शहरी भागात दिवाळी (Diwali 2025) सर्वांना माहीत असते, पण देवदिवाळी(Dev Diwali 2025) हा शब्द सोडला तर त्याची तिथी, तारीख आणि महत्त्व याबद्दल क्वचितच माहिती असल्याचे लक्षात येते. अशातच सोशल मीडियामुळे संभ्रम वाढण्यास हातभार लागतो तो वेगळा! त्यामुळे देवदिवाळी कशाला म्हणतात, का म्हणतात आणि ती कधी असते याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
उत्तर भारतातली आणि महाराष्ट्रातली देवदिवाळी वेगवेगळी; कारण...
सध्या जी देवदिवाळीची चर्चा सुरु झाली आहे, ती उत्तर भारतीयांची देवदिवाळी, जी त्रिपुरी पौर्णिमेला साजरी केली जाते. ते आपल्यापेक्षा वेगळे नाहीत फक्त पंचांग पद्धतीत फरक आहे. महाराष्ट्र आणि लगतच्या भागांमध्ये वापरल्या जाणाऱ्या पंचांगानुसार अमावस्या झाली की, दुसऱ्या दिवसापासून नवीन महिना सुरु होतो. तर उत्तर भारतीयांच्या पंचांगानुसार पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी नवीन महिना सुरु होतो. हा १५ दिवसांचा फरक येतो कारण दोन्ही पद्धती एकाच चांद्र महिन्याला वेगवेगळ्या दिवसांपासून मोजायला सुरुवात करतात. मात्र चतुर्थी, एकादशी, पौर्णिमा, अमावस्या ही तिथी भारतभर एकाच वेळी साजरी केली जाते.
त्याबरोबरच प्रांतवार सणांचे महत्त्व वेगवेगळे असते. देवदिवाळी बाबत सांगायचे तर उत्तर भारतीय लोक त्रिपुरी पौर्णिमेला भगवान महादेवाने त्रिपुरासुर नावाच्या दैत्याचा वध केला होता म्हणून तो विजयोत्सव देवदिवाळी म्हणून साजरा करतात, तर महाराष्ट्रात मार्गशीर्ष प्रतिपदेला देव दिवाळी साजरी केली जाते, कारण त्यादिवशी खंडोबाचे षडरात्र अर्थात सहा दिवसांचा उत्सव सुरु होतो, तो चंपाषष्ठीला संपतो, म्हणून या उत्सवाला देवदिवाळी संबोधून ती साजरी करतात.
महाराष्ट्रात देव दिवाळी कधी? तर...
मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेस 'देवदिपावली' किंवा 'देवदिवाळी' हा सण येतो. त्यानुसार २१ नोव्हेंबर २०२५ रोजी यंदाचा मार्गशीर्ष मास सुरू होत आहे. या मासाचा पहिला दिवस प्रतिपदेचा, तोच देव दिवाळी(Dev Diwali Date 2025) म्हणून साजरी केला जाईल. हा सण मुख्यत्वे कोकणप्रांतीय लोकांमध्ये साजरा केला जातो. आपण जेव्हा अश्विन-कार्तिक महिन्यांमध्ये दिवाळी साजरी करतो, तेव्हा चार्तुमास सुरू असतो. भगवान विष्णू निद्रावस्थेत असतात. कार्तिक शुक्ल एकादशीला ते जागे होतात. त्यावेळी चार्तुमासही संपतो. म्हणून मार्गशीर्ष महिन्यात ही खास देवांची दिवाळी साजरी केली जाते. त्यानिमित्ताने सर्व देवदेवतांचे स्मरण हा देवदिवाळी सणाचा हेतू असतो.
Tulasi Vivah 2025: विष्णू हे लक्ष्मीपती असूनही दरवर्षी तुळशीशी का लावला जातो विवाह?
देव कोणकोणते?
आपल्याकडे तेहेतीस कोटी देव अशी संकल्पना आहे. यात कोटी हा शब्द मराठीत नसून संस्कृतातील आहे. संस्कृत भाषेत कोटी शब्दाचा अर्थ प्रकार असा आहे. ईश्वराने निसर्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी ३३ देवांना कार्यभार सोपवला. त्यांच्यात ८ वसू, ११ रूद्र, १२ आदीत्य, १ इंद्र आणि १ प्रजापती असे पाच स्तर आहेत. प्रत्येकाचे कार्य (खाते) भिन्न असल्याने प्रत्येकाला वेगवेगळे प्रकार सोपवण्यात आले. असे एकूण ३३ प्रकार झाले, त्याला तेहेतीस कोटी देव संबोधण्यात आले. अशा सर्व देवांचे स्मरण म्हणजे देवदिवाळी!
अशी साजरी करतात देवदिवाळी -
देवदीपावलीचे वेळी देव्हाऱ्यात तेलातुपाचे दिवे लावून ठेवावेत. देव्हाऱ्यातील देवांना पंचामृताचा अभिषेक करून अत्तर लावून गरम पाण्याने स्नान घालावे. या दिवशी घरातील कुलदेवता व इष्टदेवता यांच्याखेरीज स्थानदेवता, वास्तुदेवता, ग्रामदेवता आणि गावातील अन्य देवता. उदा. महापुरुष, वेतोबा, उपदेवता यांना त्यांच्या मानाचा भाग अर्थात नैवेद्य दाखवला जातो. या सर्व देवदेवतांची वर्षातून आपल्याकडून एखादे दिवशी पूजा होऊन त्यांना नैवेद्य अर्पण होणे आवश्यक असते, म्हणून कोकणप्रांतीय लोक देवदिवाळीस 'देवांचे नैवेद्य' म्हणतात.
Shani Gochar 2025: शनिचा फेरा आपल्या राशीसाठी नेहमीच तापदायक ठरतो का? पाहूया भावानुसार फळ
देव दिवाळी विशेष नैवेद्याचे पदार्थ :
सद्यस्थितीत घरात विविध तळणीचे जिन्नस करून त्यांच्या सेवनाने हा विधी साजरा केला जातो. देवदीपावलीत आपापल्या प्रथेनुसार नेहमीच्या पदार्थांखेरीज ताटात पुरणाचे कडबू, भरड्याचे वडे, सांज्याचे घारगे, अळणी वडे, घावन-घाटले यातील पदार्थ नैवेद्यास ठेवतात. त्यापैकी एक नैवेद्य घरात घेतला जातो व एक नैवेद्य बाहेर कामकरी लोकांना दिला जातो. देवदीपावलीच्या निमित्ताने घरातील, गावातील व घराण्यात पूर्वापार चालत आलेल्या सर्व देवतांचा उल्लेख करून त्यांचा आदरसत्कार देवदीपावलीला केला जातो.
Web Summary : Dev Diwali's date varies due to different Panchang systems. North Indians celebrate on Tripuri Purnima, honoring Lord Shiva. Maharashtra marks it on Margashirsha Pratipada, starting Khandoba's festival. It's a celebration of all deities, offering special Naivedya.
Web Summary : देव दिवाली की तिथि विभिन्न पंचांग प्रणालियों के कारण भिन्न होती है। उत्तर भारतीय त्रिपुरी पूर्णिमा पर भगवान शिव का सम्मान करते हुए मनाते हैं। महाराष्ट्र में यह मार्गशीर्ष प्रतिपदा को खंडोबा के त्योहार की शुरुआत के रूप में मनाया जाता है। यह सभी देवताओं का उत्सव है, जिसमें विशेष नैवेद्य अर्पित किया जाता है।