Diwali 2022: वसुबारसेला गायवासराच्या पूजेने आणि प्रदक्षिणा घातल्याने पापक्षालन होते असे म्हणतात, त्याचा विधी जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2022 15:45 IST2022-10-20T15:41:22+5:302022-10-20T15:45:17+5:30
Diwali 2022: गोवत्स द्वादशी अर्थात वसुबारसेला गायवासराच्या पूजेची काय आहे शास्त्रशुद्ध पद्धत, जाणून घ्या!

Diwali 2022: वसुबारसेला गायवासराच्या पूजेने आणि प्रदक्षिणा घातल्याने पापक्षालन होते असे म्हणतात, त्याचा विधी जाणून घ्या!
वसुबारसेला गाय आणि वासराची पूजा करतात हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे, पण त्याचा शास्त्रशुद्ध विधी सर्वांनाच माहीत असतो असे नाही. गावाकडे आजही गोधन घराला लागून असलेल्या गोठ्यात असते. शहरात ती सुविधा नसली तरी गोशाळेत जाऊन आपल्याला ही पूजा नक्की करता येईल. तोही पर्याय उपलब्ध नसेल तर काय करायचे याबद्दल सविस्तर माहिती साताऱ्याचे संजय वामन केळकर यांनी दिलेल्या माहितीतून जाणून घेऊ.
गोवत्सद्वादशी पूजा - अश्विन कृष्ण ११ /१२ शके १९४४ शुक्रवार दिनांक २१ ऑक्टोबर २०२२ (पूजनाची वेळ सायंकाळी ५.२३ नंतर)
कर्त्याने सायंकाळी स्नान करावे. सवत्स गाय (वासरासह) आणावी. पश्चिमेकडे तोंड करुन गाईला उभे करावे. कर्त्याने सपत्नीक ( जोडप्याने ) पूर्वेकडे तोंड करुन उभे रहावे. मंगल तिलक कपाळाला लावून गणपती, कुलदेवता स्मरण करुन सर्व मोठ्या माणसांना नमस्कार करावा. (नमस्कार करताना पायांना हात लावून नमस्कार करू नये) आचमन करुन पुढील संकल्प करावा...
" मम आत्मनः सकल शास्त्र पुराणोक्त फल प्रात्यर्थम् श्रीपरमेश्वर प्रित्यर्थम्
मम अखिल पापक्षय पूर्वक कायिक, वाचिक, मानसिक सकल पातक दोष निरसनार्थम् ,
विश्व शांत्यर्थं, भारते रामराज्य प्राप्त्यर्थं अद्य दिने श्रीगोवत्स पूजनंच् करिष्ये " ।
विश्वशांतीसाठी संकल्प केला तर ७० टक्के पुण्य मिळते आणि आपल्यासाठी संकल्प केला तर ३५ टक्के पुण्य मिळते त्यातील १० टक्के जमीन घेते. ज्यांना पूजा सांगणारे गुरुजी मिळणार नाहीत त्यांनी मनातच हा संकल्प करावा.
गाईची वासरासह पंचोपचार ( रोज देवाची करतो तशी ) पूजा करावी. तीन प्रदक्षिणा कराव्या. प्रदक्षिणा करताना प्रत्येक पाऊल टाकताना चुकून जी पातके झाली असतील त्यांचा प्रदक्षिणा करण्याने पाप नाश होतो. मात्र मुद्दाम केलेली पापे भोगावीच लागतात.
गाईला नमस्कार करताना पाठीमागे शेपटीकडे करावा. गाईला घंटा, वस्त्र, फुलांचा हार इ. आपल्या शक्तिप्रमाणे अर्पण करावे. नंतर गाईच्या मालकाला गंधाक्षत लावून यथाशक्ति दक्षिणा, नारळ , वस्त्र देणे.
ज्यांना वरील विधी काहीच करणे शक्य नसेल त्यांनी आपल्या गावात जिथे गाय असेल तिथे जाऊन आपल्या शक्तिप्रमाणे, बुध्दीप्रमाणे पूजा करावी व दर्शन घ्यावे. मात्र आजच्या दिवसाला गाईच्या दर्शनाविना राहू नका ही विनंती. गाईला नैवेद्य दाखवताना पेढे ,दूध , करंजी दाखवावा. शिवाय सरकी पेंड , भूसा, गवत इ. तिला खायला द्यावे.
अधिक माहितीसाठी संपर्क : 9850383671