आजपासून सुरू झाला ज्येष्ठ मास, यंदा वटपौर्णिमा आणि इतर सण कधी? सविस्तर जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 07:05 IST2025-05-28T07:00:00+5:302025-05-28T07:05:01+5:30
२७ मे रोजी ज्येष्ठ प्रतिपदा तिथी सुरू झाली, मात्र सूर्योदयाची तिथी २८ मे असल्याने यंदा २८ मे रोजी ज्येष्ठ मास सुरू झाला असे म्हटले जाईल, त्यात येणारे सण जाणून घ्या.

आजपासून सुरू झाला ज्येष्ठ मास, यंदा वटपौर्णिमा आणि इतर सण कधी? सविस्तर जाणून घ्या!
हिंदूपंचांगानुसार चैत्र- वैशाखादी मासगणनेत हा वर्षाचा तिसरा महिना आहे. या मासाच्या पौर्णिमेला किंवा तिच्या मागे-पुढे ज्येष्ठा नक्षत्र असते. म्हणून या महिन्याला `ज्येष्ठ' असे नाव आहे. ज्येष्ठा नक्षत्राचे वैदिक काळातील दुसरे नाव `ज्येष्ठघ्नी' असे होते. `वृत्र' हा असुर सर्व असुरांमध्ये वयाने ज्येष्ठ होता. 'आम्ही वृत्रासुराला मारू' असा निश्चय देवांनी ज्येष्ठा नक्षत्र असताना केला, म्हणून ते ज्येष्ठघ्नी झाले. कालांतराने त्या नावाचा संक्षेप होऊन `ज्येष्ठा' झाले.
या मासाबद्दल विस्तृत माहिती ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर लिखित धर्मबोध ग्रंथात आढळते. ती अशी- प्राचीन काळी या मासाचे नाव `शुक्र' असे होते. हा मास उत्तरायणात असतो. ग्रीष्मऋतुचा प्रारंभ या मासापासून होतो.
ज्येष्ठ मासात अनेक महत्त्वाची मानली गेलेली व्रत वैकल्ये येतात. विशेष म्हणजे विविध प्रांतांमध्ये ही व्रत वैकल्ये केली जातात. त्यांचे वैविध्य मनोहार आहे. `उमाचतुर्थी' हे व्रत बंगालमधील मुली उत्तम पती मिळावा म्हणून करतात. या दिवशी उमा जन्मली म्हणून तिची कुंदाच्या फुलांनी पूजा केली जाते. सौभाग्यासाठी हे व्रत स्त्रियांप्रमाणे पुरुषही करतात.
या पाठोपाठ येणाऱ्या षष्ठीला `अरण्यषष्ठ' तसेच 'स्कंदषष्ठी' अशा दोन नावांनी संबोधतात. या दिवशी राजस्थानातील स्त्रिया हातातील पंख्याने वारा घेत मनसोक्त फिरतात. उपास असल्यामुळे फळे, कंदमुळे यांचे आस्वाद घेतात. विंध्यवासिनीची पूजा करतात. संतानप्राप्तीसाठी हे व्रत करतात.
ज्येष्ठ शुक्ल दशमीला देशभर गंगादशहरा (Ganga Dussehra 2025)उत्सव साजरा केला जातो. यंदा तो २७ मे रोजी सुरू होणार असून ५ जून रोजी या उत्सवाची समाप्ती होणार आहे. या उत्सवात गंगेची पूजा केली जाते. त्यानंतर येणारी एकादशी निर्जला एकादशी नावाने ओळखली जाते. हे व्रत पाणी न पिता दिवसभर उपास करून पार पाडले जाते. अन्य एकादशींपेक्षा या एकादशीला अधिक महत्त्व असते. ज्येष्ठ द्वादशीला चंपक द्वादशी म्हणतात. गोविंदाला चाफ्याच्या फुलांनी सजवले जाते.
ज्येष्ठ पौर्णिमा हा दिवस आंध्र प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी सणासारखा असतो. त्या दिवशी शेतकरी शेतात प्रथम नांगर चालवतात. आपल्याकडील बैल पोळ्यासारखा हा सण असतो. याच दिवशी बेलाच्या वृक्षाची पूजा केली जाते. महाराष्ट्रात हा सण वटपौर्णिमा(Vat purnima 2025) म्हणून साजरा केला जातो. आपल्याकडे हे व्रत १० जून रोजी केले जाईल. हे व्रत सौभाग्यासाठी असून या दिवशी वट वृक्षाची पूजा केली जाते. बंगालमध्ये हेच व्रत याच दिवशी वडाची पूजा न करता पतीची पूजा करून साजरे केले जाते. पतील चंदनाची उटी आणि हार घालून साजरा करतात. या दिवशी यमदेवाची पूजा करून, फळांचा नैवेद्य दाखवून त्याला वडाची फांदी अर्पण करतात.
दर कोसावर संस्कृती बदलत जाते आणि सणही. परंतु उद्देश निसर्गाचा आणि मानवाचा मेळ घालणे, हाच असल्याने आनंद तसूभरही कमी होत नाही, उलट वाढतच जातो.