आनंद संसर्गजन्य आहे, व्यक्त करून तर पहा!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: January 9, 2021 06:05 PM2021-01-09T18:05:01+5:302021-01-09T18:05:53+5:30

आनंदी राहण्यासाठी पैसे लागत नाहीत. तुमच्या आनंदाने, स्मितहास्याने अनेकांच्या जीवनात आनंदाचे कारंज फुलू शकेल. निसर्गात उमललेली, तजेलदार फुले जशी आनंद देतात, तशीच हास्यफुलेही आनंद देतात. 

Happiness is contagious, try to express it! | आनंद संसर्गजन्य आहे, व्यक्त करून तर पहा!

आनंद संसर्गजन्य आहे, व्यक्त करून तर पहा!

Next

ज्योत्स्ना गाडगीळ 

संसर्ग या शब्दालाही आपण घाबरतो. परंतु, संसर्गातून आजारांव्यतिरिक्त काही चांगल्या गोष्टीही पसरत असतील, तर काय हरकत आहे. हा संसर्ग आहे, आनंदाचा. तो दिल्याने कमी होत नाही, उलट वाढतच जातो. मात्र, देण्यासाठी तो आधी स्वत:जवळ असावा किंवा निर्माण करता यायला हवा. आडात असेल, तर पोहरात येणार ना!

एकदा एक श्रीमंत बाई उंची वस्त्रे घालून, महागड्या गाडीतून  उतरून एका मानसोपचार तज्ज्ञांकडे गेली. त्यांना भेटल्यावर ती म्हणाली, `डॉक्टर, काहीही करा, पण मला माझा आनंद परत हवा आहे. आज जगातली सगळी सुखं पायी लोळण घेत असूनही मला आनंद घेता येत नाही, व्यक्त करता येत नाही.'
तिचे पूर्ण बोलणे ऐकून घेतल्यावर डॉक्टर म्हणाले, 'एवढेच ना, याचे उत्तर मी नाही, तर आमच्या इथे काम करणाऱ्या मावशीही देतील. 

हेही वाचा : 'ड्रीम जॉब' वगैरे नसतो, मिळालेलं काम आवडीने करायला हवं! -ओशो 

डॉक्टरांचे हे बोलणे त्या बाईला अपमानास्पद वाटले. तरीदेखील गरज तिला होती, म्हणून तिने मावशींचे बोलणे ऐकून घेतले. मावशी सांगू लागल्या, 'माझ्या नवऱ्याचा मलेरियाने मृत्यू झाला. त्यानंतर तीनच महिन्यात माझा मुलगादेखील मी अपघातात गमावला. मी एकटी पडले. जगण्यासाठी माझ्याकडे ध्येयच उरले नाही. मला मृत्यू खुणावत होता. 

एक दिवस एक मांजरीचे पिलू भर थंडीत माझ्या दाराजवळ आले. मी त्याला आत घेऊन ऊब दिली आणि थोडे दूध प्यायला दिले. पिलाला बरे वाटले. ते रोज येऊ लागले. मलाही त्याचा लळा लागला. त्याचा आनंद पाहून मला आनंद होऊ लागला. आपल्यामुळे कोणाला आनंद होतोय हे पाहून जगण्याची उमेद निर्माण झाली. मी आजारी लोकांची सेवा करू लागले, लहान मुलांना सांभाळू लागले. प्रत्येकाशी हसून बोलून राहू लागले आणि यांच्यातच मला आनंद सापडू लागला. हे ऐकून श्रीमंत बाईला आनंदाचे गुपित कळले आणि तीदेखील दुसऱ्यांना आनंद देऊन स्वत: आनंदी राहू लागली.

आपण किती आनंदी आहोत, हे महत्त्वाचे नाही, तर आपल्यामुळे किती जण आनंदी आहेत, हे महत्त्वाचे आहे. आपल्या एका स्मितहास्याने किती फरक पडू शकतो बघा-

तुम्ही शिक्षक आहात आणि स्मितहास्य करत तुम्ही वर्गात प्रवेश केलात, तर तो आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येईल.
तुम्ही डॉक्टर आहात आणि स्मितहास्य करत तुम्ही रुग्णाचे स्वागत केले, तर त्याचा आत्मविश्वास दुणावेल आणि तो लवकर बरा होईल.
तुम्ही गृहिणी आहात आणि तुम्ही स्मितहास्याने दिवसाची सुरुवात केलीत, तर तुमच्यामुळे घरच्यांचा दिवस आनंदात जाईल.
तुम्ही कुटुंबप्रमुख आहात आणि तुम्ही आनंदात सायंकाळी घरी परतलात, तर तुम्हाला पाहून घरच्यांनाही प्रसन्न वाटेल.
तुम्ही उद्योगपती आहात आणि तुम्ही प्रसन्न वदनाने कंपनीत गेलात, तर तुमच्या कर्मचाऱ्यांना तुमच्याकडे पाहून प्रेरणा मिळेल.
तुम्ही दुकानदार आहात आणि तुम्ही ग्राहकांचे हसून स्वागत केलेत, तर तुमचा ग्राहक दर वेळी तुमच्याकडूनच वस्तू विकत घेणे पसंत करेल.
तुम्ही रस्त्यावरून जात असताना अनोळखी व्यक्तीकडे बघून स्मितहास्य केलेत, तर ती व्यक्ती क्षणभर गोंधळेल, परंतु हसूनच तुम्हाला प्रतिसाद देईल. मग सांगा, आहे की नाही आनंद संसर्गजन्य?

म्हणून नेहमी आनंदी राहा. आनंदी राहण्यासाठी पैसे लागत नाहीत. तुमच्या आनंदाने, स्मितहास्याने अनेकांच्या जीवनात आनंदाचे कारंज फुलू शकेल. निसर्गात उमललेली, तजेलदार फुले जशी आनंद देतात, तशीच हास्यफुलेही आनंद देतात. 

हेही वाचा : चला, आजीची सुई शोधुया

Web Title: Happiness is contagious, try to express it!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.