Ganga Saptami 2025: आज गंगासप्तमीनिमित्त जाणून घ्या गंगेचे उगमस्थान; या पावनक्षेत्री जायलाच हवे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 11:49 IST2025-05-03T11:49:32+5:302025-05-03T11:49:51+5:30

Ganga Saptami 2025: आपल्या देवघरात आपण रोज गंगेची पुजा करतो, पण प्रत्यक्ष तिच्या उगम क्षेत्री जाण्याची संधी मिळाली तर? जाणून घ्या ते पवित्र स्थान!

Ganga Saptami 2025: Today, on the occasion of Gangasaptami, know the source of the Ganges; You must visit this holy place! | Ganga Saptami 2025: आज गंगासप्तमीनिमित्त जाणून घ्या गंगेचे उगमस्थान; या पावनक्षेत्री जायलाच हवे!

Ganga Saptami 2025: आज गंगासप्तमीनिमित्त जाणून घ्या गंगेचे उगमस्थान; या पावनक्षेत्री जायलाच हवे!

असे म्हणतात, की ऋषींचे कुळ आणि नदीचे मूळ शोधू नये. तसे असले तरीदेखील आपल्या पौराणिक कथांच्या आधारे आपल्याला गंगा मातेचे मूळ नक्कीच सापडले आहे. ३ मे रोजी गंगासप्तमी (Ganga Saptami 2024) अर्थात गंगा नदीची जयंती आहे. त्यानिमित्त जाणून घेऊया या स्थानाविषयी!

गंगोत्री मंदिर" हे भारताच्या उत्तराखंड राज्याच्या उत्तरकाशी जिल्ह्यापासून १०० किमी अंतरावर आहे. पौराणिक मान्यतेनुसार, माता गंगा पृथ्वीवर अवतरली ती जागा "गंगोत्री तीर्थ" म्हणून ओळखली जाते. गंगोत्री हे उत्तराखंड राज्यात वसलेल्या गंगा नदीचे उगमस्थान मानली जाते. 

गंगोत्री मंदिर हे हिंदूंचे पवित्र आणि तीर्थक्षेत्र आहे. हे मंदिर भारतातील सर्वात प्रमुख मंदिर आहे. गंगोत्री मंदिर भागीरथी नदीच्या काठी वसलेले आहे. यमुनोत्री धाम नंतर येणारा चार धाम यात्रेचा दुसरा मुक्काम याठिकाणी केला जातो. हे मंदिर हिमालयाच्या रांगेत ३१०० मीटर (१०,२०० फूट) उंचीवर आहे. येथे गंगेचे मंदिर आणि सूर्य, विष्णू आणि ब्रह्मकुंड सारखी पवित्र स्थाने आहेत.

पौराणिक कथेनुसार :-
भगवान श्री रामचंद्रांचे पूर्वज असलेल्या रघुकुलचा चक्रवर्ती राजा भगीरथ याने येथे एका दगडावर बसून भगवान शंकराची प्रचंड तपश्चर्या केली होती. त्याच्या विनंतीवरून स्वर्गातील गंगा पृथ्वीवर येणार होती. मात्र तिचा जलप्रपात अडवण्यासाठी भगवान शंकरांनी आपल्या जटा मोकळ्या करून तिला धारण केले आणि नंतर या स्थानावर जटा आपटून तिला मोकळे केले. त्या खुणा आजही गंगोत्रीजवळ बघायला मिळतात. त्यावेळेस गंगा मातेचा पृथ्वीला पहिला स्पर्श झाला, तेच हे ठिकाण!

दुसरी कथा अशी आहे की महाभारताच्या युद्धात मरण पावलेल्या सैनिकांच्या आत्मशांतीसाठी पांडवांनीही या ठिकाणी मोठा देव यज्ञ केला होता. त्या यज्ञाचे फलित म्हणून गंगा माता पृथ्वीवर अवतीर्ण झाली. 

"गौमुख" गंगोत्रीपासून १९ किमी अंतरावर, समुद्रसपाटीपासून सुमारे ३,८९२ मीटर उंचीवर आहे. हे गंगोत्री हिमनदीचे मुख आणि भागीरथी नदीचे उगमस्थान आहे. इथल्या पाण्यात आंघोळ केल्याने सर्व पापे धुऊन जातात अशी भाविकांची श्रद्धा आहे. 

गंगोत्री मंदिर १८ व्या शतकात बांधले गेले. शंकराचार्यांनी या ठिकाणी गंगादेवीची मूर्ती स्थापन केली होती. पुढे गोरखा सेनापती अमरसिंह थापा यांनी मंदिर आणखी सुबक बांधले. तर २० व्या शतकात जयपूरचे राजा माधो सिंग याने मंदिराचा जीर्णोद्धार केला. 

गंगोत्री मंदिर पांढऱ्या शुभ्र ग्रॅनाईटपासून बनवलेले आहे. शिवलिंगाच्या रूपात एक नैसर्गिक खडक भागीरथी नदीत बुडलेला आहे. हे दृश्य अतिशय सुंदर आणि आकर्षक आहे. गंगा नदीची पातळी कमी झाल्यावर संध्याकाळी गंगोत्री मंदिराजवळ त्या नदीत बुडलेल्या पवित्र शिवलिंगाचे दर्शन होते.

दरवर्षी मे ते ऑक्‍टोबर या काळात लाखो भाविक गंगोत्रीला गंगामातेचे दर्शन घ्यायला येतात. दिवाळीच्या सुमारास तेथील तपमान कमी होत असल्याने गंगोत्रीचे दर्शन पुढच्या सहा महिन्यासाठी स्थगित केले जाते.

Web Title: Ganga Saptami 2025: Today, on the occasion of Gangasaptami, know the source of the Ganges; You must visit this holy place!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.