Guru Upasna: गुरु उच्च राशीत असेल तर उपासना कोणती करावी किंवा कशी वाढवावी? वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 15:42 IST2025-10-29T15:39:09+5:302025-10-29T15:42:06+5:30
Guru Upasna: गुरुकृपा व्हावी असे प्रत्येकाला वाटते, त्यासाठी वेळोवेळी कोणती उपासना केली तर अधिक लाभ होतो ते जाणून घेऊ.

Guru Upasna: गुरु उच्च राशीत असेल तर उपासना कोणती करावी किंवा कशी वाढवावी? वाचा
>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक
परवा माझ्या एका विद्यार्थ्याने मला अचंबित करणारा प्रश्न विचारला. गुरुचे भ्रमण त्याच्या उच्च कर्क राशीतून (चंद्राच्या राशीतून) होत आहे, तेव्हा आता काही उच्च किंवा वेगळी उपासना करायची का? प्रश्न उत्तम आहेच. आपल्याला प्रश्न पडतात हेच अभ्यासू वृत्तीचे लक्षण आहे, असे मी मानते. त्यामुळे प्रश्न विचारलेच पाहिजेत. पण उच्च उपासना काही वेगळी असते का? चला जाणून घेऊ.
गुरु आपल्या बारापैकी कुठल्याही राशीत असू देत, आपण करत असलेल्या नित्य उपासनेत काडीचाही बदल न करता ती करत राहिली पाहिजे, हे पहिले. आणि जेव्हा आपल्यावर काही आपत्ती, संकटे किंवा मनाविरुद्ध घटनांचा काळ समोर येतो, तेव्हा ही उपासना वाढवली पाहिजे. म्हणजे ११ माळा जप करत असाल, तर १६ किंवा २१ माळा जप करावा, असे.
गुरु हे गुरूच आहेत आणि ते आपल्याला अंतर्बाह्य ओळखतात. आपल्या मनात विचार यायच्या आधी तो त्यांना समजलेला असतो. त्यामुळे अत्यंत मनापासून, संपूर्ण श्रद्धेने आणि तळमळीने आपण काय काय करतो आणि काय करत नाही, ते त्यांना समजते. "महाराज, आता मी रोज जप-पोथी वाचते, आता माझ्या मुलाचा विवाह होऊ दे," असे म्हणून महाराजांना कामावर लावायचे नाही. त्यांना सर्व माहीत आहे आणि ते आपले कधीही वाईट करणार नाहीत, हा दृढ विश्वास कधीही डगमगता कामा नये.
उच्च उपासना एकच आहे - ती म्हणजे माणूसकी जपणे. माणूस म्हणून आपण कसे वागतो, घरात-बाहेर लोकांशी किती अदबीने, प्रेमाने वागतो की हिडीसफिडीस करतो? कुठल्याही प्रसंगात आनंद हरवू न देणे आणि आलेल्या प्रसंगातून मार्ग काढून पुढे जाणे हीसुद्धा एक उच्च उपासना आहे. एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षणासाठी मदत करणे, दानधर्म करणे, अगदी कुणाला थंड पाण्याची बाटली देऊन त्याच्या मनाला थंडावा देणे—ह्या लहानसहान गोष्टी आपण रोज सहज करू शकतो. सद्गुरूंचे प्रेम (जे आपले त्यांच्याबद्दलचे आणि त्यांचेही आपल्यासाठी असलेले) हे याच गोष्टीत दडलेले आहे.
अध्यात्म सोपे नाही. गजानन महाराजांनी बारा वर्षे खडकाळ विहिरीला पाणी आणले, त्यांनी नुसती काडी धरून चिलिम पेटवली आणि गणूला विहिरीतून वाचवले... आपण फक्त ह्या चमत्कारांना नमस्कार करायचा की त्यांनी जीवन कसे जगावे, ही जी सूत्रे सांगितली, जसे 'अन्न फुकट घालवू नका', त्याचे अवलंबन करायचे, हे आपल्याला समजले आहे. आयुष्यभर क्षणभर तरी महाराजांचा हात हाती घेऊन त्यांना काही हवे-नको ते विचारले का आपण? दिवाळीत त्यांना नटवले का? नवीन वस्त्रे त्यांना आणली का? त्यांना ओवाळले का? त्यांची दृष्ट काढली का? फराळ भरवला का? त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली का? एका तरी भक्ताने, "महाराज, तुमची दिवाळी कशी झाली? कुठल्या भक्तांच्या घरी आपण गेला होतात? माझ्याही घरी आपले चरण लागावेत," असे आग्रहाने विचारले का? नाही! आमचा सगळा जन्म सोशल मीडियावर दिवाळीचे मेसेज टाकण्यात जाणार, पण महाराजांना मेसेज केला का? नाही. "ते काय आहेतच भक्तांच्या सेवेसाठी, ते कुठे जाणार?" नाही का? सखोल विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
गुरु महाराज जेव्हा उच्च होतात, तेव्हा ते आपल्याकडूनही उच्च कोटीची सेवा व्हावी आणि आपण एक उत्तम माणूस म्हणून आपली समाजात ओळख व्हावी, असे त्यांना अपेक्षित असते. दादृत्व आपल्याकडून घडावे आणि महाराजांचा ऊर आपल्यासाठी भरून यावा, अशी कामगिरी/कर्म करणे अभिप्रेत आहे. समाजातील अनेक स्तरांना आज मदतीची गरज आहे, तिथवर आपण पोहोचले पाहिजे. आपले सर्व अवयव शाबूत आहेत, हे सुंदर जग बघता येते आहे, आणि भौतिक सुखात नुसते लोळत असणाऱ्या आपल्याला खरं तर काहीच मागायची आवश्यकता नाही. उलट, जे दिले आहे त्यासाठी प्रत्येक क्षणी त्यांच्या ऋणात आहोत, ह्याचे भान सुटू देऊ नये. त्यासाठी कृतज्ञता म्हणून सेवेत राहिले पाहिजे, तेच अभिप्रेत आहे.
साधना, नामस्मरण आजच्या काळाची गरज आहे. आपण करोडपती झालो आहोत, पण आपल्या करोड्याधीश महाराजांपासून खूप दूर जात आहोत. मोठमोठ्या गप्पा, शो-ऑफ, रोजचे जीवन जगताना जणू काही हे जग आपल्याच बुद्धीवर चाललेले आहे, हा पराकोटीचा अहंकार... ह्या सर्वातून आत्ता ह्या क्षणी बाहेर पडा हा त्यांचा संदेश आपल्याला ऐकूच येत नाही, इतक्या आपणच निर्माण केलेल्या आभासी जगात आपण मश्गुल आहोत.
आम्हाला द्यायचे झाले की हात आखडतात (अवघडतात), पण घ्यायचे झाले की दहा हात अजून फुटतात. अहो, नाही अजून समजले आपल्याला आपलेच गुरु! ना त्यांच्यावर विश्वास, न स्वतःवर. अहंकाराच्या कोशातून ते दिसतील तेव्हा ना? "समोरच्याने मेसेज नाही केला, मी पण नाही करणार." "समोरचा आधी बोलला पाहिजे, मगच मी बोलणार." सगळ्यांच्या चुका काढत जन्म गेला, पण आपली एकही चूक आपल्याला दिसत नाही! काय म्हणायचे ह्याला?
'उच्चीची साधना' असे काही शब्दप्रयोग नसतात. साधना साधकाला घडवत असते आणि तो किती घडत जातो, ह्यावर त्याचे फळ असते. दोन माळा केल्या आणि काम झाले नाही की माळ लगेच ठेवूनच द्यायची! जगभरातील मंदिरे फिरून काम का होत नाही? कारण समर्पणाची भावनाच नाही. शरीराने देवासमोर, पण मन भलतीकडेच. सतत शंका-कुशंका. ज्यांना शरण आहोत, त्यांच्याहीबद्दल जर मनात शंका असतील, तर धन्य आहोत आपण! असो.
गुरु उच्च राशीत आहे; मग आपणही आयुष्य, विचार, जगणे, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन उच्च करण्याचा प्रयत्न करूया. हा प्रयत्नसुद्धा आपले आयुष्य एका वेगळ्याच उंचीवर नेईल आणि त्याला प्रत्यक्ष सद्गुरू साक्षीला असतील, ह्यात कुठलीही शंका नसावी. उपासना म्हणजे आपल्यातील साधनेचा जणू आरसा आहे. मी जे करतो, ते नित्य करतो का? ह्याचे मोजमाप म्हणजे उपासना. आपल्यातील सातत्य किती आहे हे आपल्याला दाखवून देणारी ही उपासना. आपण चार दिवस जप करतो, पुढे काय? आपल्यातील सातत्य ठेवणारी उपासना करणे अभिप्रेत आहे. आपल्याकडून उच्च कोटीची साधना कधी होते आहे, ह्या प्रतीक्षेत आपले गुरु आहेत. त्यामुळे साधना वाढवूया, त्यांच्या सोबतीने जगण्याचा प्रयत्न करूया. सहमत?
संपर्क : 8104639230