संकष्टीचे व्रत शीघ्र फलदायी आहे, त्याबाबत एक पौराणिक कथादेखील सांगितली जाते; ती अशी... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2021 08:00 IST2021-09-24T08:00:00+5:302021-09-24T08:00:07+5:30

दर महिन्याला आपण न चुकता संकष्टीचा उपास करतो. आज संकष्टी निमित्त त्यामागील पौराणिक कथादेखील जाणून घेऊया. 

The fast of Sankashti is quickly fruitful, a myth is also told about it; read on... | संकष्टीचे व्रत शीघ्र फलदायी आहे, त्याबाबत एक पौराणिक कथादेखील सांगितली जाते; ती अशी... 

संकष्टीचे व्रत शीघ्र फलदायी आहे, त्याबाबत एक पौराणिक कथादेखील सांगितली जाते; ती अशी... 

गणपती बाप्पाचे कोणतेही रूप घ्या, ते गोडच वाटते. म्हणून तर लहान मुलांपासून कसलेल्या चित्रकारांपर्यंत सर्वांनाच त्याचे मोहक रूप चितारावेसे वाटते. गणेश देवस्थान कुठेही असो, तिथे गेल्यावर बाप्पाच्या दर्शनाने प्रसन्न वाटते. म्हणून तर त्याला मंगलमूर्ती म्हणतात. अशा या आपल्या आवडत्या बाप्पाची कृपादृष्टी राहावी म्हणून आपण दर महिन्याला संकष्टीचा उपास करतो. संकष्टीचे व्रत शीघ्र फलदायी आहे असे म्हणतात.  संकट दूर करणाऱ्या बाप्पाच्या आवडत्या संकष्ट चतुर्थीबाबत एक पौराणिक कथा सांगितली जाते, ती अशी... 

साम नावाचा एक दुष्ट असुर होता. तो वाटमारी करून वर शिवाय त्या लोकांना ठार मारीत असे. एकदा तो वाटमारी करण्यासाठी झाडावर दबा धरून बसला होता. पण त्या दिवशी त्याला वाटमारीसाठी कुणीच भेटले नाही. त्यामुळे त्याला उपास घडला. रात्री चंद्रोदय झाल्यावर तो घरी आला. त्याने आपला मुलगा गणेश याला हाक मारली. परंतु गणेशाला ती हाक ऐकू आली नाही. म्हणून तो दारापाशी थांबून अविरत गणेश, गणेश, गणेश अशा हाका मारू लागला. खूप वेळाने त्याची हाक गणेशाच्या कानावर पडली व त्याने दार उघडले. सामाच्या बायकोने स्वयंपाक करून ठेवला होता. मग त्यांनी एकत्र भोजन केले. 

या दिवशी गणपतीची आवडती चतुर्थी तिथी होती. सामाकडून त्या दिवशी नकळत गणेशाचा जप घडला आणि कामाच्या शोधात दिवसभर उपास घडला. चंद्रोदयानंतर भोजन झाले. याचा एकत्रित परिणाम असा झाला, की सामाच्या ठायी पुण्याचा संचय झाला आणि मृत्यूनंतर त्याला स्वर्गप्राप्ती झाली. 

परंतु संपूर्ण आयुष्यात आपल्या हातून वाटमारी करताना अनेकांची हत्या झाली, याचे दु:खं त्याला स्वर्गात गेल्यावर होऊ लागले. ते पापक्षालन व्हावे अशी त्याची इच्छा होती. म्हणून देवांनी त्याला पुन्हा मानव जन्मात घातले. कृतवीर्य नावाने तो पृथ्वीवर परत आला. त्याचा विवाह झाला. पण पुत्रप्राप्ती नव्हती. त्यामुळे त्याच्या मनाला शांतता नव्हती. चतुर्थी व्रताने मनोकामना पूर्ण होतात, हे तो जाणून होता. म्हणून तो मनोभावे गणपतीची आराधना करू लागला. त्याला पुत्रप्राप्ती झाली. त्याचे कुटुंब-घरदार सुखी झाले. ही हकीकत अन्य गणपती भक्तांना कळले आणि तेव्हापासून तेदेखील संकष्ट चतुर्थीचे व्रत करू लागले.

कृतवीर्याप्रमाणे आपल्याही मनोकामना पूर्ण होवोत आणि आपल्यालाही सद्गती प्राप्त होवो, यासाठी आपणही संकष्ट चतुर्थीचे व्रत अंगिकारूया. 

Web Title: The fast of Sankashti is quickly fruitful, a myth is also told about it; read on...