Jyeshtha Pradosh Shivratri Vrat Puja In Marathi: मृत्युंजयाय रुद्राय नीलकण्ठाय शम्भवे। अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः।। मराठी वर्षातील ज्येष्ठ महिन्याची सांगता होण्यासाठी अवघे काही दिवस राहिले आहेत. यानंतर आषाढ महिना सुरू होणार आहे. अनेकार्थाने आषाढ महिना महत्त्वाचा मानला जातो. जगन्नाथ पुरी रथयात्रेसह चातुर्मासारंभ याच महिन्यात होतो. तत्पूर्वी सोमवार, २३ जून २०२५ रोजी अद्भूत योग जुळून आला आहे. प्रदोष आणि शिवरात्रि व्रत एकाच दिवशी आले आहेत. महादेवांची अखंडित कृपा लाभण्यासाठी ही दोन्ही व्रते अतिशय महत्त्वाची मानली जातात. शिवशंकरांचा शुभाशिर्वाद मिळण्यासाठी हे व्रत कसे करावे? दोन्ही व्रते एकाच दिवशी येण्याचे महात्म्य आणि महत्त्व जाणून घेऊया...
प्रदोष आणि शिवरात्रि या महादेवांना समर्पित असून, या दिवशी केलेले महादेवांचे पूजन पुण्य फलदायी तसेच शुभ लाभदायी मानले गेले आहे. प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या दोन्ही पक्षांत म्हणजेच शुद्ध आणि वद्य त्रयोदशी तिथीला पाळले जाते. हे व्रत भगवान शिवाला समर्पित आहे. प्रदोष व्रत तिथी सोमवारी येते तेव्हा त्याला सोम प्रदोष व्रत म्हणतात. सोम प्रदोषाच्या दिवशी कुंडलीतील चंद्र ग्रह मजबूत होण्यासाठी चंद्रदेवाशी निगडीत गोष्टी अर्पण कराव्यात, दानधर्म करावा, चंद्रदेवाचे मंत्र जपून नामस्मरण करावे, असे म्हटले जाते. तसेच मासिक शिवरात्रि व्रताचरणही याच दिवशी केले जाणार आहे.
ज्येष्ठ सोम प्रदोष व शिवरात्रीला अद्भूत योगांचा शुभ संयोग
ज्येष्ठ महिन्यात प्रदोष आणि मासिक शिवरात्रि ही दोन्ही महादेवांना समर्पित असलेली व्रते एकाच वेळी आली आहे. प्रदोष आणि शिवरात्रि एकाच दिवशी आल्याने या काळातील शिवपूजनाला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाल्याचे सांगितले जात आहे. सोमवार, २३ जून २०२५ रोजी अन्य अनेक अद्भूत योग जुळून येत आहेत. या दिवशी चंद्र आपल्या उच्च राशीत विराजमान असेल. तसेच चंद्र ग्रहाच्या गोचरामुळे अत्यंत शुभ मानला गेलेला उभयचरी योग जुळून येत आहे. कृतिका नक्षत्र आणि धृतिमान योगही आहे. सोमवार हा महादेव शिवशंकरांना समर्पित असल्यामुळे तसेच चंद्राच्या गोचरामुळे सोम प्रदोष आणि शिवरात्रि व्रताचे महत्त्व अनेक पटींनी वाढल्याचे म्हटले जात आहे. या अद्भूत योगांमध्ये शिवपूजन करणे, सोम प्रदोष तसेच शिवरात्रि व्रताचरण करणे शुभ तसेच पुण्य फलदायी मानले गेले आहे.
ज्येष्ठ महिन्यातील सोम प्रदोष व शिवरात्रि व्रत पूजा विधी
प्रदोष व्रतामध्ये त्या दिवसाच्या प्रदोष काळात म्हणजेच तिन्हीसांजेला किंवा दिवेलागणीच्या वेळेला महादेव शिवाची पूजा केली जाते. महादेवांचे पूजन झाल्यानंतर शिव पंचाक्षर मंत्र 'ॐ नमः शिवाय'चा यथाशक्ती जप करणे लाभदायक मानला जाते. शिवरात्रिच्या दिवशी सकाळी शिवमंदिरात जाऊन महादेवांचे दर्शन घ्यावे. शक्य असल्यास रुद्राभिषेक किंवा जलाभिषेक करावा. अनेक भाविक या दिवशी संपूर्ण दिवस उपास करतात. महादेवांची षोडषोपचार पद्धतीने पूजा करावी. बेलपत्र, फुले अर्पण करावीत. धूप, दीप, नैवेद्य दाखवून आरती करावी. मनोभावे प्रसाद ग्रहण करावा. यानंतर महादेवांचे नामस्मरण, स्तोत्र पठण करावे, असे सांगितले जात आहे. शक्य असल्यास या दोन्ही व्रतपूजनात १०८ बिल्वपत्रे महादेवांना अर्पण करावीत.
चंद्र संबंधित उपाय, मंत्रांचे जप लाभदायक
नवग्रहात चंद्र ग्रह हा सर्वांत वेगाने गोचर करणार ग्रह मानला जातो. सोम प्रदोष व्रताच्या दिवशी चंद्र देवाशी निगडीत वस्तू अर्पण कराव्यात. तसेच चंद्र देवाशी निगडीत वस्तूंचे यथाशक्ती दान करावे. चंद्र देवाचा गायत्री मंत्र, प्रभावी मंत्र, नवग्रहातील स्तोत्रातील मंत्र यांचा यथाशक्ती जप करावा. असे केल्याने चंद्र देवाची कृपा आपल्यावर होऊन कुंडलीतील स्थान आणि प्रभाव मजबूत होण्यास मदत होऊ शकते, असे सांगितले जाते.