रसन्नतेचे यथार्थ वर्णन आले आहे. निसर्गातील प्रसन्नता मनाला प्रसन्न करते. ही प्रसन्नता अधिकाअधिक वृद्धित करण्याचे महन्मंगलकार्य धर्म करत असतो. याचे सुंदर उदाहरण म्हणून वैशाख मासातील धर्मकृत्यांकडे पाहता येईल. यावेळी उन्हाळ्याची प्रखरता जाणवू लागलेली असते. अशावेळी पाण्याशी संबंधित अशी व्रतवैकल्ये या महिन्यात येजलेली दिसतात.

प्रात:स्नानासाठी प्रशस्त मानल्या गेलेल्या महिन्यांमध्ये हा महिना येता़े . गाईची नित्यपूजाही या महिन्यात केली जाते. वैशाख हा जेव्हा अधिक महिना असतो, त्यावेळी या अधिक महिन्यात काम्यकर्म समाप्तीचा निषेध सांगितलेला आहे. म्हणजे कुठल्याही काम्यव्रताची सांगता या अधिकमासात करू नये. मात्र अधिक वैशाखमास आणि निज वैशाखमास या दोन्हीमध्ये प्रात:स्नान करण्याची प्रथा आहे.

शिखांचे गुरु गोविंदसिंग यांनी वैशाख शुक्ल प्रतिपदेला `खालसा' ची स्थापना केली. त्यामुळे या दिवशी पंजाब राज्यामध्ये `वैशाखी' चा उत्सव अतिशय उत्साहात साजरा केला जातो.

वैशाख शुक्ल सप्तीला गंगा जन्हुच्या कानातून बाहेर पडली म्हणून हा दिवस 'गंगासप्तमी' नावाने ओळखला जातो. बंगालमध्ये वैशाख शुक्ल नवमीला 'सीता नवमी' म्हणतात. कारण जनकाला भूमी नांगरताना या दिवशी सीता सापडली, असे मानले जाते. त्याची आठवण म्हणून या दिवशी शेतकऱ्यांना मदत करण्याची प्रथा आहे. प्रभू रामचंद्रांचा जन्म चैत्र शुक्ल नवमीचा तर सीतामाईचा वैशाख शुक्ल नवमीचा. स्त्री-पुरुष समानता आपल्या पूर्वजांनाही मान्य होती, त्याचेच हे सुंदर उदाहरण! आद्यशंकराचार्यांच्या जयंतीमुळे वैशाखाची दशमी तिथी परमपवित्र ठरली आहे. तर वैशाख पौर्णिमेला `बुद्धजयंती' असते. वैशाख पौर्णिमेला वेद प्रकटले अशी आपली श्रद्धा आहे म्हणून या दिवशी अनेक मंडळी वेदांची पूजा करतात. बंगाली स्त्रिया वैशाख मासात अश्वत्थवृक्षाची म्हणजेच पिंपळाची पूजा करतात. सुख शांतीसाठी केल्या जाणाऱ्या या व्रताला `अश्वत्थपट व्रत' म्हणतात. 

रखरखत्या उन्हाळ्यात प्रसन्नतेचे शिंपण करणारा असा हा वैशाख मास २८ एप्रिलपासून सुरू होत आहे. 

Web Title: Let's find out what are the festivals and festive moments that will bring a refreshing breeze in the scorching sun of Vaishakh!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.