Halloween 2023: हॅलोविन म्हणजे परदेशातला पितृपक्ष, पण तो आपल्याकडे साजरा करण्याचे खूळ अनावश्यक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2023 13:33 IST2023-10-31T13:33:31+5:302023-10-31T13:33:51+5:30
Halloween 2023: पाश्चात्य संस्कृतीबद्दल माहिती असावी पण त्यांचं अंधानुकरण अनावश्यक वाटतं; काय आहे त्यांची हॅलोविनची रात्र? जाणून घेऊ.

Halloween 2023: हॅलोविन म्हणजे परदेशातला पितृपक्ष, पण तो आपल्याकडे साजरा करण्याचे खूळ अनावश्यक!
३१ ऑक्टोबरची रात्र पाश्चात्य लोकांकडे हॅलोविन रात्र म्हणून साजरी केली जाते. त्यांच्याकडे हा उत्सव तीन दिवस चालतो. ३१ ऑक्टोबरला सुरुवात होते आणि २ नोव्हेंबरला सांगता! या रात्री पितर अर्थात मृत आत्मे आपल्या वंशजांच्या भेटीला येतात अशी सद्भावना असते. त्यांच्या स्वागतासाठी त्यांच्याप्रमाणेच भूत, प्रेत, आत्मे असा पोशाख करून हॅलोविनचा उत्सव साजरा केला जातो.
>> हॅलोविन शेताच्या मार्गाने येतात असा समज असल्याने मोठ्या भोपळ्यात दिवे लावून, त्या भोपळ्यांना चित्र विचित्र आकार देऊन त्यांच्याकडे दिवेलागण केली जाते. भुतांचं जग कसे असेल या कल्पनेनुसार उत्सवाची सजावट केली जाते. काही ठिकाणी या उत्सवासाठी विशेषतः मोठ्या आकाराचे भोपळे पिकवले जातात.
>> युरोपमध्ये ऑक्टोबरच्या शेवटच्या टप्प्यात हिवाळा आणि उन्हाळा यादरम्यानचा काळ असल्याने निसर्गातही सारी वृक्ष, पानं पिवळी, नारंगी रंगाची झालेली असतात. तर काळा रंग भय, मृत्यू यांचं प्रतिक आहे. त्यामुळे जन्म-मृत्यूच्या सेलिब्रेशनमध्ये नारंगी आणि काळ्या रंगाचा वापर केला जातो. रात्रीचा गडद काळा रंग आणि दिव्यांचा पिवळसर नारंगी प्रकाश यामुळे या उत्सवात काळा आणि नारंगी या दोन रंगांना विशेष महत्त्व असते.
>> पाश्चात्य देशात ख्रिस्मस इतकेच हॅलोविनला महत्त्व असते. त्यामुळे हे तीन दिवस सर्वत्र जल्लोषाचे वातावरण असते. एवढेच काय तर भुतांच्या लायटिंग, देखावे, कंदील आणि खाद्यपदार्थ रक्तसदृश दिसावेत अशा पद्धतीने सजवले जातात. हा सगळा प्रकार थोडा बीभत्सतेकडे झुकणारा असतो. मात्र परदेशात या गोष्टीना फार महत्त्व असते.
हॅलोविन भारतात साजरे करण्याचे खूळ :
अलीकडच्या काही काळात हॅलोविन भारतात साजरे करण्याचे प्रमाण वाढले आहे. आपल्यातल्या राक्षसी वृत्तीला बाहेर काढून मनाला मोकळी वाट करून देणे हा जर त्यामागचा हेतू धरला तर ती मुभा आपल्याला होळी या सणानेही दिली आहे. मात्र लोक पितृपक्षाला नावे ठेवून हॅलोविन पार्टी करतात तेव्हा त्यांची कीव करावीशी वाटते. कारण पाश्चात्यांमध्ये हा सण केवळ मौज मजेचा असला तरी भारतात तो संस्कारांचा एक भाग आहे. त्यासाठी जाणून घेऊया काही महत्त्वाचे मुद्दे!
पितृपक्ष आणि हॅलोविनमधील साधर्म्य :
- या दोन्ही संकल्पना पितरांशी संबंधित आहेत आणि त्यांना सद्गती मिळावी म्हणून आहेत.
- पाश्चात्य लोक पितरांसाठी मेणबत्ती लावतात, तर भारतीय दिवा किंवा पणती लावतात.
- या कालावधीत संत वृत्तीच्या लोकांचे स्मरण आणि ऋणनिर्देश दोन्ही संस्कृतीत केले जाते.
- पाश्च्यात्य लोक जल्लोष करून हा कालावधी साजरा करतात, तर भारतात पूजा विधी करून पितरांच्या आत्म्याला शांती लाभावी अशी प्रार्थना करतात.
- एक सण, उत्सव, परंपरा म्हणून दुसऱ्या राष्ट्राची संस्कृती समजून घेणे गैर नाही, मात्र त्याचे अंधानुकरण करून आपल्या संस्कृतीला नावं ठेवणे, कमी लेखणे नक्कीच चुकीचे ठरेल!