>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक
गुरुपौर्णिमा(Guru Purnima 2025) म्हणजे गुरुप्रती असलेली श्रद्धा , भाव त्यांच्या चरणी समर्पित करण्याचा योग . आजवर प्रत्येक क्षणी गुरुंनी सांभाळले आहे , आधार दिला त्यासाठी त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा सुदिन म्हणजे गुरु पौर्णिमा . आपल्या आयुष्यात आपल्याला आईवडील , घरातील इतर व्यक्ती , शालेय जीवनापासून आपल्यावर संस्कार करणारे शिक्षक सर्वच आपले गुरु आहेत, ज्यांच्या कडून आपण आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर काहीतरी ज्ञान मिळवत असतो . माणसाचे षडरिपू त्याची पाठ सोडत नाहीत म्हणूनच अध्यात्म आहे. नामस्मरण , गुरु उपासना ह्या अवगुणांना वेसण घालून नियंत्रित करण्यास उपयुक्त ठरते. विज्ञान , ज्योतिष ह्यांचा समतोल आयुष्यात घालावाच लागतो. कर्मनिष्ठ जरूर असावे पण अध्यात्माला नाकारू नका हे नक्की .
गुरुपौर्णिमेला एक दिवस नाम घेऊन चालणार नाही, तर आपल्यावर अखंड नामाचा अभिषेक होणे गरजेचे आहे . गुरुपौर्णिमा ह्याचा साधा सोपा अर्थ म्हणजे आपल्या गुरूंच्या सहवासात अखंड राहणे, त्यांच्या बरोबरच आयुष्य व्यतीत करणे . जळी स्थळी त्यांचीच छबी मनात आणि डोळ्यासमोर असेल तर आयुष्य आनंदात जाणारच. नुसता आनंद नाही तर ते सर्वार्थाने समृद्ध होईल.
जन्म मोक्षासाठीच आहे आणि म्हणूनच शनी गुरु ह्या सारखे ग्रह आयुष्याच्या तिसर्या अंकात भेटतात. जीवनातील मौजमजा, आनंद तृप्तता , मोह ,पुरुषार्थ गाजवणे , मानमरातब , ज्ञान , वर्चस्व , पद लालसा , आकर्षण , सुख समृद्धी ह्या सर्वांसाठी चंद्र, शुक्र, बुध, राहू, मंगळ सर्वच प्रोत्साहित करतील, पण खरे समाधान आयुष्याच्या संध्याकाळी देणारे गुरु आणि शनीच आहेत. मी काय मिळवले आणि गमावले ह्याचा हिशोब आयुष्याच्या अखेरीच होतो. भौतिक सुखे कमी मिळाली तरी चालेल पण आंतरिक समाधान शेवटचा क्षण सुखाचा करणार ह्यात शंकाच नाही!
एखाद्या व्यक्तीचे उत्पन्न कमी असूही शकेल , भौतिक सुखे पायाशी लोळत नसतील पण मनाचे आंतरिक समाधान ओतप्रोत आहे कारण समाधान देणारा गुरु पत्रिकेत उत्तम आहे. गुरूंच्या शिवाय जीवन अपूर्ण आहे. एखादी कला , विषय भाषा ,पदार्थ काहीही असो ती शिकवणारा योग्य गुरु जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मिळणे हे अहो भाग्य आहे . ह्या सगळयाच्या जोडीला मनाचे समाधान कशात आहे, ह्याचा शोध घेण्यासाठी मदत करणारा अध्यात्मिक गुरु लाभणे हे तर परमोच्च भाग्य म्हटले पाहिजे.
भारतीय ज्योतिष आणि अध्यात्म आपल्याला परावलंबी बनवत नाही, तर विचार करण्यास सक्षम करतात. ज्ञानाचा अखंड झरा, ओघ म्हणजे गुरुतत्व . गुरुतत्व हा एक विचार आहे आणि तो मनात रुजला तर सकारात्मकता , मनाची शांतता अपोआप येतेच , कशाचीही भीती वाटत नाही.
आजकाल दर दोन मिनिटांनी लोकांना उदास, एकटे वाटते, डिप्रेशन एनझायटी असले भले मोठे शब्द आजकाल अगदी लहान वयाच्या मुलांकडून ऐकायला येतात . काय असते ते नेमके ? अहो ह्या सर्व गोष्टी सुखाच्या गाद्यावर लोळून जवळ येतात. आज रस्त्यावर जाऊन बघा, लोकांना शुद्ध पाणी नाही प्यायला , भुकेने कासावीस झालेल्या त्या लहान लहान जीवाना विचार करा, त्यांना डिप्रेशन आले आहे का? भरपूर झाले मनाचे आणि शरीराचे लाड . परमेश्वराने खूप दिले आहे आपल्याला, म्हणूनच मोठ्या घरात राहून चार वेळा खायला प्यायला मिळूनही आपल्याला डिप्रेशन येते . परमेश्वराची ओंजळ रिती व्हावी इतके सुख पदरात घातले आहे त्यांनी! आपले तरीही आपल्याला डिप्रेशन? वा रे वा...!
विचार करा खरेच सर्व काढून घेतले तर काय अवस्था होईल आपली? आपल्या कम्फर्ट झोन मधून बाहेर या आणि कामाला लागा , स्वतः कष्ट करा, आपले गुरु सदैव आपल्या सोबत आहेत ह्याची खात्री बाळगा. सारखे काय मागत राहायचे . हे द्या ते द्या . थोडे तटस्थ राहून आपल्याच आयुष्याकडे बघा . गुरु तत्व म्हणजे इतरांना मदत करणे, एखाद्याच्या शिक्षणाला औषधांना मदत करणे, वृद्धाना मानसिक आधार देणे, समाजासाठी काहीतरी कुणाच्यातरी उपयोगी पडणे , एखाद्या आजोबांना रिक्षा करून दिलीत तरी महाराजांना ते आवडेल.
गुरुपौर्णिमा रोज प्रत्येक क्षणी जगायची गोष्ट आहे . ती एक दिवस त्यांची आठवण काढायची आणि इतर दिवशी वाटेल तसे वागायचे हे कसे चालेल. आपला संसार आपल्या घरातील जबाबदाऱ्या भविष्यासाठी केलेली आर्थिक तरतूद आणि घरातील कुटुंबातील सर्वाना एकत्र धरून ठेवणे ही भावना म्हणजेच गुरुतत्व आहे. महाराजांनी कसे आपल्या सर्वाना एकत्र आणले आहे . प्रेमाच्या धाग्याने सर्व भक्तांना बांधून ठेवले आहे, त्याचप्रमाणे समाजातील प्रत्येक घटकाला मदतीचा हात देणे हेही गुरुतत्व आहे. नुसते मी माझे करून होत नसते. जीवन खऱ्या अर्थाने जगायचे असेल तर इतरांसाठी काहीतरी मागण्याची, करण्याची वृत्ती हवी , ती मनात भिनली पाहिजे. प्रत्येक गोष्टीत स्वार्थ असतो आपला. अगदी महाराजांच्या सेवेत सुद्धा . काहीतरी हवे आहे म्हणून सेवा हे समीकरण आहे.
कुणाची माफी मागायची आहे लगेच मागून टाका , नाहीतर ती मागायला पुढील जन्म घ्यावा लागेल तोही अजून अधिक कष्टाचा . द्वेष मत्सर, तिरस्कार म्हणजे मोठ्या कधीही बऱ्या न होणाऱ्या आजारांना जन्माला घालणे .
फक्त महाराजांचे अस्तित्व अनुभवा आणि अखंड नाम घ्या! जप किती करू? असे लोक विचारतात. मात्र बटाटे वडे किती खाऊ ते नाही विचारात कुणाला! अहो नामस्मरणाची गोडी अवीट आहे आणि ती चाखायची असेल, तर जपाची माळ ठेवून द्या आणि श्वासागणिक नाम घ्या. आयुष्यात कितीही काहीही मिळवले तरी जोवर मनाचे समाधान मिळत नाही तोवर सर्व फोल आहे .
गुरुपौर्णिमा म्हणजे समाधानाकाडे वाटचाल. द्या सोडून सर्व विचार आणि झोकून द्या स्वतःला त्यांच्या चरणाशी, अर्पण करा सर्वस्व. असे कराल तेव्हा उरेल ते फक्त नाम नाम आणि नाम! नामाचा महिमा अगाध आहे पण आजच्या इंस्तंट च्या जगात इंस्तट नाम मात्र मिळणे अवघड आहे . परमेश्वर प्राप्ती साठी स्वतःला विसरावे लागते तरच कुठे ते दृष्टीक्षेपात येते. आपले सर्वस्व गेले तरी आपला अहंकार जात नाही , पुढील जन्मीही तो घेऊन जाणार की काय ? रत्न कुठले घालू विचारतील, कारण ते बोटात घातले की जगाला दिसते, आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन करायला आणि मिरवायला मोकळे. पण नामस्मरण कुठले करू ते नाही विचारत! उपासना ह्या शब्दाचा अर्थ रत्न नसून नाम आहे. नाम नाही घेतले तर रत्न सुद्धा काम करणार नाही.
गुरूंवर असणारी निष्ठा ही परमोच्च आहे. गोरा कुंभार आपल्या पत्नीसोबत रस्त्यातून जात होते . त्यांच्या पायाला काहीतरी लागले म्हणून पायाने माती बाजूला केली तर सोन्याचे कडे दिसले, मागून पत्नी येत होती, ती हे उचलेल अशी शंका मनात आली, म्हणून लगेच त्यांनी त्यावर माती सारली आणि पुढे निघून गेले. आपले पती इथे क्षणभर का थांबले हे पत्नी पाहत होती . तिथे आल्यावर तिच्याही पायाला त्या कड्याचा स्पर्श जाणवला तिनेही त्यावर माती सारली आणि पुढे आली. पतीला विचारले, स्वामी तुम्ही तर मातीवर मातीच टाकून आलात!
हा खरा परमार्थ आहे . भौतिक सुख शेवटी कवडीमोल आहे. आपण मातीतून जन्मलो आणि शेवटी मातीतच विलीन होणार हे त्रिवार सत्य आपल्याला जितक्या लवकर कळेल तितके द्वेष , मत्सर खुनाशी स्वभाव , दुसऱ्यावर असलेली जळू वृत्ती , मानापमानाच्या भावना , तिरस्कार कमी होत जातील. आपल्याकडून काही हरवले, मग ती वस्तू असो अथवा माणूस चूक आपलीच असते. दोष इतरांचा नसतोच, कारण हे आपले आयुष्य आहे आणि तेही आपल्या पूर्व कर्मानुसार मिळालेले. हेच समजण्यासाठी अध्यात्म आहे आणि ते करत राहणे, समजून घेणे हेच आपले जीवन आहे. आपल्या पडत्या किंवा वाईट काळात ज्यांनी मदत केली त्यांना विसरलात तर कुठलाही देव माफ करणार नाही, त्यामुळे सदैव सर्वांचे ऋण माना आणि त्याप्रमाणे वागणेही ठेवा .
किती लोक ओळखतात आपल्याला ह्या जगात? आपण गेल्यावर कुणीही आपली आठवण सुद्धा काढणार नाही . वयाच्या सत्तरीत सातवीचे मार्क आठवत आहेत का? नाही ना मग विसरा सर्व कटू गोष्टी आणि मनात ओठात हृदयात आणि वागण्या बोलण्यात फक्त आणि फक्त गुरूंचे नाम असुदेत. आयुष्य स्वामीमय होणे ह्यासारखा परमोच्च आनंद असूच शकत नाही. अनुभव घ्या आणि कळवा सुद्धा!
माझ्या आयुष्यातील सर्व गुरुंना हा लेख समर्पित करत आहे . गुरुपौर्णिमा तुमच्या आमच्या सर्वांच्याच आयुष्यात नामाचे महत्व जपणारी , मुखी गुरुस्तवन असणारी असुदे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना .
संपर्क : 8104639230