रामललाचे ‘बाला’जी रुप! श्रीरामचंद्रांमध्ये दिसले तिरुपती भगवान? पाहा, अजब योगायोग, महात्म्य

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 09:14 AM2024-01-24T09:14:16+5:302024-01-24T09:16:03+5:30

Ayodhya Ram Mandir: अयोध्येतील श्रीराम हे काही जणांना दक्षिणेतील तिरुपती बालाजी स्वरुपात भासले, असे म्हटले जात आहे. जाणून घ्या...

know about significance of ayodhya ram mandir ram lala and tirupati balaji | रामललाचे ‘बाला’जी रुप! श्रीरामचंद्रांमध्ये दिसले तिरुपती भगवान? पाहा, अजब योगायोग, महात्म्य

रामललाचे ‘बाला’जी रुप! श्रीरामचंद्रांमध्ये दिसले तिरुपती भगवान? पाहा, अजब योगायोग, महात्म्य

Ayodhya Ram Mandir: रामनामाचा गजर, ५० वाद्यांचा निनादणारा मंगलध्वनी, पुरोहितांचे भारावून टाकणारे वैदिक मंत्रोच्चार अशा मंत्रमुग्ध करणाऱ्या वातावरणात रामललांच्या मूर्तीची अयोध्येतील राम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा झाली. संपूर्ण देशभरात जय श्रीरामचा जयघोष गुंजला. या सुवर्णक्षणाची भारतासह अवघे जग उत्सुकतेने वाट पाहत होते. राम मंदिर दर्शनासाठी खुले झाल्यानंतर पहिल्याच दिवशी ५ लाख भाविकांनी रामदर्शन घेतले. मात्र, श्रीरामांचे सर्वप्रथम दर्शन झाल्यानंतर अनेकांना राम विविध रुपात दिसले. यापैकी काही जणांना श्रीराम हे दक्षिणेतील तिरुपती बालाजी स्वरुपात भासले, असे म्हटले जात आहे. 

तिरुपती बालाजी मंदिर देशातील प्राचीन मंदिरांपैकी एक असून, जगभरातील सर्वांत श्रीमंत देवस्थानांपैकी एक आहे. हे भारतातील सर्वांत वैभवशाली असलेले देवस्थान अतिशय निसर्गरम्य स्थानी वसलेले आहे. तिकडे गेल्यानंतर भक्तांचा ‘गोविंदा हरी गोविंदा, वेंकटरमणा गोविंदा’ हा जप ऐकून, देवाची भव्य दिव्य आणि सुंदर मूर्ती बघून प्रत्येकाला प्रसन्न वाटते. देवाचे शांत रूप पाहून आपलेही मन शांत होते. हे तीर्थक्षेत्र स्वयंभू विष्णू क्षेत्रांपैकी एक आणि १०६ वे म्हणजेच पृथ्वीवरील शेवटचे ‘दिव्य देसम’ मानले जाते. रोज जवळजवळ ५० हजार भाविक येथे दर्शनासाठी येतात आणि भरपूर देणगी देतात. दर वर्षी जो ब्रह्मोस्तव साजरा केला जातो, त्यावेळी देवाच्या दर्शनाचा लाभ घ्यायला जवळजवळ ५ लाख भाविक येतात, असे सांगितले जाते.

श्रीरामांच्या मूर्तीसाठी नेमका कृष्णशिळेचाच वापर का?

प्रभू श्रीराम अखेर अयोध्येतील श्रीराम मंदिरात विराजमान झाले. श्रीरामांची संपूर्णपणे सजविण्यात आलेली मूर्ती पाहताक्षणी मन मोहून जाते. ही मूर्ती कर्नाटकचे शिल्पकार अरुण योगीराज यांनी घडविली आहे. या मूर्तीसाठी काळ्या किंवा श्यामल रंगाच्या कृष्णशिळा पाषाणाचा वापर करण्यात आला आहे. म्हैसूर व जवळच्या भागात अशा प्रकारचे पाषाण विपुल प्रमाणात आढळतात. वाल्मीकी रामायणात बालरूपी श्रीराम हे श्यामवर्णी, कोमल, सुंदर आणि आकर्षक असल्याचा उल्लेख आहे. म्हणूनच मूर्तीसाठी श्यामल रंगाचा पाषाण वापरला. पाषाणाला हजारो वर्षे काहीही होत नाही. अभिषेक व पूजेदरम्यान जल, चंदन, दूध इत्यादींचा वापर केला जातो. यांचा पाषाणावर परिणाम होणार नाही व मूर्तीचेही नुकसान होणार नाही. या पाषणाची रचना मऊ असते. मात्र, २-३ वर्षांच्या कालावधीत पाषाण अतिशय कठीण होतो. रामलला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली, त्यावेळी जी फुलांची आकर्षक आरास केली होती, ती अगदी दक्षिण भारतातील पद्धतीने विशेष करून तिरुपती बालाजी देवाला करतात, तशीच भासली.

कशी आहे रामलल्लांची नवी मूर्ती?

रामलल्लांच्या देखण्या मूर्तीने सर्वांच्याच डोळ्याचे पारणे फिटले. भाळी तिलक असलेल्या आणि दागिने व भरजरी वस्त्रांनी नटलेल्या आणि अतिशय सौम्य भावमुद्रेतील रामलल्लांच्या मूर्तीचे सौंदर्य मोहित करणारे असेच आहे.  कमळाच्या फुलावर विराजमान रामलल्लांची मूर्ती आहे. मूर्तीभोवती आभामंडळ असून मूर्तीवर स्वस्तिक, ओम, चक्र, गदा आणि सूर्यदेव कोरलेली आहेत. देखणे आणि तितकेच विलोभनीय डोळे सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. उजवा हात आशीर्वादाच्या मुद्रेत, तर डाव्या हातात धनुष्यबाण आहे. मूर्तीच्या खाली एका बाजूला हनुमान आणि दुसऱ्या बाजूला गरुड कोरलेले आहेत. मूर्तीवर सुमारे पाच किलोचे रत्नजडित मुकुट असून त्यावर वेगवेगळी रत्न मढवलेली आहे. मूर्तीवरील दागिने रत्न, माणिक, मोती व हिऱ्यांपासून तयार केले आहेत. 

तिरुपती बालाजीच्या मूर्तीची वैशिष्ट्ये

तिरुपती बालाजीची मूर्ती विशिष्ट प्रकारच्या गुळगुळीत दगडापासून बनलेली असली तरी ती पूर्णपणे सजीव भासते. मंदिराचे वातावरण अतिशय थंड असूनही, तिरुपती बालाजीच्या अंगावर घामाचे थेंब दिसतात. देवाची पाठ ओलसर राहते. बालाजीच्या मूर्तीवर विशेष प्रकारचा पचई कापूर लावला जातो. बालाजीच्या गाभाऱ्यात गेल्यावर गाभाऱ्याच्या मध्यभागी मूर्ती असल्याचे दिसून येते. पण, गाभाऱ्यातून बाहेर पडल्यावर तुम्हाला मूर्ती उजव्या बाजूला असल्याचे जाणवते. मंदिरातील भगवान व्यंकटेश्वर स्वामींच्या मूर्तीवरील केस खरे असल्याची मान्यता आहे. त्यांचा कधीही गुंता होत नाही; ते नेहमी मऊसुद राहतात. येथे स्वतः देवाचा वास असल्यामुळे असे होते, असे सांगितले जाते.

दरम्यान, तिरुपती बालाजी आणि अयोध्येतील श्रीराम यांना तिलक लावण्याची पद्धतही काहीशी सारखी असल्याचे म्हटले जाते. २२ जानेवारी २०२४ रोजी पौष शुक्ल द्वादशीला दुपारी ठीक १२ वाजून २९ मिनिटे व ८ सेकंद ते १२ वाजून ३० मिनिटे व ३२ सेकंदांपर्यंतच्या अभिजित शुभमुहूर्तावर रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. गेल्या ५०० वर्षांपासून राम मंदिरासाठी लढा, संघर्ष सुरू होता. अनेक कारसेवकांनी जीवनातील कित्येक वर्षे या लढ्यासाठी खर्ची घातली. अखेरीस राम मंदिराचा संकल्प सत्यात उतरला.  
 

Web Title: know about significance of ayodhya ram mandir ram lala and tirupati balaji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.