कृष्णालाही भुरळ पाडणारी, मीराबाईंच्या भजनाची अवीट गोडी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 22:47 IST2020-12-07T22:46:22+5:302020-12-07T22:47:17+5:30

मीराबाईंची पदे गोड आहेत. त्यातील भक्तीभावनेची आर्तता हृदयस्पर्शी आहे.

Even Krishna is fascinated by the sweetness of Mirabai's bhajan! | कृष्णालाही भुरळ पाडणारी, मीराबाईंच्या भजनाची अवीट गोडी!

कृष्णालाही भुरळ पाडणारी, मीराबाईंच्या भजनाची अवीट गोडी!

मीराबाई या प्रसिद्ध संत कवयित्रींचा जन्म मारवाड प्रांतातील कुडकी या गावी इ.स. १५१२ मध्ये झाला. श्रीरतनसिंहजी राठोड यांच्या त्या एकुलत्या एक कन्या. त्या लहान असताना एका साधूने श्रीकृष्णाची एक सुंदर मूर्ती त्यांना दिली. लहानग्या मीरेचे चित्त सतत त्या मूर्तीकडे लागले. श्रीकृष्णाच्या पूजेअर्चेत ती आपला वेळ घालवू लागली.

मीराबाई पंधरा वर्षांच्या झाल्यावर त्यांचा विवाह चितोडचे राजपुत्र भोजराजे यांच्याशी झाला. विवाहसमयी मीराबाईंनी वराच्या शेजारी श्रीकृष्णाची मूर्ती ठेवली. पतीबरोबर मीराबाई सासरी गेल्या खऱ्या, पण प्रपंचात मात्र रमल्या नाहीत. कुलाचाराप्रमाणे कुलदेवतेला नमस्कार करण्याची वेळ आली, तेव्हा म्हणाल्या, `मी कृष्णाशिवाय दुसऱ्या कुणालाही नमस्कार करणार नाही.' 

हेही वाचा :भगवंताचे अस्तित्व कसे ओळखावे? -ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

आपल्या पत्नीचे हे वागणे पाहून त्यांचा पती नाराज होता, पण त्यांनी सर्व प्रकारे कृष्णाला वरले आहे, हे पाहून त्याने मीराबाईसाठी स्वतंत्र महाल दिला व तिथे त्या मूर्तीची स्थापना केली. मीराबाई नेहमी त्या महालातच राहत असत. तिथे पदे गाऊन कृष्णाला आळवत असत. कधी कधी त्यांचा पती भोजराजा हाही महालात जाऊन त्यांची गोड पदे ऐकत बसे. विवाहानंतर दहा वर्षांनी भोजराजा दिवंगत झाला. पुढे त्याचा मोठा भाऊ विक्रमसिंह गादीवर बसला. मीराबाईच्या नादिष्टपणामुळे आपल्या कुळाला बट्टा लागतो, असे त्याला वाटले. राजाने मीराबार्इंना प्रसाद म्हणून विषाचा प्याला दिला. त्यांनी तो नि:षंक मनाने पिऊन टाकला. त्यांचा देह अखेरीस कृष्णाच्या मूर्तीत विलीन झाला.

मीराबाईंची पदे गोड आहेत. त्यातील भक्तीभावनेची आर्तता हृदयस्पर्शी आहे. जशी की ही-

हरिगुन गावत नाचुंगी,
अपने मंदिरमें बैठ बैठकर, गीता भागवत वाचूंगी।
ग्यान, ध्यानकी गठडी बांधकर, हरिहर संग मैं लागूंगी।
मीराके प्रभू गिरीधर नागर, सदा प्रेमरस चाखूंगी।

श्रीहरींच्या सद्गुणांचे गायन करत करत मी नाचेन. आपल्या मंदिरात आसनस्थ होऊन भगवद्गीता आणि श्रीमद्भागवत या धर्मग्रंथांचे वाचन करीन. ज्ञानमार्ग आणि ध्यानमार्ग यांच्याकडे मी मुळीच वळणार नाही. ज्ञान व ध्यान गुंडाळून ठेवीन. श्रीविष्णू व श्रीशंकर यांच्या चिंतनात मी मग्न होईन.

चलो मन गंगाजमुना के तीर,
गंगा जमुना निरमल पानी, शीतल होत सरीर,
बन्सी बजावत गावत काना, संगी लीये बलवीर,
मोर, मुकुट पीतांबर शोभे, कुंडल झलकत हीर,
मीरा कहे प्रभु गिरीधर नागर, चरणकरमलपर शीर।

गंगा यमुना या पवित्र नद्यांकडे जाण्याचे आवाहन मीराबाईंनी स्वत:च्या मनाला केले आहे. त्या नद्यांच्या पवित्र जलाने देह सुखावेल. तिथे बालकृष्ण मुरली वाजवेल. त्याच्याबरोबर मोठा भाऊ बलराम असेल. कृष्णाच्या मुकुटावर मोरपिस रोवलेले असेल. हिऱ्यांची कर्णभुषणे झळकत असतील. ते साजिरे रूप मनात साठवून घेईन.

मीराबाईंच्या गीतातील गोडवा केवळ अपूर्व आहे. काव्य म्हणजे भाषेतील संगीत हे वर्णन त्यांच्या पदांना लागू होते. 

हेही वाचा :जगातली सर्वात शांत जागा तुम्ही अनुभवली आहे का? - गौर गोपाल दास

Web Title: Even Krishna is fascinated by the sweetness of Mirabai's bhajan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.