स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...

By देवेश फडके | Updated: June 23, 2025 16:52 IST2025-06-23T16:47:46+5:302025-06-23T16:52:37+5:30

Shree Swami Samartha Maharaj Math: जिथे-जिथे स्वामींचे मठ आहेत, तिथे-तिथे भाविक मोठ्या प्रमाणात जाऊन स्वामींसमोर नतमस्तक होतात. तुम्हाला या दोन गोष्टींचे अनुभव आले नसतील तर...

have you experienced these 2 things after visiting shree swami samarth maharaj math know about what is it means and signs | स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...

स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...

Shree Swami Samartha Maharaj Math: श्रीदत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मानले जातात. स्वामी अद्भुत आहेत. स्वामी स्वयंभू, स्वयंसिद्ध आहेत. स्वामी अतर्क्य व अनुत्तम आहेत. श्री स्वामी समर्थ कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत. स्वामी अतींद्रिय स्मर्तृगामी म्हणजेच स्मरण करताच, हाक मारताच भक्तासाठी अवतीर्ण होणारा साक्षात ईश्वर आहे. स्वामींचे महात्म्य आणि महिमा कालातीत आहे. ब्रह्मांडनायक, कृपासिंधू स्वामींचे मठ अनेक ठिकाणी आहेत. केवळ महाराष्ट्रात नाही, तर देश-विदेशात स्वामींचे मठ असल्याचे पाहायला मिळते. जिथे-जिथे स्वामींचे मठ आहेत, तिथे-तिथे भाविक मोठ्या प्रमाणात जाऊन स्वामींसमोर नतमस्तक होतात. या मठात जाऊन स्वामींचे दर्शन घेणे, स्वामींच्या आरतीला उपस्थित राहणे, गुरुवारी विशेष करून स्वामींचे दर्शन, पूजन, नामस्मरण करणे असा अनेकांचा संकल्प असतो.

स्वामी समर्थ महाराजांच्या मठात आपण जेव्हा जातो. तेव्हा नेमक्या दोन गोष्टी तुमच्यासोबतही होतात का? पहिली गोष्ट म्हणजे स्वामींच्या मठात गेल्यावर स्वामींना पाहताक्षणी चेहऱ्यावर आपोआप स्मितहास्य उमटते. आनंद होतो. स्वामींच्या मठात स्वामींची मूर्ती असो किंवा फोटो असो, त्याकडे आपली नजर गेली की, लगेचच चेहऱ्यावर स्मितहास्य येते. दुसरी गोष्ट म्हणजे स्वामींना नमस्कार करण्यास उभे राहिले की, नकळतपणे डोळ्यात अश्रू येतात. ते आनंदाश्रू असो किंवा मग परिस्थितीमुळे जेव्हा मनावर अतिशय ताण निर्माण होतो, तेव्हा दुःखाला वाट मोकळी करण्यासाठी डोळे पाणावलेले असो. स्वामींना प्रार्थना करतानाही डोळ्यांच्या कडा ओल्या होतात. या दोन गोष्टींचा अनुभव तुम्हीही कधी घेतला आहे का?

उत्तर हो असेल तर...

याचे उत्तर हो असेल, तर स्वामींवरील तुमची श्रद्धा बळकट आहे. स्वामींवर तुमचा जो विश्वास आहे, तो घट्ट आणि दृढ आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर झाल्यामुळेच एक समाधानाचे, आनंदाचे अश्रू तरळतात, असे म्हटले जाते. कोणतीही सकारात्मक गोष्ट मनाला आनंद देत असते. स्वामी सदैव आपल्या सोबत आहेत, असा विश्वास आपल्या मनात असतो, असे सांगितले जाते. याचे उत्तर नाही, असे असेल तर, काही हरकत नाही. दुसऱ्याला जो अनुभव येतो, तो आपल्यालाही आलाच पाहिजे, असा अट्टाहास मनात धरू नये. स्वामींचे आपल्यासाठी वेगळे काहीतरी नियोजन आहे, असा भाव मनात असावा. या गोष्टी आपल्यासोबत घडत नाही किंवा आपल्याला असे अनुभव येत नाही, त्यामुळे आपल्यात काहीतरी कमतरता आहे, असे अजिबात समजू नये. असे अनुभव येत नाही, तर आपली स्वामी सेवा कमी पडते, असेही समजू नये. स्वामी आई आहेत, माऊली आहे, त्यामुळे त्यांचे त्यांच्या सर्व लेकरांवर बारीक लक्ष असते, सारखेच लक्ष असते. त्यामुळे स्वामींवरील श्रद्धा आणि विश्वास तसूभरही कमी होऊ देऊ नये.

प्रत्येकाचे भावविश्व, मानसिकता, सभोवतालचे वातावरण, ज्या वेळेस स्वामींच्या मठात जातो, तेव्हाची परिस्थिती, सगळेच वेगवेगळे असते. त्यामुळे जो अनुभव आपल्याला येतो, तोच खरा मानावा. स्वामींवर अपार श्रद्धा आणि दृढ विश्वास ठेवा. स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील, हेही कोणी सांगू शकत नाही. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामींचे कालातीत अभय वचन असून, अशक्यही शक्य करतील स्वामी ही भाविकांची अतूट श्रद्धा आहे. 

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

॥ श्री स्वामी समर्थ ॥

 

Web Title: have you experienced these 2 things after visiting shree swami samarth maharaj math know about what is it means and signs