Has your progress stopped at some point in your life? This could be due to ... | आयुष्याच्या एका टप्प्यावर येऊन तुमची प्रगती थांबली आहे? त्यामागे 'हे' कारण असू शकते...

आयुष्याच्या एका टप्प्यावर येऊन तुमची प्रगती थांबली आहे? त्यामागे 'हे' कारण असू शकते...

एक चित्रकार होता. तो खूप छान चित्र काढत असे. चित्रकलेवरच त्याचा रोजगार अवलंबून होता. त्याचे चित्र ५०० रुपयांना विकले जात असे. या हिशोबाने तो दरमाह १५ हजार रुपये कमवत असे. 

वयोमानानुसार त्याचे हात थरथरू लागले. चित्र काढणे त्याला अवघड वाटू लागले. ही कला वंशपरंपरेने त्याच्याजवळ आली होती आणि त्याच्या पुढच्या पिढीतही संक्रमित झाली होती. त्याने आपल्या मुलाला घराची जबाबदारी खांद्यावर घेऊन चित्रकलेतून रोजगार कमवण्याचा सल्ला दिला.

मुलाची चित्रकला छान होती. चित्रकलेचे कोणतेही प्रशिक्षण न घेताही तो केवळ निरीक्षणातून सुंदर चित्रे काढू लागला. त्याने पहिल्यांदा आपले चित्र विक्रीसाठी नेले, तर त्याला दोनशे रुपए मिळाले. तो नाराज झाला. घरी परतला.

त्यालाही वडिलांसारखे एका चित्रामागे ५०० रुपयांची कमाई अपेक्षित होती. त्याने वडिलांना विचारले. ते म्हणाले, `बेटा प्रयत्न करत राहा.' मुलाने प्रयत्न सुरू ठेवले. त्याच्या चित्राला ३०० रुपये मिळू लागले. १०० रुपयांची वाढ होऊनही तो समाधानी नव्हता. तो वडिलांना म्हणाला, `तुम्ही नक्कीच काहीतरी यशाचा मंत्र माझ्यापासून लपवून ठेवत आहात. हरकत नाही. उद्या मी असे चित्र काढून दाखवीन की त्या चित्राला ५०० रुपये नक्कीच मिळतील.'

मुलाने जिद्दीने अतिशय सुंदर चित्र रेखाटले आणि त्या चित्राला ५०० च काय ७०० रुपये विंâमत मिळाली. मुलगा नाचत नाचत घरी आला. त्याने बाबांना बातमी दिली. बाबा म्हणाले, `आता तुला मी एक चित्र १००० रुपयांना कसे विकायचे ते सांगतो...'

मुलगा कुत्सितपणे म्हणाला, `बाबा, तुमचे चित्र ५०० रुपयांना विकलेत, मी तुमच्यापेक्षा २०० रुपयांची अधिक कमाई केली आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्या आधारावर मला १००० रुपये कसे कमवायचे हे सांगणार आहात?'

वडील म्हणाले, `बाळा, मी माझ्या बाबांनासुद्धा असेच उत्तर दिले होते. त्यांचे चित्र जेमतेम ३०० रुपयांना विकले गेले, तेव्हा मी माझे चित्र ५०० रुपयांना विकून दाखवले होते. तेव्हा माझे बाबा मला तेच चित्र ७०० रुपयांना कसे विकता येईल, हे शिकवणार होते, तर मीदेखील त्यांना तुझ्यासारखेच उडवाउडवीचे उत्तर दिले होते. मी ५०० रुपयांत समाधान मानू लागलो. पण बाबांचे ऐकले असते, तर माझ्या चित्रांचा भाव नक्कीच वधारला असता!'

गोष्टीचे तात्पर्य हेच, की आपण ज्याक्षणी शिकणे थांबवतो, त्याक्षणापासून प्रगतीची दारे बंद करून घेतो. जगात शिकण्यासारखे पुष्कळ आहे. प्रत्येकाकडून शिवूâन घेण्याची, आत्मसात करण्याची तयारी असली पाहिजे. जो आयुष्यभर विद्यार्थी दशेत राहतो, त्याचाच उत्कर्ष होतो. म्हणून `पी हळद आणि हो गोरी' अशा इंस्टंट यशाच्या मागे न लागता आयुष्यभर यश कसे टिकवता येईल, यासाठी प्रयत्न करा. महत्त्वाकांक्षा ठेवा. स्वप्नपूर्तीची धडपड करा. परंतु स्वप्न पूर्ण झाले, म्हणून थांबून न राहता, स्वप्नांच्या पुढच्या टप्प्याची आखणी करा, यश नक्की मिळेल!

Web Title: Has your progress stopped at some point in your life? This could be due to ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.