Kabir Jayanti 2025: संत कबीर यांनी दोहे रचून केले समाजाला प्रबोधन, आजही मार्मिक शिकवण महत्त्वाची!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 07:05 IST2025-06-11T07:00:00+5:302025-06-11T07:05:01+5:30
Kabir Jayanti 2025: आज संत कबीर यांची जयंती, त्यांची व्यक्तीगत माहिती विशेष उपलब्ध नाही, परंतु त्यांचे साहित्य अजरामर आहे; त्यातलेच एक उदाहरण वानगीदाखल...

Kabir Jayanti 2025: संत कबीर यांनी दोहे रचून केले समाजाला प्रबोधन, आजही मार्मिक शिकवण महत्त्वाची!
माणसांत आणि प्राण्यांमध्ये मुख्य फरक काय आहे माहितीये का? माणूस अत्यंत स्वार्थी आहे आणि प्राणी परोपकारी! ते स्वतःचाच नाही तर दुसऱ्यांचाही विचार करतात. माझं ते माझं आणि तुझं तेही माझं, अशी मानवाची भूमिका असते. अशा माणसांच्या सान्निध्यात राहून कधी कधी प्राण्यांनाही वाण नाही पण गुण लागतो. मनुष्याच्या स्वार्थी स्वभावाला आळा घालण्यासाठी संत कबीरांनी एका रूपक कथेचा आधार घेत मार्मिक वर्णन केले आहे. आज कबीर जयंती, त्यानिमित्त ही मार्मिक कथा!
ही रूपक कथा आहे मुंगीची. मुंगीचा गुणधर्म असा, की ती कितीही घाईत का असेना, समोरून दुसरी मुंगी येताना दिसली, की थोडीशी का होईना हितगुज करून मगच पुढे जाते. मुंग्या शिस्तप्रिय. कधीही पहा, रांगेने जातात. पण वर म्हटल्याप्रमाणे मनुष्य स्वतःच्या सहवासाने दुसर्यालाही बिघडवण्याची क्षमता बाळगतो.
एक मुंगी, माणसाळलेली, एक दिवस काम उरकून घराच्या दिशेने जात होती. वाटेत तिला तांदुळाचा दाणा दिसला. तिला आनंद झाला. संध्याकाळच्या जेवणाची सोय झाली म्हणत, तिने तो दाणा उचलला आणि चालू लागली. तांदुळाचा दाणा तिच्या वजनाला पेलवणारा नव्हता, तरी ती धीर करून संयत पावले टाकीत तो दाणा उचलून घराच्या दिशेने जात होती.
वाटेत तिला डाळीचा दाणा दिसला. कधी नव्हे ते तिला हाव सुटली. भाताबरोबर डाळीची सोय झाली, म्हणजे घरी गेल्या गेल्या खिचडी केली कि झालं. अशा विचाराने तिने तो डाळीचा दाणा घेतला. पण आता तिला एका वेळी दोन्ही भार पेलत नव्हते. चालता चालता ती मध्येच डाळीचा दाणा ठेवी, तर काही पावलं पुढे गेल्यावर तांदळाचा दाणा ठेवी. तिची दयनीय अवस्था पाहून संत कबीर तिला म्हणाले,
'तू केवढी, तुझा भार केवढा? एवढं नेणं तुला झेपणार तरी आहे का? देवाने तुझ्या पोटाची व्यवस्था म्हणून एक तांदुळाचा दाणा दिला होता, पण तू मोहात पडलीस आणि स्वतःचाच भार वाढवून घेतलास. म्हणून तो भार हलका करण्यासाठी मी काय सांगतो, ते ऐक...
चिटी चावल ले चलै, बीच मे मिल गयी दाल,
कहत कबिरा दोनो ना मिलै, एक ही ले दाल।।
मोहाला बळी पडणाऱ्याचे हाल होतात. म्हणून वेळीच सावध हो. या भार वाहून नेण्यापेक्षा आपली गरज ओळख आणि तेवढंच वाहून ने.
संत कबीरांचा हा बोध केवळ लोभाला बळी पडलेल्या मुंगीसाठी नाही, तर आपल्यासारख्या स्वार्थलोलुप झालेल्या समस्त लोकांसाठी आहे. अति सुखाच्या नादात आपण अनेक चांगल्या गोष्टी गमावून बसतो. म्हणून आपली गरज ओळखा आणि स्वार्थाचा त्याग करा, असे संत कबीर आपल्याला सांगतात.