सद्गुरुसी शरण जाय, त्यासी ब्रह्मप्राप्ती होय!'

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: October 29, 2020 07:30 AM2020-10-29T07:30:00+5:302020-10-29T07:30:02+5:30

चांगल्या गोष्टी आत्मसात करणे, ही जर साधकाची वृत्ती असेल, तर त्याला पावलोपावली गुरु भेटतील.

Keep your faith in Sadguru! | सद्गुरुसी शरण जाय, त्यासी ब्रह्मप्राप्ती होय!'

सद्गुरुसी शरण जाय, त्यासी ब्रह्मप्राप्ती होय!'

googlenewsNext

ज्योत्स्ना गाडगीळ 

जो ज्ञान देतो, तो गुरु. ते ज्ञान व्यावहारिक असेल, पारमार्थिक असेल, प्रापंचिक असेल, नाहीतर अन्य कोणतेही असेल. चांगल्या गोष्टी आत्मसात करणे, ही जर साधकाची वृत्ती असेल, तर त्याला पावलोपावली गुरु भेटतील. मात्र, जो स्वत:च्या अभिमानापुढे इतरांना तुच्छ लेखतो, त्याला गुरुंची प्राप्ती कधीच होऊ शकत नाही. नम्र होणे, हा गुरुप्राप्तीचा कानमंत्र आहे. 

असेच एक महान तपस्वी चांगदेव, योगमार्गातील अधिकारी पुरुष होते. योगसामर्थ्याने ते चौदाशे वर्षे जगले अशी मान्यता आहे. त्यांच्या गुरूचे नाव वटेश्वर, म्हणून यांना चांगावटेश्वर असेही म्हणतात. काहींच्या मते वटेश्वर म्हणजे चांगदेवांच्या अंतरंगात प्रकाशणारे ईश्वराचे रूप. तापी-पूर्णा नदीच्या तीरावर गावाजवळच्या वनात, चांगदेव डोळे बंद करून तपश्चर्या करीत  योगी झाले होते. त्यांच्या चांगल्या रूपावरून लोक त्यांना चांगदेव म्हणू लागले. त्यांचे योगसामथ्र्य पाहून त्यांचा भला मोठा शिष्य परिवार तयार झाला होता. 

हेही वाचा : मी मेल्याशिवाय देव दिसणार नाही- रामकृष्ण परमहंस!

एकदा तीर्थाटन करत असताना त्‍यांच्या कानावर संत ज्ञानेश्वराची कीर्ती पडली आणि त्यांना ज्ञानेश्वरांच्या भेटीची उत्कंठा लागली. ते ज्ञानेश्वरांच्या भेटीसाठी निघाले. आपले योगसामथ्र्य आणि शिष्य परिवार दाखवावा, या हेतून त्यांनी लवाजमाही सोबत घेतला. मात्र, आपणहून एवढ्याशा पोराची भेट काय घ्यायची, त्यापेक्षा त्याला आपल्या येण्याची वर्दी देऊ, म्हणजे तो आपणहून भेटायला येईल आणि आपला मान वाढेल, या विचाराने चांगदेवांनी ज्ञानेश्वरांना पत्र पाठवायचे ठरवले.

त्यांनी पत्र लिहायला घेतले, पण मायना काय लिहावा या संभ्रमात पडले. आदरणीय म्हणावे, तर आपला मान कमी होतो, चिरंजीव म्हणावे तर त्यांचा अपमान होतो. अशा द्वंद्वात असताना त्यांनी कोरेच पत्र पाठविले. ते पत्र ज्ञानेश्वरांकडे येऊन पोहोचले. पत्रावर काहीच मजकूर नाही, असे ज्ञानेश्वरांनी म्हटल्यावर मुक्ताईने पत्र हाती घेतले. पत्राच्या दोन्ही बाजू नीट पाहिल्या आणि हसून म्हणाली, 'एवढा मोठा चांगदेव, पण कोरा रे, कोराच राहिला!' मुक्ताईच्या बोलण्यात व्यावहार ज्ञानाबद्दल 'कोरा' असा उल्लेख नसून पारमार्थिक ज्ञानाबद्दल होता. 

योगी असूनही चांगदेवांमध्ये आत्मज्ञानाची आणि गुरुकृपेची कमतरता आहे, असे निवृत्तीनाथांच्या लक्षात आले. त्यांनी ज्ञानेश्वरांना पत्राचे उत्तर लिहिण्यास सांगितले. त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी जे उत्तर लिहिले, ते `चांगदेव पासष्टी' या नावाने प्रसिद्ध झाले. हे पत्र देण्यासाठी आणि चांगदेवांची भेट घेण्यासाठी चारही भावंडे बसल्या भिंतीला गती देत निघाली. आकाशमार्गे ही अनोखी स्वारी येताना पाहिली आणि अचल भिंतीला ज्ञानेश्वरांनी चैतन्य दिले, हे पाहून, त्यांच्याठायी असलेली सिद्धी ओळखून चांगदेवांनी शरणागती पत्करली. चांगदेव, निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, मुक्ताबाई व सोपान यांची भेट झाली. 

चांगदेवांनी ज्ञानेश्वरांच्या चमत्कारासमोर नमस्कार केला नाही, तर निर्जीव वस्तुंना चैतन्य देण्याचे आणि रेड्यासाख्या जडमती असलेल्या लोकांकडून वेद वदवून घेण्याचे ज्ञानेश्वरांचे सामर्थ्य त्यांनी ओळखले. अहंकार दूर झाला आणि तिथल्या तिथे त्यांनी माऊलींना गुरु केले. त्यांच्या आध्यात्मिक कोऱ्या पाटीचा श्रीगणेशा मुक्ताईने केला, म्हणून चांगदेवांनी मुक्ताईला गुरू मानले. संत सहवासाने चांगदेवांचा उद्धार झाला, तसा आपलाही उद्धार व्हावा असे वाटत असेल, तर आपणही अहंकार दूर सारून सद्गुरुंना शरण गेले पाहिजे.

हेही वाचा : सुखी माणसाचा सदरा मिळेल का? 

Web Title: Keep your faith in Sadguru!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.