श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती दररोज करता का? शुभ-लाभ होतात, स्वामी कायम सोबत राहतात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 15:32 IST2025-07-16T15:19:48+5:302025-07-16T15:32:51+5:30
Shree Swami Samarth Maharaj Aarti: स्वामी समर्थ महाराजांची दररोज आरती का करावी? नेमके त्यातून काय मिळते? जाणून घ्या...

श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती दररोज करता का? शुभ-लाभ होतात, स्वामी कायम सोबत राहतात!
Shree Swami Samarth Maharaj Aarti: श्री दत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ मानले जातात. श्री स्वामी समर्थ यांच्या प्रकट दिनाच्या निमित्ताने अक्कलकोटसह जिथे स्वामींचे मठ आहेत, स्वामींची मंदिरे आहेत, तिथे विशेष पूजन विधी, धार्मिक कार्यक्रम, उपासना, नामस्मरण केले जाते. स्वामी भक्तही स्वामी नामात आणि स्वामी स्वरुपात तल्लीन होऊन जातात. या दिवशी शक्य तेवढी स्वामींची सेवा करण्याकडे भाविकांचा अधिक कल असतो. स्वामींचे पूजन झाल्यावर स्वामींच्या विविध आरत्या, प्रदक्षिणा आणि मंत्र पुष्पांजली आवर्जून म्हणावी, असे सांगितले जाते.
भारतीय संस्कृती आणि परंपरा यांमध्ये आरती म्हणण्याच्या परंपरेला एक अनन्य साधारण महत्त्व आहे. आरती म्हणणे भक्ती भावाचे एक प्रतिक आहे. आरती म्हणजे देवांचे गुणगान करणे. देवाला प्रसन्न करण्यासाठी आणि त्याच्या कृपेसाठी आरती केली जाते. आरती ही भक्तिभावाने देवाला समर्पित होण्याची एक पद्धत आहे. आरती करताना भक्त पूर्णपणे देवाच्या भक्तीत तल्लीन होऊन जातो. आरती म्हणजे आराधना, देवाची उपासना करणे होय. आरती करताना आपले सर्वाधिक ध्यान देवाकडे असते. देवाशी एकरूप होण्याचा प्रयत्न आरती करताना होत असतो. आरती करताना निरांजन ओवाळले जाते. दिवा हे तेजाचे प्रतिक मानले जाते. दिवा लावल्याने पावित्र्य, चैतन्य आणि सकारात्मकता घरात येते. अंधार किती गडद असला, तरी एक पणती अंधाराशी दोन हात करण्याची शक्ती देते. त्यामुळे दिवा लावणे हे आशेचे लक्षण मानले जाते. आरतीच्या दिव्याच्या ज्योतीने परमेश्वर सर्व संकटे दूर करण्याचा प्रयत्न करत असतात. आरत्या त्या देवाच रूप , काम सांगणाऱ्या आहेत. शेवटी देवा तू ये अशी आळवणी केली जाते. या आळवणीला देव प्रतिसाद देतो, अशी मान्यता असल्याचे म्हटले जाते.
श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती दररोज करता का?
श्री स्वामी समर्थ आरती हे एक साधन नसून, त्यांच्या भक्तांनी त्यांच्या आराध्याला आदराने स्मरण करण्याची व प्रेमाची प्रतिमा आहे. आरतीचे महत्त्व प्राचीन आहे. आरतीने भक्तांना त्यांच्या आराध्याच्या सानिध्यात आणि दिव्यत्वात आत्मीय अनुभव करण्याची संधी देते. स्वामी समर्थ महाराजांची दररोज आरती म्हणावी, असे म्हटले जाते. आरती म्हटल्याने मनाला शांती मिळते आणि तणाव कमी होतो. घरातील आणि मनातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्याची ताकद आरती करण्यात असते. आरती म्हटल्याने घरात सकारात्मक वातावरण निर्माण करते. स्वामी समर्थांची आरती म्हटल्याने त्यांची कृपा आणि आशीर्वाद मिळतात. आरतीमुळे मानसिक आणि आत्मिक शांतता लाभते. आरती म्हटल्याने संकटे दूर होऊ शकतात, अडचणींवर मात करता येण्याची क्षमता निर्माण होऊ शकते. घरात आरती म्हटल्याने सुख-शांती नांदते आणि कुटुंबातील वाद कमी होतात. स्वामी समर्थांवरील श्रद्धा वाढते. स्वामी सेवा आणि भक्तीमध्ये दृढता येऊ शकते, असे म्हटले जाते. अक्कलकोट स्वामी समर्थ यांच्या आरतीने भक्तांना आत्मिक शांतता, संतोष आणि ध्यान प्रदान करते, असे मानले जाते.
श्री स्वामी समर्थ महाराज आरती - १
जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था
आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा !! जयदेव जयदेव..!!
छेली खेडेग्रामी तू अवतरलासी, जगदुध्दारासाठी राया तू फिरसी
भक्त वत्सल खरा तू एक होसी, म्हणूनी शरण आलो तुझिया चरणांसी !! जयदेव जयदेव..!!
त्रैगुण परब्रम्ह तुझा अवतार, याची काय वर्णू लीला पामर
शेषादीक शिणले नलगे त्या पार,तेथे जडमूढ कैसा करु विस्तार !! जयदेव जयदेव..!!
देवाधिदेव तू स्वामीराया, निर्जर मूनिजन ध्याती भावे तव पाया
तुजसी अर्पण केली आपली ही काया,शरणागता तारी तू स्वामीराया !! जयदेव जयदेव..!!
अघटित लीला करुनी जडमूढ उध्दरीले,किर्ती ऐकुनी कानी चरणी मी लोळे
चरण प्रसाद मोठा मज हे अनुभवले, तुझ्या सूता नलगे चरणावेगळे !! जयदेव जयदेव..!!
स्वामी समर्थ महाराजांची आरती - २
जय देव जय देव, जय जय अवधूता, हो स्वामी अवधूता।
अगम्य लीला स्वामी, त्रिभुवनी तुझी सत्ता।। जय देव जय देव॥धृ॥
तुमचे दर्शन होता जाती ही पापे।
स्पर्शनमात्रे विलया जाती भवदुरिते।
चरणी मस्तक ठेवूनि मनि समजा पुरते।
वैकुंठीचे सुख नाही या परते।।
जय देव जय देव॥१॥
सुगंध केशर भाळी वर टोपी टिळा।
कर्णी कुंडल शोभति वक्षस्थळी माळा।
शरणागत तुज होतां भय पडले काळा।
तुमचे दास करिती सेवा सोहळा।। जय देव जय देव॥२॥
मानवरुपी काया दिससी आम्हांस।
अक्कलकोटी केले यतिवेषे वास।
पूर्णब्रम्ह तूची अवतरलासी खास।
अज्ञानी जीवास विपरीत भास।। जय देव जय देव॥३॥
र्निगुण र्निविकार विश्वव्यापक।
स्थिरचर व्यापून अवघा उरलासी एक।
अनंत रुपे धरसी करणे नाएक।
तुझे गुण वर्णिता थकले विधीलेख।।
जय देव जय देव॥४॥
घडता अनंत जन्मे सुकृत हे गाठी।
त्याची ही फलप्राप्ती सद्-गुरुची भेटी।
सुवर्ण ताटी भरली अमृत रस वाटी।
शरणागत दासावर करी कृपा दृष्टी।।
जय देव जय देव॥५॥
श्री स्वामी समर्थ आरती - ३
जय जय सद्-गुरु स्वामी समर्था,
आरती करु गुरुवर्या रे।
अगाध महिमा तव चरणांचा,
वर्णाया मति दे यारे ॥धृ॥
अक्कलकोटी वास करुनिया,
दाविली अघटित चर्या रे।
लीलापाशे बध्द करुनिया,
तोडिले भवभया रे ॥१॥
यवन पूछिले स्वामी कहॉ है,
अक्कलकोटी पहा रे।
समाधी सुख ते भोगुन बोले,
धन्य स्वामीवर्या रे ॥२॥
जाणिसे मनीचे सर्व समर्था,
विनवू किती भव हरा रे।
इतुके देई दीनदयाळा,
नच तव पद अंतरा रे ॥३॥
श्री स्वामी समर्थ महाराज आरती - ४
आरती स्वामी राजा।
कोटी आदित्यतेजा। तु गुरु मायबाप।
प्रभू अजानुभुजा। आरती स्वामी राजा॥धृ॥
पुर्ण ब्रम्ह नारायण।
देव स्वामी समर्थ। कलीयुगी अक्कलकोटी।
आले वैकुंठ नायक। आरती स्वामी राजा ॥
लीलया उद्धरिले।
भोळे भाबडे जन। बहुतीव्र साधकासी।
केले आपुल्या समान। आरती स्वामी राजा ॥
अखंड प्रेम राहो।
नामी ध्यानी दयाळा। सत्यदेव सरस्वती।
म्हणे आम्हा सांभाळा। आरती स्वामी राजा॥३॥
।। श्री स्वामी समर्थ ।।
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.