Datta Jayanti 2025 Three Day Gurucharitra Parayan Rules: भक्तीमुक्ती परमार्थ । जे जे वांछिले मनात । ते ते साध्य होय त्वरित । गुरुचरित्र ऐकता ॥ अशी महती गुरुचरित्राची सांगितली जाते. दत्तसंप्रदाय, गुरुपरंपरेत गुरुचरित्र या ग्रंथाला अनन्य साधारण असे महत्त्व आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जन्मोत्सव साजरा केला जातो. दत्त जयंतीच्या निमित्ताने हजारो भाविक गुरुचरित्र सप्ताह पारायण करतात. परंतु, ज्यांना सात दिवसीय सप्ताह पारायण करणे शक्य नसेल, त्यांना तीन दिवसांत गुरुचरित्र वाचता येते. तीन दिवसीय गुरुचरित्राचे पारायण कसे करावे? नियम आणि योग्य पद्धत जाणून घ्या...
दत्त जयंती २०२५: गुरुचरित्र सप्ताह कधीपासून सुरू करावा? पाहा, मान्यता, महत्त्वाच्या गोष्टी
गीतेमध्ये दहाव्या अध्यायात विभूतीयोग सांगताना भगवंतांनी ‘मासानां मार्गशीर्षोऽहम’ म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात मी असतो, असे म्हटले आहे. मार्गशीर्ष मास हा केशव मास म्हणूनही ओळखला जातो. कारण या महिन्याचे पालकत्व भगवान महाविष्णू यांच्याकडे असते. पौर्णिमेला किंवा तिच्या आधी अथवा नंतर मृगशीर्ष हे नक्षत्र असते, म्हणून या महिन्याला मार्गशीर्ष असे नाव प्राप्त झाले. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्त जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्त जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा होत असतो. दत्त जयंती या दिवशी दत्ततत्त्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत १००० पटीने कार्यरत असते, असे म्हटले जाते. यंदा गुरुवार, ०४ डिसेंबर २०२५ रोजी दत्त जयंती आहे.
दत्त जयंती २०२५: गुरुलीलामृत ग्रंथ पठण करा, स्वामी सदैव साथ देतील; पाहा, कसे करावे पारायण?
‘यथोचित फलश्रुती’ देणारा हा प्रासादिक ग्रंथ ॥ Datta Jayanti 2025 Gurucharitra Parayan॥
गुरुचरित्रग्रंथातील प्रत्येक अध्यायात अशा अनेक ‘दृष्टांत-कथा’ आहेत. लोक त्याला ‘चमत्कार-कथा’ समजतात; पण त्यामागील भक्तिसूत्र जाणून घेऊन गुरुबोधाचे स्वरूप कळून घेतले पाहिजे. गुरुसेवेशिवाय गुरूकृपा होणे शक्य नाही. गुरुसेवेसाठी दृढ गुरुनिष्ठा हवी. गुरुकृपेसाठी साधना हवी. गुरुकृपा झाली तर शिष्याचे कल्याण होईल. गुरुचरित्रात अनेकांना दु:ख संकटे यातून मुक्त होण्याचा उपासनाधर्म प्रतिपादला गेला असल्याने प्रापंचिकांचे जीवन आणि पारमार्थिकतेचे मार्गदर्शन यांचा मिलाफ गुरूचरित्रात आहे. पठण, चिंतन, मनन यांपैकी काहीही घडले तरी त्याची ‘यथोचित फलश्रुती’ देणारा हा प्रासादिक ग्रंथ आहे, हेच खरे! गुरुचरित्रात वैदिक आणि अवैदिक या दोन्ही संस्कृतीच्या प्रवाहाचा संगम झालेला आहे.
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
श्रीपादश्रीवल्लभ व श्रीनृसिंहसरस्वती यांच्या लीलांचे चमत्कृतिपूर्ण वर्णन ॥ Gurucharitra Significance In Marathi ॥
गुरुचरित्र या अद्भूत ग्रंथात श्रीपादश्रीवल्लभ व श्रीनृसिंहसरस्वती यांच्या लीलांचे चमत्कृतिपूर्ण वर्णन रसाळपणे केले आहे. इतकेच नव्हे तर श्रीगुरुंच्या चरित्राच्या निमित्ताने त्यांच्या असंख्य लीलांचे कथात्मक निरुपण अतिशय सुबोध व प्रासादिक भाषेत केले आहे. याशिवाय व्रत वैकल्येही सांगितली आहेत. यात्रांची वर्णने केली आहेत. आचारधर्म शिकवला आहे. मूल्यांची रुजवण केली आहे. सर्वसामान्य मनुष्याने ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी कसे आचरण ठेवायला हवे, याचे मौलिक मार्गदर्शन गुरुचरित्रात केले आहे. सर्वसामान्य मनुष्याने ईश्वराप्रत पोहोचण्यासाठी कशा प्रकारचे आचरण ठेवावयास हवे याचे मौलिक मार्गदर्शन ‘गुरुचरित्रा’च्या माध्यमातून केले असल्याने या प्रासादिक ग्रंथाचे स्थान दत्तभक्ताच्या हृदयात ‘पाचवा वेद’ असेच आहे आणि यात यत्किंचितही अतिशयोक्ती नाही.
ज्ञानकाण्ड, कर्मकाण्ड, भक्तिकाण्ड यांचा समन्वय ॥ Gurucharitra Teen Diwas Parayan॥
दत्तावतार श्रीनृसिंहसरस्वती यांच्या प्रेरणेनेच ‘गुरुचरित्र’ लिहिले गेले. परिणामी या ग्रंथाला ईश्वरी अधिष्ठान असल्याने तो ‘वरदग्रंथ’ असून त्याला श्रीगुरूंनी ‘भक्तकामकल्पद्रुम’ असा वर देऊन ठेवलेला आहे, असे म्हटले जाते. श्रीगुरुचरित्र या ग्रंथाचे ५२ अध्याय असून ओवीसंख्या ७,४९१ इतकी आहे. काही ग्रंथात ५३ अध्याय आहेत. त्याची विभागणी ज्ञानकाण्ड, कर्मकाण्ड, भक्तिकाण्ड यांचा समन्वय यात साधला असून या तीनही उपासनांसाठी गुरुचे मार्गदर्शनच कसे आवश्यक आहे, याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने आपल्या ओघवत्या भाषेत केले आहे.
गुरुचरित्र तीन दिवसीय पारायण करण्यापूर्वी करावयाची तयारी ॥ Gurucharitra Three Days Parayan Preparation॥
- दत्तगुरुंची मूर्ती किंवा प्रतिमा घ्यावी. ज्या दिवशी पारायण सुरू करणार असाल, त्या दिवशी एका चौरंगावर स्वच्छ वस्त्रे घालावे आणि त्यावर दत्तगुरुंची स्थापना करावी. गुरुचरित्र पारायण करण्याचा संकल्प करावा. तसेच गुरुचरित्र पारायण का करण्यात येत आहे, हेही दत्तगुरुंना सांगावे. तीन दिवस पारायण निर्विघ्न पद्धतीने पार पडावे, यासाठी दत्तगुरुंना साकडे घालावे.
- दत्तगुरुंची पूजा करण्यापूर्वी प्रथमेश असलेल्या गणपतीचे आवाहन करावे आणि पूजन करावे. यानंतर दररोज गुरुचरित्र वाचन करण्यापूर्वी दत्तगुरुंची विशेष पूजा करावी. षोडषोपचार किंवा पंचोपचार पूजा करावी. दररोज अभिषेक करावा. पिवळी फुले, पिवळ्या रंगाचा समावेश असलेली मिठाई आवर्जून अर्पण करावी. गुरुचरित्र पारायण पूर्ण झाले की, पिवळ्या रंगांच्या वस्तू, दत्तगुरुंशी संबंधित वस्तूंचे निश्चितपणे दान करावे. विशेष म्हणजे दत्तगुरूंचे पूजन झाल्यावर गुरुचरित्र वाचनाला सुरुवात करण्यापूर्वी ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ या मंत्रांचा १०८ वेळा जप अवश्य करावा.
- गुरुचरित्र या ग्रंथाच्या पारायणाचे विशिष्ट नियम आणि महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. पारायणकर्त्यांना या गोष्टींचे भान राखूनच सप्ताह पारायण करावे, असे सांगितलेले आहे. अनेक ठिकाणी सात दिवस पारायण केले जाते. गुरुचरित्र सप्ताह केला जातो. तर काही जण तीन दिवसांचे पारायण करतात. गुरुचरित्र सप्ताह केल्यास किती अध्यायांचे वाचन करावे आणि तीन दिवसांचे पारायण असल्यास किती अध्यायांचे वाचन करावे, याची माहिती गुरुचरित्र ग्रंथांत दिलेली असते.
तीन दिवसीय गुरुचरित्र पारायण करतानाचे नियम ॥ Gurucharitra Parayan Rules In Marathi॥
- वाचन करण्यापूर्वी पहिल्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून सर्व आन्हिके उरकून उजव्या हातावर पाणी घेऊन संकल्प सोडावा. आचमन, प्राणायाम व देशकालादिकांचा उच्चार झाल्यावर ज्या उद्देशाने अनुष्ठान करावयाचे असते, त्याचा उच्चार करून म्हणजे देवतेला आपला हेतू सांगून, त्या देवतेच्या कृपेने तो हेतू पूर्ण होण्यासाठी हे कर्म करत आहे, असे सांगून पाणी सोडावे. याला संकल्प म्हणतात. संकल्पाचा उच्चार केल्याशिवाय पारायण करू नये. अगदी निष्काम पारायण असले, तरी श्रीदत्तात्रेयदेवता प्रीत्यर्थ किंवा श्रीदत्तात्रेयदेवता कृपाशीर्वाद प्राप्त्यर्थ एवढा तरी संकल्प उच्चारावा.
- यानंतर कुलदैवत, गुरु, माता, पिता यांचे स्मरण करावे आणि त्यांचे आशीर्वाद घ्यावेत. वाचनापूर्वी संध्या व १०८ गायत्री जप अवश्य करावा.
- गुरुचरित्राचे वाचन पहाटे ०३ ते सायंकाळी ०४ या दरम्यान करावे. दुपारी १२ ते १२.३० ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने या काळात पारायण वाचन बंद ठेवावे.
- वाचन हे नेहमी एका लयीत, शांत व सुस्पष्ट असे असावे. उरकण्याच्या दृष्टीने उच्चार भ्रष्टता होऊ नये. चित्त अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे.
- वाचनासाठी नेहमी पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुखच बसावे.
- वाचनासाठी ठरविक वेळ, ठरविक दिशा व ठरविक जागाच असावी. कोणत्याही कारणास्तव त्यात बदल होऊ देऊ नये.
- वाचन मनातल्या मनात न करता खड्या आवाजात करावे.
- वाचनाच्या काळात मध्येच असनावरून उठू नये किंवा दुसऱ्याशी बोलू नये.
- वाचनात यांत्रिकपणा नको. मनोभावे वाचन करावे.
- रोजचे वाचन झाल्यावर पोथी बंद करू नये, ती उघडीच ठेवावी. आसनावरून उठण्यापूर्वी तिला हळद कुंकू व फुल वाहून नमस्कार करावा.
- पारायण काळात त्या दिवसाचे वाचन संपल्यावर आणि रात्री आरती करावी.
- श्री दत्तात्रेयांची मूर्ती वा प्रतिमा नसल्यास पाटावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी व तीत श्रीदत्तात्रायांना आवाहन करावे.
- पारायण काळात देवापुढे अखंड नंदादीप तेवत ठेवावा व सुंदर रांगोळी काढावी.
- देवासाठी एक पाट मोकळा ठेवावा. पारायण काळात साक्षात दत्त गुरु फेरी मारतात, अशी दत्तभक्तांची श्रद्धा आहे. यासाठी पाटावर कोरे वस्त्र अंथरून ठेवावे.
- ब्रह्मचर्याचे पालन व्हावे. वाचन शुचिर्भूत होऊन सोवळ्यानेच करावे.
- केवळ हविषान्न घ्यावे. हविषान्न म्हणजे दूधभात. (मीठ-तिखट, आंबट, दही, ताक वर्ज. साखर घ्यावी. गूळ खाऊ नये. पोळी, तूप, साखर घेता येते.)
- रात्री देवाच्या सन्निध्यात चटईवर अथवा पांढऱ्या धाबळीवर झोपावे. झोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे संकल्पपूर्तीचा दृष्टीने संदेश ऐकू यातात, असा श्रद्धेने अनुष्ठान करणाऱ्यांचा अनुभव असल्याचे सांगितले जाते.
- पारायण पूर्ण झाल्यानंतर सुपारीतून श्रीदत्तात्रायांचे विसर्जन करावे, आणि नैवेद्य, आरती करून, भोजनास सवाष्ण, ब्राम्हण सांगून सांगता करावी. महा नैवेद्यात शक्यतो घेवड्याची भाजी असावी.
- एकदा संकल्प सोडून पारायणाला प्रारंभ केल्यानंतर ते पूर्ण करणेच आवश्यक असते. परंतु मधेच सोयर किंवा सुतक आल्यास व्यत्यय येतो. अशा वेळी परिचिताने, याचे अपूर्ण राहिलेले वाचन मी पूर्ण करतो, असा संकल्प सोडून आपल्या घरातील उर्वरित वाचन पूर्ण करावे. तसेच, सोयर किंवा सुतक संपल्यावर घरात गोमूत्र शिंपडून शुद्धी करावी. त्या दिवशी अवतरणिका वाचावी व दत्तमूर्ती किंवा दत्तपादुकांवर अभिषेक करावा.
- गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीस जाऊ नये. स्वतः च्या कुटुंबात सुतक आले तर अशा वेळेस गुरुचरित्र पारायण दुसऱ्यांकडून पूर्ण करावे, अर्धवट सोडू नये. वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे.
- शक्यतो निष्काम मनाने या ग्रंथाचे पालन करावे, इप्सित फळ आपोआप मिळते, असा गुरुभक्तांचा अनुभव आहे.
- गुरुचरित्र पारायण काळात शक्य असेल, तर गोमातेला अन्नदान करावे.
- गुरुचरित्र तीन दिवसीय पारायण कालावधीत रोज सकाळी व सायंकाळी गुरुचरित्राच्या पोथीस धूप, दीप, नैवेद्य दाखवून आरती करावी. शक्य झाल्यास तिन्हीसांजेला श्रीविष्णू सहस्रनामाचे पठण करावे.
- ०४ डिसेंबर २०२५ रोजी दत्त जयंती आहे. दत्त जयंतीला सांगता व्हावी, असे मनात असेल, तर त्यानुसार तीन दिवसीय पारायण करावे. एकाच वेळी एवढे अध्याय एकत्र वाचणे शक्य नसेल, तर सकाळी अर्धे अध्याय वाचावेत आणि सायंकाळी तिन्हीसांजेला दिवेलागणीवेळी उर्वरित अध्याय वाचावेत. सायंकाळी नैवेद्य दाखवून आरती करावी. पारायणकर्त्यांने दुपारी भोजन घेऊ नये. त्या दिवसाचे पारायण पूर्ण झाल्यावरच भोजन घ्यावे.
गुरुचरित्र तीन दिवस पारायण किती अध्याय वाचावे?
दिवस पहिला - १ ते २२ अध्याय
दिवस दुसरा - २३ ते ३३ अध्याय
दिवस तिसरा - ३४ ते ५२ अध्याय
॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥
॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥
Web Summary : Devotees can complete Gurucharitra Parayan in three days instead of a week during Datta Jayanti 2025. Follow specific rules, including daily rituals, reading schedules, and dietary restrictions, for a fulfilling experience and blessings.
Web Summary : दत्त जयंती २०२५ पर भक्त एक सप्ताह के बजाय तीन दिनों में गुरुचरित्र पारायण कर सकते हैं। दैनिक अनुष्ठानों, पठन कार्यक्रम और आहार प्रतिबंधों सहित विशिष्ट नियमों का पालन करें, ताकि परिपूर्ण अनुभव और आशीर्वाद प्राप्त हो सकें।