Diwali 2023: दिवाळीचा अर्थ असाही असू शकतो, याचा आजवर आपण कधी विचारही केला नसेल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 07:00 IST2023-11-01T07:00:00+5:302023-11-01T07:00:02+5:30
Diwali 2023: दिवाळी म्हटलं की फराळ, फटाके, नातेवाईक, सुट्ट्या एवढाच त्याचा आवाका नाही, तर त्यामागचा अध्यात्मिक दृष्टिकोनही समजून घ्या!

Diwali 2023: दिवाळीचा अर्थ असाही असू शकतो, याचा आजवर आपण कधी विचारही केला नसेल!
घरोघरी दिवाळीची तयारी आता अंतिम टप्प्यात आली असेल. आनंदाचे वातावरणही तयार झाले असेल. हे वातावरण, आनंद, उत्साह कायम टिकून राहावा. यासाठी, संतांनी प्रत्येक दिवस हा दिवाळीसारखा साजरा करायचा असे ठरवले. म्हणून त्यांनी ज्ञानदीप लावण्याचा पर्याय निवडला. हा आनंद परमेश्वराला पाहण्यात आहे आणि परमेश्वर सर्वव्यापी आहे, याचाही त्यांना प्रत्यय आला. हा आत्मबोध झाल्यावर नामदेवांनी एक निश्चय केला, ते म्हणाले,
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी,
सर्व सांडुनी माझाई, वाचे विठ्ठल रखुमाई,
परेहुनी परते घर, तेथे नांदू निरंतर
सर्वांचे जे अधिष्ठान, तेचि माझे रूप पूर्ण,
अवघी सत्ता आली हाता, नामयाचा खेचर दाता।
मी आता कीर्तनाच्या रंगामध्ये बेहोष होऊन मोठ्या आनंदाने नाचेन. कीर्तनाच्या माध्यमातून बांधवांना सन्मार्ग दाखवून ज्ञानरूपी दिवा मी तेवत ठेवीन. विठ्ठल आणि रुख्मिणी यांचे भजन मी मुखाने करीन.
परा, पश्यंती, मध्यमा व वैखरी असे वाणीचे चार प्रकार आहेत. परा ही सर्वश्रेष्ठ वाचा होय, पण परमेश्वर या परा वाणीच्याही अतीत म्हणजे पलीकडे आहे. त्याचे घर परेहून परते आहे. त्या वाणीच्याही पलीकडे असे त्याच निवाससन आहे, त्याच ठिकाणी मी सदैव वास्तव्य करणार आहे. आत्मरूप श्रीविठ्ठलामध्ये मी मनाने एकरूप होणार आहे.
'कीर्तनाचेनि नटनाचे, नाशिल व्यवसाय प्रायश्चित्ताचे' असा कीतर्तनमहिमा ज्ञानेश्वरीच्या नवव्या अध्यायात सांगितलेला आहे. भक्त भाविक एकत्र जमतात, विठ्ठलनामाचा गजर करतात. नामसंकीर्तनात ते स्वत: तल्लीन होऊन जातातच. पण त्यांनी केलेल्या नामसंकीर्तनात ते स्वत: तल्लीन होऊन जातात. पण त्यांनी केलेल्या नामघोषामुळे प्राणिमात्रांची दु:खे नाहीशी होतात. सगळे जगच ब्रह्मसुखाने दुमदुमून जाते.
कीर्तनभक्ती ही वारकरी पंथाने समाजाला दिलेली मोठी देणगी आहे. नामदेवांनी या कीर्तनभक्तीचा प्रसार आणि प्रचार केला. सकळासि येथ आहे अधिकार, असे ते सर्वसमावेशक असते.
सुंभाचा करतोडा, रकट्याची लंगोटी,
नामा वाळुवंटी कीर्तन करी,
हे दृश्य सामान्य माणसाला जवळे वाटले. कीर्तनाच्या माध्यमातून ज्ञानदीप लावण्याची नामदेवांची प्रतिज्ञा म्हणजे ज्ञानोत्तर भक्तीची निशाणी आहे.
नेहमी वाईट गोष्टींची तक्रार करण्यापेक्षा चांगल्या गोष्टींचा प्रकाश पडावा, म्हणून एक तरी आशेचा दिवा लावणे जरूरी आहे. त्यातही तो ज्ञानदीप असेल, तर त्याच्या प्रकाशाने आपण आणि आपला सभोवतालचा परिसर निश्चितच प्रकाशित होईल. चला तर, आपणही दिवाळीच्या दिव्यांबरोबर ज्ञानाचाही दीप प्रज्वलित करूया.