शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
2
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
3
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार
4
प्रीमियम लूक, ड्युअल स्क्रीन, ५००किमी रेंज; तयार रहा मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही येतेय!
5
गौरी खानचं 'टोरी' रेस्टॉरंट : ₹१५०० चे मोमोज, ₹११०० चं सॅलड; मॅश बटाट्याची किंमत ऐकून अवाक् व्हाल
6
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहाची तयारी कशी करावी? वाचा तारीख, मुहूर्त, आरती आणि पूजाविधी 
7
रोहित आर्याबाबत मोठा खुलासा! कोथरुडचा घरमालक उलटे १.७५ लाख द्यायला तयार झालेला; शेवटी...
8
मारुतीच्या 'या' SUV नं स्पर्धकांचं टेन्शन वाढवलं, मिळाली 5 स्टार सेफ्टी रेटिंग; ASEAN NCAP क्रॅश टेस्टमध्ये केली कमाल
9
जीएसटी कपात, दसरा अन् दिवाळी; ऑक्टोबरमध्ये पडला 'वाहनांचाही पाऊस'! महिंद्रा, ह्युंदाई, टाटानेच नाही तर स्कोडानेही...
10
दोस्तीतच कुस्ती! ६ महिन्यांपूर्वी लग्न झाले, ५ मिनिटांत घरी पोहोचणार होता; पण रस्त्यातच मित्रांनी संपवले
11
जबरदस्त शक्तीप्रदर्शन होणार...! एकाचवेळी ५५ देश आपल्या युद्धनौका भारताच्या समुद्रात पाठविणार; नौदलाने हुंकार भरला...
12
8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय रे भाऊ? नवीन वेतन कसं ठरणार? जाणून घ्या
13
Retirement: स्टार खेळाडूनं चाहत्यांना दिला मोठा धक्का, अचानक केली निवृत्तीची घोषणा!
14
प्रबोधिनी एकादशी २०२५: देवउठनी एकादशीला विष्णू खरोखरच ४ महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात का?
15
"नरेंद्र मोदींची छाती ११२ इंचाची, अवघ्या ५ तासांत पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केला असता, पण..."
16
पाच वर्षांत अफाट परतावा देणारे शेअर्स कोणते, गुंतवणूकदारांसाठी संकेत काय? तुमच्याकडे आहे का?
17
BCCI: "आणखी दोन-तीन दिवस वाट पाहू, जर ट्रॉफी परत मिळाली नाही तर...", बीसीसीआयची कडवी भूमिका
18
“मविआचे ३१ खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी झाली का”; भाजपाचा सवाल, राज ठाकरेंबद्दल म्हणाले... 
19
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
20
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट

Janmashtami 2023: गोंदवल्यात जाताना वाटेतच गिरवीच्या चमत्कारिक गोपाळकृष्णाला आवर्जून भेट द्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 15:07 IST

Janmashtami 2023: गिरवीचा गोपालकृष्ण मनमोहक तर आहेच पण चमत्कारिकही आहे, कसा ते त्याच्या कथेवरून कळेलच; सविस्तर जाणून घ्या!

साताऱ्याच्या फलटणपासून दक्षिणेला १२ किलोमीटरवर, कदमची गिरवी या गावात गोपाळकृष्णाचे प्राचीन सुंदर मंदिर आहे. तिथली शाळीग्राममध्ये घडवलेली चार फुटाची श्रीकृष्ण मूर्ती हरी हर ऐक्य दर्शवते. मंदिरापर्यंत नेणारी हिरवीगार पाऊलवाट, सभोवतालच्या परिसरातील निरव शांतता आणि श्रीकृष्णाची मोहून टाकणारी मूर्ती तुम्हाला तिथे पुन्हा पुन्हा जाण्यास भाग पाडेल हे नक्की!

गिरवीचे गोपाळकृष्ण मंदिर अध्यात्मिक क्षेत्रातील उपासकांसाठी अतिशय योग्य ठिकाण आहे. तिथे निवासी सोय असल्याने अनेक भाविक तिथे राहतात, सेवा देतात, उपासना करतात आणि भरपूर सकारात्मक ऊर्जा घेऊन जातात. हरी हर ऐक्य दर्शवणारी अखंड शाळिग्राम मूर्ती  मूर्ती कोणी, कशी व कधी घडवली त्याबद्दल जाणून घेऊ. 

या ठिकाणी यशोदा मातेचे काही काळ वास्तव्य असल्याने भगवान श्रीकृष्ण तिथे येत असत, असे सांगितले जाते. तसेच या मंदिराचा इतिहास असा, की ७०० वर्षांपूर्वी गिरवी येथे बाबुराव देशपांडे नावाचे सद्गृहस्थ राहत होते. ते श्रीकृष्णभक्त होते. कृष्णदर्शनाचा त्यांना ध्यास लागला होता. समाधीस्थ अवस्थेत असताना त्यांना साक्षात गोपालकृष्णाने दृष्टांत दिला आणि अमुक एका ठिकाणी शाळीग्राम मिळेल, अशी माहिती मिळाली. बाबुराव महाराजांनी शाळीग्रामचा शोध घेतला आणि खरोखरीच संबंधित जागी उत्खनन केल्यावर त्यांना शाळीग्राम मिळाला, ज्यावर विष्णुची चिन्हे होती. त्यातून गोपाळकृष्णाची साजिरी मूर्ती घडवून घ्यावी, अशी बाबुराव महाराजांची तीव्र इच्छा होती. मात्र, त्यांच्या मनासारखी मूर्ती घडवणारे कारागीर त्यांना मिळत नव्हते. बाबुराव महाराज अस्वस्थ झाले. त्यांनी कृष्णाचा धावा केला. 

काही काळातच 'जय-विजय' नावाचे दोन कारागीर बाबुराव महाराजांना येऊन भेटले. दारात आलेल्या कारागीरांची जोडी अजबच होती. त्यांच्यातला एक थोटा होता, तर दुसरा आंधळा. त्यांनी बाबूराव महाराजांना अपेक्षित असलेली मूर्ती बनवून देण्याचा दावा केला. बाबूराव महाराजांकडे पर्याय नव्हता. त्यांनी होकार दिला. दोघांची शारीरिक अडचण पाहता, ते मूर्ती कशी घडवणार, याबद्दल त्यांना कुतूहल वाटू लागले. त्यांच्या हाती शाळीग्राम सोपवून दिमतीला माणसे ठेवण्यात आली. मात्र, त्या दोघांनी एकांत मागून घेतला आणि एका खोलीत स्वत:ला बंदिस्त करून घेत संपूर्ण लक्ष मूर्तीवर केंद्रित केले. काही काळातच काम पूर्ण करून त्यांनी बाबुराव महाराजांसमोर मूर्ती ठेवली. आपल्या मनातली छबी सगुण साकार झालेली झालेली पाहून ते भावविभोर झाले. 

कुठेही जोड न लावता एकाच पाषाणाची चार फूट उंचीची  मूर्ती. त्यात कृष्ण एका पायावर उभा आहे. दुसऱ्या पायाची आढी घातली आहे.  केवळ पायाच्या अंगठ्यावर तो पाय टेकलेला आहे. यातच त्या मूर्तिकारांचे कौशल्य आहे. मूर्तीची घडण अतिशय रेखीव आहे. चेहऱ्यावर प्रसन्नता आहे. नेत्र विशाल व आकर्षक आहेत. मूर्तीच्या शरीरावरील, गळ्यातील, हातातील, कमरेवरील अलंकार पाषाणातूनच घडविले आहेत. दोन्ही  हात उजव्या बाजूस वर मुरली वाजवीत आहेत, अशा रीतीने दोन्ही हातांची बोटे कोरली आहेत.  त्या बोटांमध्ये आपण फक्त लाकडी मुरली ठेवावयाची, तोंडाचा भाग बरोबर मुरलीवर येतो. गोकुळ वृंदावन भागातीलच अलंकारांची सर्व घडण आहे. हातावरील रेषा (शिरा) देखील स्पष्ट दिसतात. कृष्णाच्या पायाजवळ दोन्ही गायी अगदी तल्लीन होऊन कृष्णाची मुरली ऐकत आहेत, असा भाव त्यांच्या चेहऱ्यावर आहे. तसेच दर्शनी पट्टीवर चार लहान मानवी आकृती आहेत. त्या जय-विजय व दोन  मूर्तिकारांच्या आहेत. 

या मूर्तीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हरि-हर ऐक्याचे घडणारे दुर्लभ दर्शन हे होय. ज्या सिंहासनावर श्रीगोपाळकृष्ण स्थापित आहेत ते सिंहासन शिवलिंगाकार (साळुंका रूपाचे) आहे. अशी मूर्ती भारतातच काय, तर जगातही सापडणे अशक्य! मूर्तीत हरीहर भेट साकारल्यामुळे त्यांचे सेवक हनुमंत, गरुड आणि नंदीही साकारले. 

मनासारखी मूर्ती घडवली, ह्या आनंदात बाबुराव महाराजांनी कारागिरांना आपल्या घरी जेवणाचे आमंत्रण दिले. परंतु, जेवणाआधी विहीरीवर स्नानासाठी जातो असे सांगून कारागीर अंतर्धान पावले. जणू काही, स्वत: भगवान श्रीकृष्णच आपल्या भक्ताला अभिप्रेत असलेली मूर्ती साकारून निघून गेले.

बाबुराव महाराजांना अपेक्षित असलेली प्रतिमा अपंग व्यक्तीने ज्ञानेंद्रियांनी जाणून घेतली, तर अंध व्यक्तीने आपल्या साथीदाराच्या सूचनेनुसार ती मूर्ती कर्मेंद्रियांनी घडवली. थोडक्यात, श्रीकृष्णाच्या उपदेशाप्रमाणे ज्ञानयोगाचा आणि कर्मयोगाचा पुरस्कार केला आणि भक्ती मार्गामुळे ज्ञान आणि कर्म योग प्रकट झाला. 

बाबुराव महाराजांनी मूर्तीची यथोचित पूजा करून प्रतिष्ठापना केली. मंदिराची सेवा योग्य माणसांच्या हाती सोपवली आणि इहलोकीचे कार्य संपले आहे, असे ठरवून मूर्तीस्थापनेनंतर वर्षभरातच संजीवन समाधी घेतली. ती जागा गोपालकृष्ण मंदिराच्या खाली तळघरात स्थित आहे.

गोपालकृष्ण मंदिराची माहिती बाबुराव महाराजांचे वंशज जयंत देशपांडे ह्यांच्याकडून मिळाली. देशपांडेंची सतरावी पिढी मंदिरासाठी आपले योगदान देत आहे. १९५७ मध्ये सरकारी नियमानुसार मंदिराचे ट्रस्ट करण्यात आले. तर २००५ ते २०१० मध्ये ह्या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. 

गावकऱ्यांच्या सहकार्याने आणि देशपांडे कुटुंबियांच्या सहयोगाने गोपालकृष्ण मंदिरात दरवर्षी जन्माष्टमीचा उत्सव केला जातो. भजन-कीर्तन-भागवत-ज्ञानेश्वरी पारायणे होतात. आषाढी आणि कार्तिकी एकादशीला गोपाळकृष्णाच्या प्रतिमेची आणि पादुकांची मिरवणुक काढली जाते. कार्तिक महिन्यात काकड आरती होते. तर, वैशाख वद्य प्रतिपदेला बाबुराव महाराजांच्या समाधीवर अभिषेक व पूजा केली जाते. गोपाळकाल्याचे कीर्तन होते. त्यावेळेस संपूर्ण गाव गोळा होते आणि उत्सवात सहभागी होते. 

करवीर पीठाचे शंकराचार्य ,किशोरजी व्यास उर्फ स्वामी गोविंददेवगिरी, गुजरातचे स्वामी सवितानंद, स्वामी अवधूतानंद, भागवताचार्य धनंजयराव देशपांडे, मनोहर दीक्षित महाराज, वेदाचार्य विवेकशास्त्री गोडबोले, राजमाता कल्पना सरकार आदी दिग्गज मंडळींनी गोपालकृष्ण मंदिराला भेट दिली आहे. 

हा भाग दुष्काळी आहे. मात्र, मंदिरातील अनुष्ठानामुळे या पंचक्रोशीतील पावसाचे प्रमाण वाढले असल्याचे ग्रामस्थांनी अनुभवले आहे. अशा ह्या गोपालकृष्ण मंदिरात केवळ उत्सवालाच नव्हे, तर वर्षभर भक्त येत असतात. अनेक भाविकांना इच्छित मनोकामना पूर्तीचा अनुभव आल्याचे त्यांनी मंदिराच्या विश्वस्तांना कळवले आहे. ह्या मंदिराची आणि परिसराची महती प्रत्येकाने स्वत: तिथे येऊन अनुभवावी. 

फलटण एसटी स्टँडवरून गिरवीला जाणारी बस सेवा आहे.  तिथून गोंदवल्याला जाता येते. गिरविला जाताना साधकांनी भेट देण्यापूर्वी मंदिराचे व्यवस्थापक जयंत देशपांडे (९८२३००९५८९) ह्यांच्याशी संपर्क साधून पूर्वसूचना द्यावी. या मंदिराबद्दल अधिक माहितीसाठी http://gopalkrishnamandirgirvi.org/ या संकेत स्थळाला भेट द्यावी. 

टॅग्स :Janmashtamiजन्माष्टमीSatara areaसातारा परिसरphaltan-acफलटण