अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 18:09 IST2025-12-19T18:08:34+5:302025-12-19T18:09:09+5:30
प्रेमानंद महाराजांच्या मते, वाईट नशीब किंवा संकटे दूर करण्यासाठी केवळ ईश्वराचे नामस्मरण आणि अनुष्ठान हाच खरा मार्ग आहे.

अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
मथुरेतील प्रसिद्ध प्रेमानंद महाराज यांच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येत असतात. अलीकडेच एका भक्ताने महाराजांना, 'आजकाल प्रत्येक जण आपले नाव बदलत आहे अथवा नावापुढे नंबर अथवा स्पेलिंग जोडत आहे, असे केल्याने, खरोखरच नशीब बदलू शकते का?' असा प्रश्न विचारला. यावर प्रेमानंद महाराजांनी अतिशय स्पष्ट शब्दांत उत्तर दिले.
नाव बदलल्याने किंवा स्पेलिंगमध्ये बदल केल्याने काहीही साध्य होत नाही -
प्रेमानंद महाराज म्हणाले, "जर असे प्रत्यक्षात झाले अशते, तर आपण स्वतःच करून बघा आणि मलाही सांगा. म्हणजे मलाही लोकांना सांगता येईल. नाव बदलल्याने किंवा स्पेलिंगमध्ये बदल केल्याने काहीही साध्य होत नाही. जर असे शक्य असते, तर सर्वांनीच ते केले असते. अशा प्रकारचे उपाय सांगणारे लोक केवळ सर्वसामान्यांना मूर्ख बनवण्याचे काम करतात. केवळ अंगठ्या घालणे, जंतर किंवा गंडे बांधणे यांसारख्या बाह्य गोष्टींनी प्रारब्ध बदलत नाही, असे ते म्हणाले.
प्रेमानंद महाराजांच्या मते, वाईट नशीब किंवा संकटे दूर करण्यासाठी केवळ ईश्वराचे नामस्मरण आणि अनुष्ठान हाच खरा मार्ग आहे. ते म्हणाले, "कधीकधी लोकांचे काम चुकून झाले तर त्यांना वाटते की ते स्पेलिंग बदलल्यामुळे झाले; पण प्रत्यक्षात ते त्यांच्या पूर्वीच्या पुण्याचे फळ असते, जे अचानक प्रकाशित होते."
दरम्यान, निरंतर नामजप आणि मंत्रांचे अनुष्ठान करा, सर्वांशी प्रामाणिकपणे वागा आणि कोणतेही पाप कृत्यापासून दूर रहा, स्वप्नपूर्तीसाठी कष्ट आणि साधनेची जोड द्या, गंगा-यमुना स्नान, तीर्थयात्रा आणि धर्माच्या मार्गाने चालणे यामुळेच जीवनात मंगल होईल, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.