Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
By देवेश फडके | Updated: November 13, 2025 07:07 IST2025-11-13T07:07:07+5:302025-11-13T07:07:07+5:30
Datta Jayanti 2025 Date: गुरुवारी दत्त जयंती येणे हा अनन्य साधारण शुभ पुण्य फलदायी योग मानला गेला आहे.

Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
Datta Jayanti 2025 Date: दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा... अवघ्या काही दिवसांनी मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे. अनेकार्थाने मार्गशीर्ष महिना महत्त्वाचा मानला जातो. मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. विशेष म्हणजे यंदा २०२५ मध्ये दत्त जयंती गुरुवारी आली आहे. गुरूवार हा दिवस दत्तगुरू आणि दत्तावतारांचे पूजन, नामस्मरण, उपासना यांसाठी समर्पित मानला जातो. त्यामुळे गुरूवारी दत्त जयंती येणे हा योग अनन्य साधारण आणि अतिशय शुभ पुण्य फलदायी मानला गेला आहे.
मार्गशीर्ष पौर्णिमेला मृगशीर्ष नक्षत्र असताना प्रदोष काळी दत्तगुरूंचा जन्म झाला. म्हणून सर्व प्रमुख दत्तक्षेत्री तसेच जेथे दत्त मंदिर असते तेथे या दिवशी प्रदोष काळी दत्त जन्म सोहळा केला जातो. या निमित्ताने अनेक कुटुंबामध्ये कुळाचार म्हणून मार्गशीर्ष शुक्ल अष्टमीपासून दत्त नवरात्र पाळले जाते. तसेच दत्त जयंतीच्या निमित्ताने ‘श्रीगुरुचरित्र’ ग्रंथाचे पारायण सामूहिक रीतीने अथवा घरोघरी व्यक्तिगत पातळीवर केले जाते. दत्त जयंतीच्या दिवशी जन्म सोहळ्याच्या वेळी सायंकाळी दत्तजन्माचे कीर्तनही होते. दक्षिणेत आंध्र प्रदेश, कर्नाटक तसेच तामिळनाडूत दत्त जयंती साजरी केली जाते. यंदा, गुरुवार, ०४ डिसेंबर २०२५ रोजी दत्त जयंती आहे.
योगसाधनेत दत्तात्रेयांना ‘गुरु’ मानले गेले आहे
अत्रि-अनसूया ह्या दाम्पत्याचा पुत्र मानल्या गेलेल्या दत्तात्रेयांचा जन्म ब्रह्मा-विष्णू-महेश ह्यांचा अंश एकत्रित होऊन झाल्याची कथा सुपरिचित आहे. या तिघांचा अंश म्हणून दत्तात्रेयांची त्रिमुखी आणि सहा हातांची सगुणमूर्ती सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय आहे. तुकोबांनीही ‘तीन शिरे सहा हात’ अशाच दत्तस्वरूपाला नमन केले आहे. हे आपण सर्वच जाणतो. मात्र मुळात पुराणात एकमुखी आणि व्दिभुज अथवा चतुर्भुज अशा दत्ताचे वर्णन आढळते. विशेष म्हणजे दत्तोपासनेत ध्यानासाठी त्रिमुखी दत्ताचे सगुणरुप आणि पूजा विधीसाठी पादुकांना महत्त्व दिले गेलेले दिसते. नरसोबाची वाडी, औदुंबर, गाणगापूर या सर्व प्रसिद्ध दत्तक्षेत्री अशा पादुकांचीच स्थापना केलेली आढळते. योगसाधनेत दत्तात्रेयाला ‘गुरु’ मानले गेले. सर्वांचे ‘गुरु’ म्हणून मान्यता पावलेल्या दत्तात्रेयांनी स्वतः चोवीस गुरु केले. दत्तात्रेयांसारखा विशाल दृष्टिकोन ठेवला तर आपला व्यक्तिमत्त्वविकास होण्यास मदत होईल, असे म्हटले जाते.
गुरुचरित्राचे वाचन, पारायण
दत्त जयंतीच्या दिवशी विशेष गुरुचरित्राचे वाचन, पारायण अनेक दत्त भक्तमंडळी करतात. ज्यांना काही कारणाने ते शक्य नसेल त्यांनी निदान दत्तात्रेयांचा नामजप आपल्याला जमेल तेवढा जमेल त्यावेळी शक्यतो प्रदोष काळी जरुर करावा. ज्यांनी गुरुमंत्र घेतला असेल त्यांनी गुरुंना भेटून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत. दत्त मंदिरामध्ये यथाशक्ती दान द्यावे. भुकेलेल्यांना शक्य असेल तर एखादे फळ द्यावे. आजूबाजूच्या मंडळींना प्रसाद म्हणून साखर-फुटाणे, बत्तासे वाटावेत. घरी दत्तावरील पदरचनांची ध्वनिफीत लावून ती ऐकावी. दत्ताचे वास्तव्य औदुंबर वृक्षाच्या तळी असते अशी पूर्वापार श्रद्धा आहे. केवळ या दिवशी नव्हे, तर वर्षभर दर गुरुवारी औदुंबराला प्रेमपूर्वक पाणी घालावे, असे सांगितले जाते.
श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत, स्वामी चरित्रामृत पारायण
दत्त जयंतीच्या दिवशी गुरूचरित्र वाचन किंवा पारायण शक्य नसेल, तर दत्तगुरूंचे पहिले अवतार म्हणजेच श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांचे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत याचे पठण किंवा पारायण करावे. दत्तात्रेयांचे अवतार मानले गेलेले श्री स्वामी समर्थ महाराज यांचे स्वामी चरित्र सारामृत, गुरूलीलामृत यांचे पठण किंवा पारायण करावे. श्री गजानन महाराज यांच्या श्री गजानन विजय या ग्रंथाचे पठण किंवा पारायण करावे. शंकर महाराज, साईबाबा यांच्या ग्रथांचे पठण किंवा पारायण करावे. अगदी काहीच शक्य झाले नाही, तर दत्तगुरूंचे एक जपमाळ नामस्मरण करावे. दत्त जयंती या दिवशी दत्ततत्त्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत १००० पटीने कार्यरत असते. या दिवशी दत्ताची मनोभावे नामजपादी उपासना केल्यास दत्ततत्त्वाचा अधिकाधिक लाभ मिळण्यास साहाय्य होते, असे म्हटले जाते.
॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥
॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥