मातृभूमीच्या सेवेसाठी संसारावर तुळशीपत्र ठेवणारे आद्यक्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांची पुण्यतिथि!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 07:05 IST2025-02-17T07:00:00+5:302025-02-17T07:05:01+5:30

दत्तभक्ती आणि देशभक्ती यांचा अपूर्व मेळ असलेले आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांची आज पुण्यतिथी; घेऊया त्यांच्या कार्याचा आढावा!

Death anniversary of Vasudev Balwant Phadke, the pioneer revolutionary who placed Tulsi leaves on the world to serve the motherland! | मातृभूमीच्या सेवेसाठी संसारावर तुळशीपत्र ठेवणारे आद्यक्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांची पुण्यतिथि!

मातृभूमीच्या सेवेसाठी संसारावर तुळशीपत्र ठेवणारे आद्यक्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांची पुण्यतिथि!

समाजकार्य, राष्ट्रकार्य, धर्मकार्य हाती घेत असताना आध्यात्मिक बैठकही तितक्याच ताकदीची असावी लागते, हे ज्यांनी सिद्ध केले, ते आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांची आज पुण्यतिथी आहे. त्यांना सशस्त्र क्रांतीचे जनकही म्हटले जाते. त्यांच्या घरात ना क्रांतीचे वारे होते, ना देशभक्तीचे बाळकडू. तरीदेखील केवळ आपल्या मातृभूमीची ब्रिटीशांच्या तावडीतून सुटका व्हावी, म्हणून सर्वसामान्य घरातला एक तरुण सोन्यासारखी नोकरी झुगारून स्वातंत्र्ययज्ञात आपल्या प्राणांची आहुती देतो, त्या बलिदानाचे मोल राखणे आपले कर्तव्य आहे.

वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म पनवेल जवळील शिरढोण येथे ४ नोव्हेंबर १८४५ रोजी झाला. कल्याण येथे प्राथमिक शिक्षण संपवून ते इंग्रजी शिक्षण घेण्यासाठी मुंबईत आले. गिरगावातील फणसवाडी येथील जगन्नाथाचे चाळीत वास्तव्य करून त्यांनी काही काळ इंग्रजी अभ्यास केला व पुढील शिक्षणासाठी ते  पुण्यास रवाना झाले. शिक्षणानंतर त्यांनी पुण्याच्या सैनिकी लेखानियंत्रक (कंट्रोलर ऑफ मिलिटरी अकाऊंटस) कार्यालयात सेवा केली. 

त्यांना त्यांच्या आजारी आईला भेटण्यास रजा मिळाली नाही. आईचे निधन झाले व शेवटी भेटही घेता आली नाही. या घटनेने आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळाली. त्यांनी आपल्या मातेची आणि भारतमातेची तिच्या लेकरांपासून ताटातूट करणाऱ्या इंग्रज सरकाराचा नायनाट करायचा असा पण केला. त्यावेळेस त्यांच्या वडिलांनी त्यांना समर्थांच्या ओव्यांची आठवण करून दिली. 

सकल सुखाचा केला त्याग, करूनी साधिजे तो योग,
राज्य साधनेची लगबग, कैसी केली।
त्याहुनी करावे विशेष, तरीच म्हणावे पुरुष,
या उपरी आता विशेष, काय लिहावे?

हे समर्थ वचन ध्यानी ठेवून वासुदेवाने घरदार सोडले. त्याच वेळी हिंदुस्थानात भीषण दुष्काळ पडला. इंग्रज सरकारच्या हलगर्जी  कारभाराचे मुळे हजारो नागरिक मृत्युमुखी पडले. त्यामुळे इंग्रज राजवटी बाबत प्रचंड संताप त्यांचे मनात उफाळून आला व त्याचा प्रतिशोध घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. भारतमातेला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी त्यांनी सशस्त्र बंड करण्याचे ठरवले. संघटना केल्या. रामोशी, भिल्ल, मांग, कोळी, आगरी, ब्राह्मण अशा सर्व समाजातील देशभक्त संघटित केले आणि त्यांना शस्त्रवापराचे प्रशिक्षण दिले. राष्ट्रीय शिक्षण, स्वदेशी माल, शस्त्र प्रशिक्षण यांना प्राधान्य दिले. त्यांनी सुरू केलेल्या लाठीवर्गात खुद्द लोकमान्य टिळकांनीदेखील प्रशिक्षण घेतले होते. इंग्रजांशी हातमिळवणी केलेल्या गद्दार धनाढ्यांना लुटून त्यांनी धन-संपत्ती गोळा केली आणि राष्ट्रकार्यार्थ तिचा योग्य विनिमय केला. प्रत्येक क्रांतीकारकाला सैनिकांप्रमाणे रोजगार दिला आणि मजबूत शस्त्रसाठा तयार केला. परिणामी त्यांना शिक्षा होऊन त्यांना एडन येथे धाडले गेले. व तेथेच त्यांना १७ फेब्रुवारी १८८३ ला मृत्यू आला. 

पुण्याच्या फायनान्स ऑफिसात नोकरी करीत असताना त्यांच्या मनातील वैराग्यवृत्ती उसळून वर आली. मंत्रतंत्र, सत्पुरुषांच्या गाठीभेटी यांत त्यांना गोडी वाटे. अक्कलकोटच्या स्वामी समर्थांनाही ते भेटले होते. वासुदेव बळवंतांचे आराध्य दैवत श्रीदत्त हेच होते. श्रीपादवल्लभ नामक ध्यानाचे एक चित्र त्यांनी एका चित्रकाराकडून मुद्दाम काढून घेतले होते. त्याची नित्य ते पूजा करीत. रोज ते श्रीगुरुचरित्राच्या पोथीचा अध्याय वाचीत. दत्तांच्या आराधनेचा व उपासनेचा एक ग्रंथ ‘दत्त महात्म्य’ नावाचा प्रसिद्ध करण्याचा त्यांना मानस होता. गंगाधरशास्त्री दातार यांच्याकडून ‘दत्तलहरी’ या स्तोत्राचे भाषांतर करवून वासुदेव बळवंतांनी प्रसिद्ध केले होते. दिवसाच्या सुरुवातीला नित्य दत्त सहस्रनामाचा जप केल्याशिवाय त्यांनी कधी पाण्याचा थेंबही घेतला नाही. दत्तपादुकांची प्रतिकृती छोट्याशा डबीतून ते सदैव आपल्या जवळ बाळगत असत. 

राजद्रोहाखाली यांना हद्दपारीची शिक्षा झाली. एडन येथेच जन्मठेप भोगीत असताना त्यांचे निधन झाले. ‘दधिची ऋषींनी धर्मकार्यासाठी आपल्या अस्थी देवांना दिल्या, तर हिंदवासियांनो, मी आपला प्राण तुमच्यासाठी का देऊ नये?’ अशी त्यांची वृत्ती होती. असे हे थोर क्रांतीकारक भारतमातेच्या लढ्यासाठी दत्तरूप होऊन उभे राहिले मात्र त्यांची किंमत न कळलेल्या आपल्याच बंडखोरांमुळे भारतमातेला स्वातंत्र्यासाठी आणखी अनेक वर्षे झुरावे लागले. 

Web Title: Death anniversary of Vasudev Balwant Phadke, the pioneer revolutionary who placed Tulsi leaves on the world to serve the motherland!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.