Dasnavami 2025: आज शनिवार आणि दासनवमीनिमित्त समर्थांनी लिहीलेल्या हनुमंताच्या आरतीचा भावार्थ जाणून घेऊ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 10:37 IST2025-02-22T10:37:03+5:302025-02-22T10:37:37+5:30

Dasnavami 2025: हनुमंताची आरती लिहिताना समर्थांनी वापरलेले शब्द त्यांचे शब्दसामर्थ्य आणि हनुमंताची कीर्ती प्रगट करतात.

Dasnavami 2025: Today, Saturday, let's learn the meaning of the Hanuman Aarti written by Samarth on the occasion of Dasnavami! | Dasnavami 2025: आज शनिवार आणि दासनवमीनिमित्त समर्थांनी लिहीलेल्या हनुमंताच्या आरतीचा भावार्थ जाणून घेऊ!

Dasnavami 2025: आज शनिवार आणि दासनवमीनिमित्त समर्थांनी लिहीलेल्या हनुमंताच्या आरतीचा भावार्थ जाणून घेऊ!

हनुमंताचे कार्य जेवढे अफाट तेवढेच त्याचे कार्य शब्दबद्ध करणारे समर्थ रामदास स्वामी यांचे शब्दही अफाट. म्हणूनच हनुमंताची आरती म्हणताना अनेकदा बोबडी वळते आणि नुसते जयदेव जयदेव म्हणत आरती पूर्ण केली जाते. परंतु, या आरतीतील अवघ्या दोन कडव्यांचा भावार्थ नीट समजून घेतला, तर ती पाठ होणे अवघड नाही.  आज शनिवार आणि दासनवमीनिमित्त आरतीचा भावार्थ जाणून घेऊया. 

सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी,
करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनी,
कडाडिले ब्रह्मांड धाके त्रिभूवनी,
सुरवर नर, निशाचर, त्या झाल्या पळणी।।१।।
जयदेव जयदेव जय श्रीहनुमंता,
तुमचेनि प्रसादे न भिये कृतांता।। धृ।।
दुमदुमली पाताळे उठला प्रतिशब्द,
थरथरला धरणीधर मानिला खेद,
कडाडिले पर्वत उडुगण उच्छेद,
रामी रामदासा शक्तीचा शोध ।।२।।

समर्थ रामदास वर्णन करतात-

मारुती स्वत:च्या सामर्थ्यानिशी लोकांचे रक्षण करण्यासाठी झेप घेत असताना त्याच्या तोंडातून हुंकार बाहेर पडला. त्यामुळे संपूर्ण पृथ्वी दोलायमान झाली. सागराच्या पाण्यावर उत्तुंग लाटा उसळल्या आणि त्या आकाशापर्यंत पोचून तिथेही खळबळ माजली. संपूर्ण ब्रह्मांड थरथरू लागले आणि तीनही लोकांमध्ये भीती उत्पन्न झाली. पंचमहाभूतांमध्ये खळबळ उडाली. देव, मानव, राक्षस या सर्वांना पळता भुई थोडी झाली. ।।१।।

अशा भीमकाय हनुमंता तुझा जयजयकार असो. तुझी कृपा असली, की कोणीही यमाला सुद्धा घाबरणार नाही. ।।धृ।।

सप्त पाताळांमध्ये प्रचंड आवाज झाला. त्याचा प्रतिध्वनी इथे भूमीवर पोहोचला. त्याचा त्रास होऊन पर्वताचासुद्धा थरकाप झाला. पर्वत कोलमडू लागले आणि सर्व प्राणीमात्रांवर मोठी आपत्ती आली. पक्ष्यांचा विनाशकाळ आला की काय अशी स्थिती उत्पन्न झाली. तुझ्याठायी असलेल्या अफाट शक्तीचे सर्व चराचराला आकलन झाले. परंतु, या शक्तीचा तू गैरवापर केला नाहीस हे महत्त्वाचे! ती सर्व शक्ती रामचरणी अर्पण केलीस आणि रामकार्यार्थ वापरली, यातच तुझ्या भक्ती आणि शक्तीचा गौरव आहे.

Web Title: Dasnavami 2025: Today, Saturday, let's learn the meaning of the Hanuman Aarti written by Samarth on the occasion of Dasnavami!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.