डोळा लवतो ती खरंच शुभवार्तेची चाहूल असते?... काय आहे हे कनेक्शन?... जाणून घ्या

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: October 9, 2020 09:33 PM2020-10-09T21:33:52+5:302020-10-10T18:26:13+5:30

कामाचा ताण, डोळ्याचा कोरडेपणा किंवा एखादा जंतूसंसर्ग झाला, तर काही क्षणांसाठी डोळा लवतो. मात्र, या एका घटनेमागे जोडलेला मानसिक विचार खूप आधार देणारा ठरतो. 

eye twitching myth and truth | डोळा लवतो ती खरंच शुभवार्तेची चाहूल असते?... काय आहे हे कनेक्शन?... जाणून घ्या

डोळा लवतो ती खरंच शुभवार्तेची चाहूल असते?... काय आहे हे कनेक्शन?... जाणून घ्या

googlenewsNext

ज्योत्स्ना गाडगीळ

कधी कधी कोणाच्या विश्वासावर विश्वास ठेवावा. नाही म्हणजे, हे काही शास्त्रात सांगितले नाही, पण मानसशास्त्रात नक्कीच सांगितले आहे. एखाद्या गोष्टीचे दुष्परिणाम नसतील आणि आपण 'हो' म्हटल्याने कोणाला दिलासा मिळत असेल, तर सूरात सूर मिसळायला काहीच हरकत नाही. 'असे काही नसते' म्हणत समोरच्याच्या भावना दुखावण्यापेक्षा 'मम' म्हणत एखाद्या गोष्टीला पुष्टी द्यावी. याला अंधश्रद्धेला खतपाणी घालणे म्हणत नाहीत, तर मन राखणे असे म्हणतात. अशीच एक भोळी भाबडी समजूत,

डावा डोळा लवतोय, म्हणजे शुभवार्ता समजणार!

डोळा लवणे, याचे शास्त्रीय कारण अगदी क्षुल्लक आहे. कामाचा ताण, डोळ्याचा कोरडेपणा किंवा एखादा जंतूसंसर्ग झाला, तर काही क्षणांसाठी डोळा लवतो. मात्र, या एका घटनेमागे जोडलेला मानसिक विचार खूप आधार देणारा ठरतो. 

हेही वाचा: दक्षिण दिशेकडे पाय करून का झोपू नये? दक्षिण दिशा अशुभ का मानतात? जाणून घ्या!

मनुष्याला जगायला आशेचा एक किरण पुरेसा असतो. कधी न घडणारी गोष्ट अचानक घडू लागली, की आपण त्या कृतीमागचा अर्थ शोधू लागतो. त्यातही सोयीस्कर सकारात्मक अर्थ काढून मनाची समजूत घालणे, हा तर मनुष्यस्वभाव! डावा डोळा लवणे, या क्रियेचा संबंध शुभवार्तेशी लावून मनुष्य मोकळा झाला. पण, बिचाऱ्या  उजव्या डोळ्याची आपबिती ऐकून, तो पुरुषांसाठी शुभ ठरवला गेला. यात तथ्य किती हा भाग वेगळा, परंतु, चांगल्या विचारांनी काही चांगले घडावे, एवढाच त्यामागचा हेतू. 

हेही वाचा : 'मांजर आडवी गेली की काम होत नाही', हा भन्नाट 'शोध' कुणी, कसा आणि का लावला माहित्येय?

कवयित्री शांता शेळकेसुद्धा लवणाऱ्या डाव्या डोळ्यामागील स्त्रीमन आपल्या काव्यातून रेखाटतात, 

माजो लवतोय डावा डोळा, जाई-जुईचो गजरो माळता,
रतन अबोली केसात फुलता, काय शकुन गो सांगताय माका...!

काहीतरी छान घडणार, ही आशा माणसाला जगायला बळ देते. वाईट गोष्टी घडतच असतात, परंतु चांगल्या गोष्टी घडण्यासाठी वाट बघावी लागते. सुख-दु:खाच्या हिंदोळ्यावर झुलणारे आपले मन शुभ शकुनांमुळे अधिक वेग घेते. आकाशाला हात लावू पहाते. याउलट, काही विपरित घडले, की आधीच बिथरलेले मन संशयानी झाकोळून जाते. अशा वेड्या मनाला उभारी मिळावी, म्हणून या समजुती...

एकदा, एका लहान मुलाच्या धक्क्याने पाहुण्यांच्या घरी, परदेशातून आणलेली काचेची फुलदाणी फुटली. रंगात आलेल्या गप्पा-गोष्टींना खळ्ळ्खट्याक झाल्यामुळे एकाएक थांबल्या. टाचणीच्या आवाजानेही कानठळ्या बसतील, एवढी शांतता घरात पसरली. चुप्पी कोण तोडणार, सगळे याच विचारात होते. लहान मुलाला तर आज आपली कोणीही गय करणार नाही, हे चित्र स्पष्टच दिसत होते. त्यावेळी, त्या घरातल्या आजी पुढे सरसावल्या आणि मुलाला जवळ घेत त्यांनी म्हटले, 'तुझ्यामुळे घरावर येणारे मोठ्ठे अरिष्ट टळले.' आजींच्या एका वाक्याने वातावरणात सहजता आली. राग, द्वेष, नुकसान सर्व गोष्टींचा क्षणात निचरा झाला. आता, याला अंधश्रद्धा म्हणाल, की समजुतदारपणा? तीच बाब डाव्या डोळ्याची आहे. डोळ्याच्या लवण्याने कोणाचे भले होत असेल, तर होऊ द्या, त्यांच्यावर तुम्ही डोळे काढू नका. 

हेही वाचा: पिंपळावर मुंज्या असतो?...छेः हो, रात्रीच्या वेळी पारावर न जाण्यामागचं खरं कारण वेगळंच; जाणून घ्या! 

Web Title: eye twitching myth and truth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.