Gaur Gopal Das: सोशल मीडियामुळे तरुणांमध्ये नैराश्य; गौर गोपालदास म्हणतात, जीवन आइस्क्रीमसारखं जगलं पाहिजे...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 14:22 IST2023-01-24T14:20:22+5:302023-01-24T14:22:08+5:30
Gaur Gopal Das: सध्याच्या तरुणाईच्या मनःस्थितीचे योग्य वर्णन करताना गौर गोपाल दास यांनी मोलाचा सल्ला दिला आहे. जाणून घ्या...

Gaur Gopal Das: सोशल मीडियामुळे तरुणांमध्ये नैराश्य; गौर गोपालदास म्हणतात, जीवन आइस्क्रीमसारखं जगलं पाहिजे...
Gaur Gopal Das: आताच्या घडीला तरुण मंडळी सोशल मीडियावर सर्वाधिक सक्रीय असल्याचे पाहायला मिळतात. जीवनातील अगदी छोट्या छोट्या क्षणापासून ते महत्त्वाच्या बाबींपर्यंत अनेकविध गोष्टी सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. मात्र, सोशल मीडिया तरुणाईसाठी घातक ठरू शकते, असे अनेक मतप्रवाह ऐकायला मिळतात. यातच मोटिव्हेशनल स्पीकर गौर गोपाल दास यांनी सोशल मीडियामुळे तरुणांमध्ये नैराश्य येत आहे, असे सांगत जीवन आइस्क्रीमप्रमाणे जगले पाहिजे, असे म्हटले आहे.
जयपूर येथे एका कार्यक्रमात बोलताना, देशातील तरुण पिढी दिवसेंदिवस अधिक हताश, निराश होताना दिसत आहे. हे सोशल मीडियामुळे होत आहे. सोशल मीडियामुळे आनंदही अनुभवता येऊ शकतो. मात्र, त्याचे माध्यम आणि प्रमाण योग्य असायला हवे. सोशल मीडियाचा योग्य पद्धतीने वापर केल्यास प्रसन्नता, आनंद प्राप्त करता येऊ शकेल. अन्यथा सोशल मीडियाचे माध्यम एखाद्या शापापेक्षा अधिक धोकादायक ठरू शकते, असे गौर गोपाल दास यांनी म्हटले आहे.
दुसऱ्याच्या आयुष्यातून धडा घेऊन स्वतःचे आयुष्य घडवा
सोशल मीडियावर आपल्या पोस्टला किती लाइक्स मिळाले, किती जणांनी पोस्ट पाहिली तसेच दुसऱ्याच्या पोस्टचे लाइक्स, कमेंट्स यांमुळे तुलना वाढतेय. सोशल मीडियावर कधी कुणी आपले अपयश, कमतरता शेअर करत नाही. केवळ चांगल्या गोष्टीच शेअर केल्या जातात. यामुळे नकळतपणे होणारी तुलना ही एकतर्फी केली जाते. मी नेहमी सांगतो की, समोरच्या व्यक्तीचे आयुष्य पाहायला हवे. त्यातून आपण कॉम्प्लेस न बाळगता, त्यातून शिकणे महत्त्वाचे आहे. त्यातून बोध घेऊन आपले आयुष्य कसे सुधारता येईल, ते कसे चांगले होईल, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे, असे गौर गोपाल दास यांनी नमूद केले.
जीवन आइस्क्रीमसारखे जगले पाहिजे...
गौर गोपाल दास यांनी जीवन कसे असावे, याबाबत अगदी सोप्या शब्दांत सांगितले. त्यावेळी त्यांनी आइस्क्रीम आणि मेणबत्तीची समर्पक उदाहरणे दिली. जेव्हा आपण आइस्क्रीम खातो, त्यातून जीवनाचा धडा घेऊ शकतो. आइस्क्रीम वितळण्याआधी ते आपण संपवतो. तसेच जीवन झिजण्याआधी, वितळण्याआधी ते जगून घ्यायला हवे. जीवनाचा आनंद घ्यायला हवा. तसेच मेणबत्ती स्वतः वितळून दुसऱ्याला प्रकाश देण्याचे काम करते. त्याचप्रमाणे आपण स्वतः थोड्या प्रमाणात का होईना झिजून दुसऱ्यांचे जीवन चांगले करण्यासाठी योगदान दिले पाहिजे. फक्त स्वतःबाबत विचार करता कामा नये, असे गौर गोपाल दास म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"