सद्गुरू अन् प्रत्यक्ष देव एकाच वेळेस दारात येऊन उभे राहिले, तर पहिला नमस्कार कुणाला कराल?

By देवेश फडके | Updated: July 9, 2025 15:14 IST2025-07-09T15:09:56+5:302025-07-09T15:14:25+5:30

Guru Purnima 2025: कलयुगातही गुरुचे महत्त्व काय? जाणून घ्या...

guru purnima 2025 if a sadguru and god himself came and stood at the door at the same time then who would you greet first | सद्गुरू अन् प्रत्यक्ष देव एकाच वेळेस दारात येऊन उभे राहिले, तर पहिला नमस्कार कुणाला कराल?

सद्गुरू अन् प्रत्यक्ष देव एकाच वेळेस दारात येऊन उभे राहिले, तर पहिला नमस्कार कुणाला कराल?

Guru Purnima 2025: चातुर्मासातील पहिली आषाढ पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा. भारतीय संस्कृती आणि परंपरा यांमध्ये गुरुपौर्णिमेचे महत्त्व आणि महात्म्य अनन्य साधारण असेच आहे. गुरुवार, १० जुलै २०२५ रोजी गुरुपौर्णिमा आहे. यंदा, गुरुपौर्णिमा गुरुवारी आल्याने या दिवसाचे महत्त्व वाढले असल्याचे सांगितले जाते. भारतीय संस्कृतीत गुरूला देवाप्रमाणे मानले जाते. गुरूपौर्णिमेला गुरूपूजनही केले जाते. परंतु, आपले सद्गुरू आणि प्रत्यक्ष देव दोघेही एकाच वेळेस दारात समोर येऊन उभे राहिले, तर पहिला नमस्कार कुणाला कराल? असा यक्षप्रश्न मनात आला, तर त्याचे उत्तर काय असेल? जाणून घेऊया...

अगदी प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीत गुरुपौर्णिमा साजरी करण्याची परंपरा आहे. पूर्वी गुरुकूल पद्धत रुढ होती. गुरुकडून ज्ञानप्राप्ती केल्यानंतर स्वगृही परतण्यापूर्वी गुरुदक्षिणा देण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी केली जात असे, असे सांगितले जाते. भारतात पुराण काळापासून गुरु-शिष्य परंपरा आहे. पूर्वीच्या काळी शिष्य गुरुकडे आश्रमात राहत असत. ज्ञानसंपादनासाठी शिष्याला सुखवस्तू जीवनाचा त्याग करावा लागत असे. आता मात्र गुरुकुल परंपरा कमी झाली आहे. मात्र गुरुकडून ज्ञान घेण्याची प्रथा आजही तशीच आहे. आयुष्यात चांगला गुरु मिळणे भाग्याचे लक्षण समजले जाते. 

गुरु म्हणजे काय?

कलीने ब्रह्मदेवांना गुरु शब्दाचा अर्थ विचारला तेव्हा ब्रह्मदेवांनी सांगितला की, 'ग' कार म्हणजे सिद्ध होय. 'र' कार म्हणजे पापाचे दहन करणारा. 'उ' कार म्हणजे विष्णूंचे अव्यक्त रूप. तसेच गुरु हाच ब्रह्मा, विष्णू, महेश. हे त्याचे त्रिगुणात्मक रूप आहे. या पलीकडे जे परब्रह्म तत्त्व आहे, ते जाणण्यासाठी गुरुंचा आश्रय घ्यावा लागतो. गुरुचे कार्य महान कार्य आहे. आपल्या शिष्यांच्या चांगल्याचा विचार करून त्यांना आपल्याजवळील ज्ञान आणि अनुभव निरपेक्षपणे आणि प्रामाणिकपणे देणे हे गुरुचे खरे कार्य असते. गुरुपौर्णिमा ही फक्त अध्यात्मिक, धार्मिक गुरूंना वंदना नसून या निमित्ताने शिक्षण, लेखन, चित्रकला, मूर्तिकला, गायन, वादन, अभिनय, विविध क्रीडा, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्र इत्यादी सर्व क्षेत्रातील गुरुंबद्दल कृतज्ञता असते. प्राचीन काळापासून हिंदू धर्मात साजरा होणारा हा टीचर्स डे आहे.

जीवनात गुरुचे महत्त्व काय?

आपण गुरु म्हणून दत्त गुरु, स्वामी समर्थ, गजानन महाराज, गगनगिरी महाराज, शंकर महाराज, गोंदवलेकर महाराज अशा दैवी गुरूंची उपासना करतोच. याशिवाय अनेक जण संत-महंत-योगी-सिद्ध सत्पुरुषांना आपल्या गुरुस्थानी मानत असतात. ते आपल्याला आयुष्याचा मार्ग दाखवतात, अध्यात्माचा मार्ग दाखवतात आणि जीवन मृत्यूच्या पलीकडच्या प्रवासाला घेऊन जातात. त्यांची उपासना केल्यामुळे न सुटणारे प्रश्नही आपोआप सुटत जातात. शिष्याची अध्यात्मिक तयारी पुरेशी झाली की गुरूच त्याचा शोध घेत त्याच्याकडे येतो. गुरु त्यांच्याजवळील ज्ञान आणि अनुभवातून शिष्याला मार्गदर्शन करत असतात. जीवन जगत असताना या ज्ञान आणि अनुभवाची प्रत्येकाला गरज असते. स्वानुभवातून शिकण्यापेक्षा एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घेतल्यामुळे जीवनातीस समस्या लवकर सोडवता येतात आणि जीवन सुखी-समाधानी होते. जीवनात गुरुशिवाय तरणोपाय नाही, असे म्हटले जाते. प्रत्येकाचाच गुरू ठरलेला असतो. शिष्याच्या अंगी योग्यता आली की गुरूच त्याचा शोध घेत येतो. 

सर्वशक्तिमान परमेश्वर असताना गुरुची गरज काय?

परमेश्वर हा सर्वशक्तिमान आहेच. ब्रह्मांडातील सर्व शक्ती त्याच्याचकडे आहेत असे आपण मानतो. असे असताना गुरुची गरज काय, असा प्रश्न मनात येणे स्वाभाविक आहे. परंतु, आपल्या घराजवळ जरी २५००० व्होल्टस इतक्या उच्च दाबाचा विजेचा जनरेटर असेल तरी आपण त्याला आपल्या घरातील वायरिंग थेट जोडू शकत नाही. कारण इतकी प्रचंड शक्ती धारण करण्याची कुवत आपल्या घरातील वायरिंगमध्ये नसते. म्हणून त्यासाठी ट्रान्सफॉर्मरची व्यवस्था केलेली असते. मेडिकल स्टोअर्समध्ये सगळी औषधे खच्चून भरलेली असतात. तरीही आपली प्रकृती बरी नसेल तर आपण तेथे जाऊन मनाला येतील ती औषधे आणून ती घेऊ शकत नाही. त्यासाठी डॉक्टर आणि फार्मासिस्ट / केमिस्ट लागतात. त्याचप्रमाणे सर्वशक्तिमान परमेश्वराची, पंचमहाभूतांची शक्ती इतकी प्रचंड आहे की बहुसंख्य सामान्य माणसे ती शक्ती, त्यांची कृपा थेट प्राप्त करून घेऊ शकत नाहीत. म्हणूनच गुरु हा एक मानवी रूपातील ट्रान्सफार्मर अत्यावश्यक आहे. तो तुमचे कर्म, तुमची क्षमता, तुमची गरज पाहून तुम्हाला ही शक्ती किती, कधी आणि कशी द्यायची हे ठरवितो. तुम्ही या शक्तीचा गैरवापर करणार नाही याची खात्री पटल्यावर गुरु तुम्हाला आणखीही भरभरून देतो. 

सद्गुरू अन् प्रत्यक्ष देव एकाच वेळेस दारात येऊन उभे राहिले, तर पहिला नमस्कार कुणाला कराल?

वरील उदाहरण लक्षात घेतले. तर प्रत्यक्ष देव समोर आला, भगवंत दारात येऊन उभा राहिला, तरी त्याला ओळखण्याची कुवत, क्षमता सद्गुरू, गुरुंमुळेच आपल्यात निर्माण झालेली असते.  आपल्यावर भगवंत, ईश्वर प्रसन्न झाला तरी त्याला ओळखणारा गुरुच असतो. गुरु स्वत: प्रसन्न झाला, तर ईश्वर आपल्या अधीन होतो, असे मानले जाते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपल्यावर झालेल्या अपार गुरुकृपेमुळेच प्रत्यक्ष भगवंत किंवा देव आपल्या दारात आलेला असतो. त्यामुळे सद्गुरू अन् प्रत्यक्ष देव एकाच वेळेस दारात येऊन उभे राहिले, तर पहिला नमस्कार नेहमी सद्गुरूंना, गुरुला करावा, असे म्हटले जाते. शिष्याची योग्यता आणि क्षमता सिद्ध झाल्यावरच सद्गुरूकृपेमुळे देवाची प्राप्ती होऊ शकते, असे म्हटले जाते. 

 

Web Title: guru purnima 2025 if a sadguru and god himself came and stood at the door at the same time then who would you greet first

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.