देवळात गेल्यावर तुम्ही योग्य पद्धतीने देवाचे दर्शन घेता का? १० महत्त्वाच्या गोष्टी पाळाच!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 13:03 IST2025-10-30T13:01:49+5:302025-10-30T13:03:58+5:30
Mandir Darshan Rules: देवळात जाऊन देवाचे दर्शन घेताना काही नियम पाळावेत, असे सांगितले जाते.

देवळात गेल्यावर तुम्ही योग्य पद्धतीने देवाचे दर्शन घेता का? १० महत्त्वाच्या गोष्टी पाळाच!
Mandir Darshan Rules: भारतात संस्कृती आणि परंपरा यांमध्ये अनेक गोष्टींना अनन्य साधारण महत्त्व आहे. एखादी गोष्ट का करावी आणि का करू नये, याचे काही नियमही पाहायला मिळतात. या नियमांचा विचार केवळ धार्मिक, सांस्कृतिक दृष्ट्या केलेला नाही, तर तो शास्त्रीय दृष्ट्याही केलेला आढळून येतो. भारतात तीर्थस्थळे, मंदिरे यांची कमतरता नाही. प्रत्येक गावात एकतरी मंदिर आढळून येते. देशातील कोट्यवधी भाविक दररोज देवदर्शन घेतात. परंतु, देवळात जाऊन देवाचे दर्शन घेताना काही नियम पाळावेत, असे सांगितले जाते.
भारतात हजारो तीर्थस्थळांवर कोट्यवधी भाविकांची ये-जा असते. दररोज लाखो भाविक विविध ठिकाणच्या तीर्थस्थळांना भेटी देत असतात. कुलदेवी, कुलदेवता, आराध्य देवता यांचे आवर्जून दर्शन घेतले जाते. त्या स्थानाचे महात्म्य, महत्त्व यांचा विलक्षण अनुभव भाविक घेत असतात. अनेक भाविक अनेक प्रकारच्या अनुभवांनी समृद्ध होत असतात.
१० महत्त्वाच्या गोष्टी पाळाच!
- देवळात प्रवेश करण्यापूर्वी शक्य असल्यास पाय अवश्य धुवावेत.
- देवळाच्या आवारातून कळसाला नमस्कार करावा.
- देवळाच्या पायर्या चढतांना पायरीला नमस्कार करावा.
- देवतेला जागृत करत आहोत, या भावाने घंटा अतिशय हळू वाजवावी.
- देवतेच्या चरणांशी दृष्टी ठेवून लीन व्हावे. देवतेच्या डोळ्यांकडे पाहून तिचे रूप डोळ्यांत साठवावे.
- देवतेला अर्पण करायच्या वस्तू चरणांवर अर्पण कराव्यात. मूर्ती दूर असेल, तर ती वस्तू देवतेसमोरील ताटात ठेवावी.
- देवतेच्या चरणी लीन होत आहोत, या भावाने नमस्कार करावा. देवतेची मूर्ती आणि तिच्यासमोर असलेली प्रतिकृती यांच्यामध्ये उभे न राहता किंवा बसता, बाजूला उभे राहून हात जोडून विनम्रतेने दर्शन घ्यावे.
- दोन्ही हात जोडून भावपूर्ण नामजप करत मध्यम गतीने प्रदक्षिणा घालाव्यात. देवांना सम आणि देवींना विषम संख्येने प्रदक्षिणा घालाव्यात.
- प्रसाद शक्यतो देवळात बसूनच ग्रहण करावा. देवळात बसून थोडा वेळ नामजप करावा.
- देवळातून बाहेर पडण्यापूर्वी पुन्हा एकदा देवतेला नमस्कार करून, तुझी कृपादृष्टी माझ्यावर सदैव असू दे, अशी प्रार्थना करावी.
- देवळातून बाहेर पडत असतांना देवतेकडे आपली पाठ एकदम होणार नाही, याची काळजी घ्यावी.