दत्त जयंती २०२५: गुरुचरित्र सप्ताह कधीपासून सुरू करावा? पाहा, मान्यता, महत्त्वाच्या गोष्टी

By देवेश फडके | Updated: November 25, 2025 13:41 IST2025-11-25T13:38:54+5:302025-11-25T13:41:57+5:30

Datta Jayanti 2025 Guru Charitra Saptah Rules: दत्त जयंती निमित्ताने अनेक ठिकाणी गुरुचरित्राचे सप्ताह पद्धतीने पारायण केले जाते. महत्त्वाचे नियम जाणून घ्या...

datta jayanti 2025 do you want gurucharitra recite saptah parayan know about the most important rules tradition and procedures | दत्त जयंती २०२५: गुरुचरित्र सप्ताह कधीपासून सुरू करावा? पाहा, मान्यता, महत्त्वाच्या गोष्टी

दत्त जयंती २०२५: गुरुचरित्र सप्ताह कधीपासून सुरू करावा? पाहा, मान्यता, महत्त्वाच्या गोष्टी

Datta Jayanti 2025 Guru Charitra Saptah Rules: गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात्‌ परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः॥ दत्तसंप्रदाय, गुरुपरंपरेत गुरुचरित्र या ग्रंथाला अनन्य साधारण असे महत्त्व आहे. श्री गुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदांइतकाच मान्यता पावलेला आहे. भारतीय परंपरेत गुरुचे स्थान अगदी वरचे आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जन्मोत्सव साजरा केला जातो. दत्त जयंतीच्या निमित्ताने हजारो भाविक गुरुचरित्र सप्ताह पारायण करतात. गुरुवार, ०४ डिसेंबर २०२५ रोजी दत्त जयंती आहे. गुरुचरित्र पारायण कधीपासून सुरू करावे? काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया...

गीतेमध्ये दहाव्या अध्यायात विभूतीयोग सांगताना भगवंतांनी ‘मासानां मार्गशीर्षोऽहम’ म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात मी असतो, असे म्हटले आहे. मार्गशीर्ष मास हा केशव मास म्हणूनही ओळखला जातो. कारण या महिन्याचे पालकत्व भगवान महाविष्णू यांच्याकडे असते. पौर्णिमेला किंवा तिच्या आधी अथवा नंतर मृगशीर्ष हे नक्षत्र असते, म्हणून या महिन्याला मार्गशीर्ष असे नाव प्राप्त झाले. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्त जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्त जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा होत असतो. दत्त जयंती या दिवशी दत्ततत्त्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत १००० पटीने कार्यरत असते, असे म्हटले जाते. भक्तिभावाला, परमार्थाला, आत्मचिंतनाला पुरक अशा या महिन्यात दत्त जयंतीचा उत्सव हे मुख्य आकर्षण असते. अनेक ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. गुरुचरित्राचे पारायण केले जाते.

गुरुचरित्र अद्भूत ग्रंथ, पाचवा वेद ॥ Datta Jayanti 2025 Gurucharitra Saptah Parayan॥

०४ डिसेंबर २०२५ रोजी दत्त जयंती आहे. त्यामुळे या दिवशी सांगता होईल, अशा पद्धतीने सप्ताह पारायणास सुरुवात करावी. शुक्रवार, २८ नोव्हेंबर २०२५ पासून सप्ताह पारायणास सुरुवात केली, तर गुरुवार, ०४ डिसेंबर २०२५ रोजी सप्ताह पारायणाची सांगता होऊ शकेल. सर्वसामान्य मनुष्याने ईश्वराप्रत पोहोचण्यासाठी कशा प्रकारचे आचरण ठेवावयास हवे याचे मौलिक मार्गदर्शन ‘गुरुचरित्रा’च्या माध्यमातून केले असल्याने या प्रासादिक ग्रंथाचे स्थान दत्तभक्ताच्या हृदयात ‘पाचवा वेद’ असेच आहे आणि यात यत्किंचितही अतिशयोक्ती नाही. 

श्रीनृसिंहसरस्वती यांच्या प्रेरणेनेच ‘गुरुचरित्र’ लिहिले ॥ Gurucharitra Significance In Marathi ॥

दत्तावतार श्रीनृसिंहसरस्वती यांच्या प्रेरणेनेच ‘गुरुचरित्र’ लिहिले गेले. परिणामी या ग्रंथाला ईश्वरी अधिष्ठान असल्याने तो ‘वरदग्रंथ’ असून त्याला श्रीगुरूंनी ‘भक्तकामकल्पद्रुम’ असा वर देऊन ठेवलेला आहे, असे म्हटले जाते. श्रीगुरुचरित्र या ग्रंथाचे ५२ अध्याय असून ओवीसंख्या ७,४९१ इतकी आहे. काही ग्रंथात ५३ अध्याय आहेत. त्याची विभागणी ज्ञानकाण्ड, कर्मकाण्ड, भक्तिकाण्ड यांचा समन्वय यात साधला असून या तीनही उपासनांसाठी गुरुचे मार्गदर्शनच कसे आवश्यक आहे, याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने  आपल्या ओघवत्या भाषेत केले आहे.

आचारधर्म, मूल्यांची रुजवण अन् मौलिक मार्गदर्शन ॥ Gurucharitra Saptah Parayan॥

गुरुचरित्र या अद्भूत ग्रंथात श्रीपादश्रीवल्लभ व श्रीनृसिंहसरस्वती यांच्या लीलांचे चमत्कृतिपूर्ण वर्णन रसाळपणे केले आहे. इतकेच नव्हे तर श्रीगुरुंच्या चरित्राच्या निमित्ताने त्यांच्या असंख्य लीलांचे कथात्मक निरुपण अतिशय सुबोध व प्रासादिक भाषेत केले आहे. याशिवाय व्रत वैकल्येही सांगितली आहेत. यात्रांची वर्णने केली आहेत. आचारधर्म शिकवला आहे. मूल्यांची रुजवण केली आहे. सर्वसामान्य मनुष्याने ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी कसे आचरण ठेवायला हवे, याचे मौलिक मार्गदर्शन गुरुचरित्रात केले आहे.

गुरुचरित्र सप्ताह पारायण करण्यापूर्वी तयारी कशी करावी? ॥ Gurucharitra Saptah Parayan Preparation॥

गुरुचरित्र या ग्रंथाच्या पारायणाचे विशिष्ट नियम आणि महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. पारायणकर्त्यांना या गोष्टींचे भान राखूनच सप्ताह पारायण करावे, असे सांगितलेले आहे. अनेक ठिकाणी सात दिवस पारायण केले जाते. गुरुचरित्र सप्ताह केला जातो. तर काही जण तीन दिवसांचे पारायण करतात. गुरुचरित्र सप्ताह केल्यास किती अध्यायांचे वाचन करावे आणि तीन दिवसांचे पारायण असल्यास किती अध्यायांचे वाचन करावे, याची माहिती गुरुचरित्र ग्रंथांत दिलेली असते.

- गुरुचरित्र पारायण करण्यापूर्वी काही तयारी करणे आवश्यक आहे. दत्तगुरुंची मूर्ती किंवा प्रतिमा घ्यावी. ज्या दिवशी पारायण सुरू करणार असाल, त्या दिवशी एका चौरंगावर स्वच्छ वस्त्रे घालावे आणि त्यावर दत्तगुरुंची स्थापना करावी. गुरुचरित्र पारायण सप्ताह करण्याचा संकल्प करावा. तसेच गुरुचरित्र पारायण सप्ताह का करण्यात येत आहे, हेही दत्तगुरुंना सांगावे. संपूर्ण सात दिवस पारायण निर्विघ्न पद्धतीने पार पडावे, यासाठी दत्तगुरुंना साकडे घालावे.

- दत्तगुरुंची पूजा करण्यापूर्वी प्रथमेश असलेल्या गणपतीचे आवाहन करावे आणि पूजन करावे. यानंतर दररोज सप्ताह सुरू असताना गुरुचरित्र वाचन करण्यापूर्वी दत्तगुरुंची विशेष पूजा करावी. षोडषोपचार किंवा पंचोपचार पूजा करावी. दररोज अभिषेक करावा. पिवळी फुले, पिवळ्या रंगाचा समावेश असलेली मिठाई आवर्जून अर्पण करावी. गुरुचरित्र पारायण सप्ताह पूर्ण झाला की, पिवळ्या रंगांच्या वस्तू, दत्तगुरुंशी संबंधित वस्तूंचे निश्चितपणे दान करावे. विशेष म्हणजे दत्तगुरूंचे पूजन झाल्यावर गुरुचरित्र वाचनाला सुरुवात करण्यापूर्वी ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ या मंत्रांचा १०८ वेळा जप अवश्य करावा.

गुरुचरित्र सप्ताह पारायण करताना पाळायचे काही अत्यंत महत्त्वाचे नियम ॥ Datta Jayanti 2025 Gurucharitra Saptah Parayan Rules In Marathi॥

- वाचन करण्यापूर्वी पहिल्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून सर्व आन्हिके उरकून उजव्या हातावर पाणी घेऊन संकल्प सोडावा. आचमन, प्राणायाम व देशकालादिकांचा उच्चार झाल्यावर ज्या उद्देशाने अनुष्ठान करावयाचे असते, त्याचा उच्चार करून म्हणजे देवतेला आपला हेतू सांगून, त्या देवतेच्या कृपेने तो हेतू पूर्ण होण्यासाठी हे कर्म करत आहे, असे सांगून पाणी सोडावे. याला संकल्प म्हणतात. संकल्पाचा उच्चार केल्याशिवाय पारायण करू नये. अगदी निष्काम पारायण असले, तरी श्रीदत्तात्रेयदेवता प्रीत्यर्थ किंवा श्रीदत्तात्रेयदेवता कृपाशीर्वाद प्राप्त्यर्थ एवढा तरी संकल्प उच्चारावा.

- यानंतर कुलदैवत, गुरु, माता, पिता यांचे स्मरण करावे आणि त्यांचे आशीर्वाद घ्यावेत. वाचनापूर्वी संध्या व १०८ गायत्री जप अवश्य करावा.

- गुरुचरित्राचे वाचन पहाटे ०३ ते सायंकाळी ०४ या दरम्यान करावे. दुपारी १२ ते १२.३० ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने या काळात पारायण वाचन बंद ठेवावे.

- वाचन हे नेहमी एका लयीत, शांत व सुस्पष्ट असे असावे. उरकण्याच्या दृष्टीने उच्चार भ्रष्टता होऊ नये. चित्त अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे.

- वाचनासाठी नेहमी पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुखच बसावे.

- वाचनासाठी ठरविक वेळ, ठरविक दिशा व ठरविक जागाच असावी. कोणत्याही कारणास्तव त्यात बदल होऊ देऊ नये.

- वाचन मनातल्या मनात न करता खड्या आवाजात करावे.

- वाचनाच्या काळात मध्येच असनावरून उठू नये किंवा दुसऱ्याशी बोलू नये.

- वाचनात यांत्रिकपणा नको. मनोभावे वाचन करावे. 

- रोजचे वाचन झाल्यावर पोथी बंद करू नये, ती उघडीच ठेवावी. आसनावरून उठण्यापूर्वी तिला हळद कुंकू व फुल वाहून नमस्कार करावा. 

- पारायण काळात त्या दिवसाचे वाचन संपल्यावर आणि रात्री आरती करावी.

- श्री दत्तात्रेयांची मूर्ती वा प्रतिमा नसल्यास पाटावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी व तीत श्रीदत्तात्रायांना आवाहन करावे.

- पारायण काळात देवापुढे सात दिवस अखंड नंदादीप तेवत ठेवावा व सुंदर रांगोळी काढावी.

- देवासाठी एक पाट मोकळा ठेवावा. पारायण काळात साक्षात दत्त गुरु फेरी मारतात, अशी दत्तभक्तांची श्रद्धा आहे. यासाठी पाटावर कोरे वस्त्र अंथरून ठेवावे.

- सप्ताहकालात ब्रह्मचर्याचे पालन व्हावे. वाचन शुचिर्भूत होऊन सोवळ्यानेच करावे. 

- सप्ताहात केवळ हविषान्न घ्यावे. हविषान्न म्हणजे दूधभात. (मीठ-तिखट, आंबट, दही, ताक वर्ज. साखर घ्यावी. गूळ खाऊ नये. पोळी, तूप, साखर घेता येते.)

- रात्री देवाच्या सन्निध्यात चटईवर अथवा पांढऱ्या धाबळीवर झोपावे. झोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे संकल्पपूर्तीचा दृष्टीने संदेश ऐकू यातात, असा श्रद्धेने अनुष्ठान करणाऱ्यांचा अनुभव असल्याचे सांगितले जाते. 

- सप्ताह पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी, शक्य तर आठव्या दिवशी, सुपारीतून श्रीदत्तात्रायांचे विसर्जन करावे, आणि नैवेद्य, आरती करून, भोजनास सवाष्ण, ब्राम्हण सांगून सांगता करावी. महा नैवेद्यात शक्यतो घेवड्याची भाजी असावी. 

- एकदा संकल्प सोडून पारायणाला प्रारंभ केल्यानंतर ते पूर्ण करणेच आवश्यक असते. परंतु मधेच सोयर किंवा सुतक आल्यास व्यत्यय येतो. अशा वेळी परिचिताने, याचे अपूर्ण राहिलेले वाचन मी पूर्ण करतो, असा संकल्प सोडून आपल्या घरातील उर्वरित वाचन पूर्ण करावे. तसेच, सोयर किंवा सुतक संपल्यावर घरात गोमूत्र शिंपडून शुद्धी करावी. त्या दिवशी अवतरणिका वाचावी व दत्तमूर्ती किंवा दत्तपादुकांवर अभिषेक करावा.

- गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीस जाऊ नये. स्वतः च्या कुटुंबात सुतक आले तर अशा वेळेस गुरुचरित्र पारायण दुसऱ्यांकडून पूर्ण करावे, अर्धवट सोडू नये. वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे.

- शक्यतो निष्काम मनाने या ग्रंथाचे पालन करावे, इप्सित फळ आपोआप मिळते, असा गुरुभक्तांचा अनुभव आहे. 

- गुरुचरित्र पारायण काळात शक्य असेल, तर गोमातेला अन्नदान करावे.

- गुरुचरित्र सप्ताह कालावधीत रोज सकाळी व सायंकाळी गुरुचरित्राच्या पोथीस धूप, दीप, नैवेद्य दाखवून आरती करावी. शक्य झाल्यास तिन्हीसांजेला श्रीविष्णू सहस्रनामाचे पठण करावे.

॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥

॥ दत्त दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, नृसिंह सरस्वती दिगंबरा ॥

॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥

 

Web Title : दत्त जयंती २०२५: गुरु चरित्र सप्ताह कब शुरू करें?

Web Summary : दत्त जयंती २०२५, ४ दिसंबर को है। भक्त गुरु चरित्र सप्ताह मनाते हैं। दत्त जयंती पर समापन के लिए २८ नवंबर से शुरू करें। गुरु चरित्र, एक श्रद्धेय पाठ, भक्तों को आध्यात्मिक ज्ञान की ओर मार्गदर्शन करता है। एक सफल सप्ताह के लिए विशिष्ट नियमों का पालन करें।

Web Title : Datta Jayanti 2025: When to start Guru Charitra Saptah?

Web Summary : Datta Jayanti 2025 falls on December 4th. Devotees observe Guru Charitra Saptah. Start on November 28th for completion on Datta Jayanti. The Guru Charitra, a revered text, guides devotees towards spiritual enlightenment. Follow specific rules for a fulfilling Saptah.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.