'जो बोले सो निहाल, सत श्री अकाल' असा जयघोष करणारे गुरु गोविंद सिंह यांचे अनुकरणीय विचार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2024 13:11 IST2024-01-17T13:11:19+5:302024-01-17T13:11:43+5:30
आज गुरु गोविंद सिंह यांची जयंती, त्यांच्या धर्म विचारांचे आजही शीख बांधव कट्टरतेने पालन करतात, ते विचार आपणही जाणून घेऊ.

'जो बोले सो निहाल, सत श्री अकाल' असा जयघोष करणारे गुरु गोविंद सिंह यांचे अनुकरणीय विचार!
शिखांचे दहावे धर्मगुरु, कवी, योद्धा, तत्ववेत्ता आणि मार्गदर्शक गुरु गोविंद सिंह यांची आज जयंती आहे. त्यांचा जन्म पटना येथे झाला. तिथे त्यांनी शिखांचे धर्मस्थळ गुरुद्वारा उभारले होते. तिथेच त्यांनी गुरुग्रंथ साहेब याला धर्मग्रंथ म्हणून मान्यता दिली. आजही शीख बांधव त्यांच्या विचारांचे पालन करतात.
सेवेत वाहून घ्या : आपले आयुष्य केवळ स्वत:साठी न जगता इतरांच्या सेवेत घालवा. गोरगरिबांना मदत करा. अडल्या-नडलेल्यांची विचारपूस करा. आत्मकेंद्री न होता, समाजभिमुख व्हा.
गुरुबानी पाठ करा : आपल्या जीभेला चांगले वळण लावायचे असेल, तर स्तोत्रपठणाला पर्याय नाही. गुरु गोविंदांनी शीख बांधवांना गुरुबानीचा मंत्र दिला, तसा आपणही रामरक्षा, मारुतीस्तोत्र, गीता, गीताई मुखोद्गत करून रोज पठण करू शकतो.
धर्माचे पालन करा : धर्म म्हणजे धारणा. प्रत्येकाचे जगण्याचे एक ध्येय असते. ते मिळवण्यासाठी कर्माची सांगण घालणे म्हणजे धर्माचे पालन करणे. हे पवित्र कार्य प्रामाणिकपणे केले पाहिजे.
कामचुकारपणा नको : आपले काम ही आपली ओळख बनली पाहिजे. कामातील सातत्य आपल्याला परमेश्वराच्या सेवेचा आनंद देते. म्हणून जबाबदारी झटकू नका आणि कामचुकारपणाही करू नका.
धन, तारुण्य आणि कुळाचा अभिमान बाळगू नका : या तीनही गोष्टींचा अभिमान बाळगणे व्यर्थ आहे. धन अर्थात लक्ष्मी चंचल आहे, तारुण्य क्षय होणारे आहे आणि कुळ ही तुमची ओळख नसून ते तुमच्या जन्माचे माध्यम आहे, ध्येय नाही.
अपेयपान किंवा अभक्ष्यभक्षण करू नका : धर्माने आपल्याला हिंसा शिकवलेली नाही. म्हणून शाकाहाराचा अवलंब करा. तसेच मद्याचा पेला किंवा तंबाकू आदि व्यसनादि गोष्टींचे सेवन आयुष्य संपवून टाकते. त्यांच्या आहारी जाऊ नका. सात्विक पण सकस आहार करा आणि भरपूर व्यायाम करा.
निंदा, चुगळी किंवा मत्सर करू नका : लोकांना कोणाच्याही पाठीमागे बोलण्याची सवय असते. असे बोलणे म्हणजे अप्रत्यक्षपणे दुसऱ्याचा अपमान करणे आहे. अपमान करणे हे पाप आहे. म्हणून कोणाबद्दल चांगले बोलता येत नसेल, तर गप्प राहा पण वाईट बोलू नका.
शब्दाला जागा : आपल्या शब्दामुळे कोणाला दिलासा मिळणार असेल आणि दिलेला शब्द आपल्याला पूर्ण करता येणार असेल, तरच शब्द द्या आणि दिलेल्या शब्दाला जागा. अर्थात वचनपूर्ती करा. अन्यथा लोक तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाहीत.
अधर्मी लोकांना थारा देऊ नका : जे चूक आहे, त्याचा निषेध करा. ते असत्य आहे, त्याला विरोध करा. जो गुन्हा आहे, त्याला साम, दाम, दंड, भेद वापरून शिक्षा द्या आणि निरपराध्याला न्याय मिळवून द्या.
आपल्या कमाईचा दहावा भाग दान द्या : आपल्या हाताला दानाची सवय लागावी आणि आपल्या संपत्तीचे योग्य चयन व्हावे, म्हणून दान करण्याची सवय लावा. जगात घेणारे हात अनेक आहेत, तुम्ही देणारे हात व्हा!