गणेश चतुर्थीला(Ganesh Chaturthi 2025) गणपतीच्या आगमनाच्या वेळी पाऊस येणे हे शुभ मानले जाते. यामुळे गणेश भक्तांचा उत्साह द्विगुणित होतो आणि वर्षभर पाण्याचा प्रश्न मिटतो. गणपती आणि पाऊस हे एकाच वेळी येणे, हे गणेशभक्तांना सुखावह ठरते. अशातच ३० ऑगस्ट रोजी सूर्य पूर्वफाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करत आहे आणि या नक्षत्राचे वाहन म्हैस असणार आहे. हे वाहन धो धो पाऊस पडण्याची शक्यता वर्तवते. हे गणित नक्की कसे असते ते पाहू.
ज्योतिष शास्त्रानुसार एकूण २७ नक्षत्रं आहेत. त्यात पावसाची ९ नक्षत्रं आहेत. मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, मघा, हस्त, उत्तराषाढा, चित्रा, स्वाती! यात पावसाळी नक्षत्र पाऊस प्रिय असलेल्या वाहनावरून स्वार होऊन आले तर भरपूर पाऊस पडतो. त्यानुसार पावसाचा अंदाज घेता येतो.
मृग नक्षत्र: मृग नक्षत्राचे वाहन कोल्हा आहे. कोल्हा पावसाचा अंदाज देत नाही, त्यामुळे या काळात चांगला किंवा वाईट पाऊस येऊ शकतो.
आर्द्रा नक्षत्र: आर्द्रा नक्षत्राचे वाहन मोर आहे. मोराला पाऊस आवडतो, त्यामुळे या काळात जोरदार पाऊस पडतो.
पुनर्वसू नक्षत्र: पुनर्वसू नक्षत्राचे वाहन बेडूक आहे. बेडूक पावसाचे आगमन दर्शवतो, त्यामुळे या काळात चांगला पाऊस अपेक्षित असतो.
पुष्य नक्षत्र: पुष्य नक्षत्राचे वाहन गाढव आहे. गाढव जास्त पाऊस दर्शवत नाही.
मघा नक्षत्र: मघा नक्षत्राचे वाहन मोर आहे आणि ते जोरदार पाऊस दर्शवते.
हस्त नक्षत्र: हस्त नक्षत्राचे वाहन घोडा आहे. घोडा मध्यम पाऊस दर्शवतो.
नक्षत्र आणि वाहन बदलत असते. ३० ऑगस्ट रोजी पूर्वफाल्गुनी नक्षत्र म्हशीवर स्वार होऊन येत असल्याने जोरदार वृष्टी होण्याचे पंचांगाचे संकेत आहेत. त्यामुळे चातकाप्रमणे पावसाची आणि बाप्पाची वाट बघणाऱ्या पाऊस प्रेमींसाठी ही आनंदाची पर्वणी ठरेल हे निश्चित! चला तर या आनंदाच्या सरींमध्ये भिजून जाऊया.
(सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल)