Pradosh Shivratri Vrat 2026: २०२६ हे इंग्रजी नववर्ष सुरू होताच अनेक शुभ योग जुळून आलेले आहेत. २०२६ या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी महादेव शिवशंकरांना समर्पित प्रदोष व्रत होते. यानंतर आता जानेवारी महिन्याच्या मध्यावर पुन्हा प्रदोष व्रत आले असून, या महिन्याच्या सांगतेलाही प्रदोष व्रत येणार आहे. प्रदोष आणि शिवरात्रि एकाच दिवशी आल्याने या काळातील शिवपूजनाला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाल्याचे सांगितले जात आहे. पौष महिन्यातील वद्य त्रयोदशीला येणाऱ्या प्रदोष व्रता दिवशीच मासिक शिवरात्रि व्रतही आले आहे. जाणून घेऊया...
प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या दोन्ही पक्षांत म्हणजेच शुद्ध आणि वद्य त्रयोदशी तिथीला पाळले जाते. हे व्रत भगवान शिवाला समर्पित आहे. शुक्रवारी प्रदोष येत असल्यामुळे याला शुक्र प्रदोष असे म्हटले जाते. शुक्रवार या दिवसावर शुक्र ग्रहाचा अंमल असतो. शुक्र प्रदोष या दिवशी महादेवांसोबत शुक्र ग्रहाशी संबंधित उपाय, उपासना करावी, असे सांगितले जाते. कुंडलीतील शुक्र ग्रहाची स्थिती कमकुवत असेल आणि प्रतिकूल प्रभाव कमी करायचा असेल, तर शुक्र प्रदोष व्रत आवर्जून करावे असे सांगितले जाते. शुक्रवार, १६ जानेवारी २०२६ रोजी प्रदोष व्रत पूजन असून, प्रदोष व्रताच्या पूजेची वेळ सायंकाळी ७ ते ८ वाजताच्या दरम्यान शुभ मानली गेली आहे.
प्रदोष व्रतात शिव पूजनाचे महत्त्व
प्रदोष व्रत हे प्रत्येक वारानुसार वेगवेगळे फळ देणारे असते. हे व्रत केल्यामुळे भाग्य, आरोग्य, संपत्ती, आनंद, शांती, प्रेम, कर्जमुक्ती आणि बरेच शुभ परिणाम मिळतात तसेच सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. प्रदोषाच्या दिवशी भगवान शिव, देवी पार्वती, भगवान गणेश आणि कार्तिकेय यांची पूजा केली जाते. प्रदोष व्रताची पूजा सायंकाळी केली जाते. तिन्हीसांजेला, दिवेलागणीला प्रदोष काळी प्रदोष व्रताचरण आणि पूजन करावे, असे सांगितले जाते. सर्व दोषातून मुक्त करणारे व्रत म्हणजे प्रदोष व्रत आणि भगवान महादेवाची प्रिय तिथी म्हणजे शिवरात्रि एकाच दिवशी येणे सामान्य मानले जात नाही. कमीवेळा असा योग जुळून येतो. प्रदोष व्रत हे अत्यंत महत्त्वाचे व्रत मानले जाते. प्रदोष व्रत भोलेशंकर भगवान शिव यांना समर्पित असल्याचे मानले जाते.
प्रदोष व्रत आणि शिवरात्रि व्रत पूजन विधी
प्रदोष व्रतामध्ये त्या दिवसाच्या प्रदोष काळात म्हणजेच तिन्हीसांजेला, दिवेलागणीच्या वेळेला महादेव शिवाची पूजा केली जाते. महादेवांचे पूजन झाल्यानंतर शिव पंचाक्षर मंत्र 'ॐ नमः शिवाय'चा यथाशक्ती जप करणे लाभदायक मानला जाते. शिवरात्रिच्या दिवशी सकाळी शिवमंदिरात जाऊन महादेवांचे दर्शन घ्यावे. शक्य असल्यास रुद्राभिषेक किंवा जलाभिषेक करावा. अनेक भाविक या दिवशी संपूर्ण दिवस उपास करतात. महादेवांची षोडषोपचार पद्धतीने पूजा करावी. षोडषोपचार पद्धतीने पूजा करणे शक्य नसेल, तर पंचोपचार पद्धतीने पूजन करावे. आपापले कुळधर्म आणि कुळाचार, परंपरा पाळून पूजन करावे. बेलपत्र, फुले अर्पण करावीत. धूप, दीप, नैवेद्य दाखवून आरती करावी. मनोभावे प्रसाद ग्रहण करावा. यानंतर महादेवांचे नामस्मरण, स्तोत्र पठण करावे, असे सांगितले जात आहे. शक्य असल्यास या दोन्ही व्रतपूजनात १०८ बिल्वपत्रे महादेवांना अर्पण करावीत.
प्रदोष काळात शिव आणि पार्वतीचे पूजन
काही पौराणिक उल्लेखानुसार, प्रदोष काळात शिव आणि पार्वतीची पूजा केल्याने संकटे दूर होऊ शकतात. भोलेनाथ हे महादेव, महाकाल, त्रिकालदर्शी आहेत. शंकराला समर्पित या तिथीचे व्रत केल्यास अनेक लाभ मिळू शकतात. सुख, ऐश्वर्य, वैभव, सौभाग्य प्राप्त होऊ शकते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. प्रदोष हे शंकराला समर्पित व्रत असून, यामुळे मनोकामना पूर्ण होऊ शकतात. कुटुंबात सुख, समृद्धी वृद्धी होऊ शकते. यासह अनेकविध प्रकारचे लाभ प्राप्त होऊ शकतात, असे सांगितले जाते.
शुक्र ग्रहाशी संबंधित मंत्र जप, उपाय उपयुक्त
शुक्र प्रदोष व्रत शुक्र ग्रहाशी संबंधित असल्यामुळे या व्रतामुळे शुक्र ग्रहासंदर्भातील दोष दूर होऊ शकतो, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. या दिवशी केलेल्या व्रतामुळे कुंडलीतील शुक्र ग्रहाचा प्रतिकूल प्रभाव कमी होऊ शकतो, असे म्हटले जाते. शिवाच्या उपासनेमुळे कुंडलीतील शुक्र ग्रह मजबूत होऊ शकतो, प्रतिकूल प्रभाव कमी होऊ शकतो, शुक्र ग्रहाचे काही दोष असतील, तर त्यासंबंधीचे काही उपाय केल्यास काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो, असे सांगितले जाते. तसेच हिमकुन्दमृणालाभं दैत्यानां परमं गुरुम्। सर्वशास्त्रप्रवक्तारं भार्गवं प्रणमाम्यहम्॥, हा शुक्राचा नवग्रह स्तोत्रातील मंत्र आहे. ॥ॐ द्रां द्रीं द्रौं स: शुक्राय नम:॥, हा शुक्राचा बीज मंत्र असल्याचे सांगितले जाते. ॥ॐ अश्वध्वजाय विद्महे धनुर्हस्ताय धीमहि तन्नः शुक्रः प्रचोदयात्॥, ॥ॐ रजदाभाय विद्महे भृगुसुताय धीमहि तन्नो शुक्र: प्रचोदयात्॥, हे दोन शुक्राचे गायत्री मंत्र आहेत. कुंडलीत शुक्र कमकुवत असेल तर लक्ष्मी देवीची उपासना, विशेष पूजन करावे असे सांगितले जाते. तसेच पांढऱ्या रंगाचा समावेश असलेले वस्त्र दान करावे. शुक्रवारी विशेष व्रताचरण करावे, असे काही उपाय सांगितले जातात.
प्रदोष व शिवरात्रि व्रतात जप करायचे अत्यंत प्रभावी शिव मंत्र
महामृत्युंजय मंत्र
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात्॥
मृत्युंजयाय रुद्राय नीलकण्ठाय शम्भवे। अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः।।
शिव नामावली मंत्र
।। श्री शिवाय नम:।।
।। श्री शंकराय नम:।।
।। श्री महेश्वराय नम:।।
।। श्री सांबसदाशिवाय नम:।।
।। श्री रुद्राय नम:।।
।। ॐ पार्वतीपतये नम:।।
।। ॐ नमो नीलकण्ठाय नम:।।
शिव गायत्री मंत्र
ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि, तन्नो रुद्रः प्रचोदयात्।
॥ ॐ नमः शिवाय ॥
॥ हर हर महादेव ॥
Web Summary : In 2026, Pradosh Shivratri unites, enhancing Shiva worship. Observing the fast on Triyodashi brings blessings. Shiva and Parvati are worshiped in the evening. Recite mantras for prosperity and planetary harmony. Performing specific rituals during this time can alleviate malefic planetary effects.
Web Summary : 2026 में प्रदोष शिवरात्रि का अद्भुत संयोग, शिव पूजा का महत्व बढ़ा। त्रयोदशी पर व्रत रखने से मनोकामनाएं पूरी होती हैं। शाम को शिव और पार्वती की पूजा करें। समृद्धि और ग्रहों की शांति के लिए मंत्रों का जाप करें। इस दौरान विशिष्ट अनुष्ठान करने से ग्रहों के दुष्प्रभाव कम होते हैं।