Deep Amavasya Importance:चातुर्मासातील पहिली अमावास्या गुरुवार, २४ जुलै २०२५ रोजी आहे. आषाढ अमावास्या ही दीप अमावास्या म्हणून ओळखली जाते. भारतीय संस्कृती आणि परंपरा यांमध्ये दीप पूजनाला अनन्य साधारण महत्त्व आहे. दिवा लावणे हा महत्त्वाचा संस्कार मानला गेला आहे. यंदाच्या वर्षीचे विशेष म्हणजे या आषाढ दीप अमावास्येला अत्यंत शुभ मानला गेलेला गुरुपुष्यामृत योग जुळून आलेला आहे.
अशुभतेपासून वाचण्यासाठी गुरुपुष्यामृत योग श्रेष्ठ आहे, असे मानले जाते. गुरुवारी पुष्य नक्षत्र आले, तर त्या दिवशी 'गुरुपुष्यामृत' योग होतो. हा योग सर्व कार्यासाठी शुभ समजला जातो. या योगावर सोने खरेदी केले असता त्याची वृद्धी होते, अशी मान्यता आहे. त्यामुळे या योगानिमित्त सोने खरेदीसाठी ग्राहक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. चातुर्मासातील पहिली दीप अमावास्या गुरुवार, २४ जुलै २०२५ रोजी आहे. गुरुपुष्यामृत योगात श्रावण महिन्याची सुरुवात होत आहे. गुरुवारी सायंकाळी ४ वाजून ४३ मिनिटांपासून ते दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी सकाळी ६ वाजून १५ मिनिटांपर्यंत गुरुपुष्यामृतयोग आहे. दीप अमावास्या, श्रावण महिन्याची सुरुवात आणि गुरुपुष्यामृताचा अत्यंत शुभ मानला गेलेला योग यामुळे या दिवसांचे महत्त्व दुपटीने वाढल्याचे म्हटले जात आहे.
दीप प्रज्वलन हा खूप मोठा आणि महत्त्वाचा संस्कार
हिंदू संस्कृती आणि परंपरेत दीप प्रज्वलन हा खूप मोठा आणि महत्त्वाचा संस्कार आहे. दिवाळीत दिव्यांचा उत्सव साजरा केला जातो. देवाचे पूजन करताना दररोज सकाळी आणि सायंकाळी देवासमोर दिवा लावला जातो. दिवा हे तेजाचे प्रतिक मानले जाते. दिवा लावल्याने पावित्र्य, चैतन्य आणि सकारात्मकता घरात येते. पणती, निरांजन, समई या ज्योतिर्मयस्वरुप दिव्यांचे महत्त्व अबाधित आहे. कारण, एका ज्योतिने दुसरी ज्योत पेटवता येते. अंधार कितीही गडद असला, तरी एक पणती अंधाराशी दोन हात करण्याची शक्ती देते. त्यामुळे दिवा लावणे हे आशेचे लक्षण मानले जाते. दिवा हा अप्रत्यक्षरित्या आश्वस्त करत असतो. आपल्यातील आशावाद कायम ठेवण्यास मदत करत असतो. त्यामुळे दीप प्रज्वलित करणे अत्यंत महत्त्वाचे आणि शुभ मानले गेले आहे.
श्रावण महिना सुरू होताना का करतात दीपपूजन?
भारतीय व्रत-वैकल्ये, सण-उत्सव हे केवळ धार्मिक, सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे, असे नाही. तर निसर्ग आणि शास्त्राधारही ही व्रते आणि सण साजरे करण्याला आहे. आषाढ अमावास्येला दीपपूजनाचे महत्त्व असल्याने याला दीप अमावस्या असेही म्हटले जाते. या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते. भरपूर पाऊस व अंधारून येणे हे श्रावणाचे वैशिष्ट्य आहे. घरातील इकडे तिकडे ठेवलेले, धुळीने माखलेले दिवे, समया, निरांजने, लामणदिवे या सर्वांना एकत्र करून, घासून पुसून लख्ख करून ठेवण्याचा हा दिवस असतो. दीपपूजा महालक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. यामुळे पूर्ण वर्षभर दीप पूजेची फलश्रुती प्राप्त होते, असे मानले जाते.
भारतीय संस्कृतीमध्ये दिव्याला फार महत्त्व
आपल्या संस्कृतीमध्ये दिव्याला फार महत्व आहे. प्राणालाही प्राणज्योत म्हटले जाते. घरातील इडा-पिडा टाळून, अज्ञान, रोगराई दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी दीप प्रज्वलित करून त्यांची पूजा करावी, अशी मान्यता आहे. तिमिरातून तेजाकडे वाटचाल करण्याचे दीप हे एक महत्त्वाचे माध्यम आहे. दिवा हे तेजाचे, ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतिक मानले जाते. दिव्याला सकारात्मकतेचे प्रतिक आणि दारिद्र्य दूर करण्याचे साधन मानण्यात आले आहे.
घरात दररोज दीप प्रज्वलन करणे शुभ
घरात दररोज दीप प्रज्वलन करणे शुभ मानले जाते. घरातील दिवे सकारात्मक ऊर्जा निर्माण करत असतात. दिव्याचा प्रकाश परब्रह्म व नारायण स्वरुप मानला गेला आहे. तिन्हीसांजेला प्रज्वलित केलेला दिवा केवळ अंधःकार आणि नकारात्मक ऊर्जा संपुष्टात आणत नाही, तर घरात आणि मनात चैतन्य आणि सकारात्मक ऊर्जेचा भरणा करतो. दीप प्रज्ज्वलन हे धर्म आणि विजयाचे सूचक मानले आहे. कोणत्याही शुभ कार्याची, कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने केली जाते. सत्कर्माचा साक्षीदार दिवा होत असतो.
तिन्हीसांजेला दिवेलागणीवेळी दीप प्रज्ज्वलन का करतात?
सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत सूर्याची किरणे पृथ्वीवर संचार करत असतात. सूर्याच्या उष्णतेमुळे बारीक जीवजंतू, विषाणू, रोगजंतू मारले जातात. मात्र, सूर्यास्तानंतर सूर्य किरणे पृथ्वीवर नसतात. वातावरणातील उष्णता काही प्रमाणात कायम राहावी, यासाठी तिन्हीसांजेला दिवे लावण्याची परंपरा आपल्याकडे सुरू आहे. प्राचीन काळात ऋषि-मुनी आणि सामान्य नागरिकही सायंकाळी एका ठराविक वेळी दीप प्रज्ज्वलन करीत असत. आजच्या काळातही कोट्यवधी घरात दिवेलागणीवेळी देवासमोर, तुळशीसमोर आणि घरातील प्रवेशद्वाराजवळ दिवा लावला जातो. काही घरांमध्ये कापूर, जटामांसी, लोबान यांचे मिश्रण करून धूपही घातला जातो.