चातुर्मासातील पहिले भौम प्रदोष व्रत: ‘असे’ करा पूजन, महादेवांची अखंड कृपा; शुभच होईल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 14:09 IST2025-07-07T14:08:43+5:302025-07-07T14:09:08+5:30
Chaturmas Bhaum Pradosh Vrat July 2025: चातुर्मास सुरू झाला असून, पहिले भौम प्रदोष व्रत कसे कराल? व्रताचे महत्त्व अन् मान्यता जाणून घ्या...

चातुर्मासातील पहिले भौम प्रदोष व्रत: ‘असे’ करा पूजन, महादेवांची अखंड कृपा; शुभच होईल!
Chaturmas Bhaum Pradosh Vrat July 2025: मराठी वर्षात अनन्य साधारण असलेला चातुर्मास काळ सुरू झालेला आहे. देवशयनी एकादशीला श्रीविष्णू योगनिद्रेत जातात. त्यानंतर कार्तिकी एकादशीपर्यंत या सृष्टीचे पालन करण्याची जबाबदारी महादेव शिवशंकरांवर असते, असे मानले जाते. प्रदोष हे व्रत महादेवांना समर्पित असल्यामुळे चातुर्मासातील पहिले भौम प्रदोष व्रत अतिशय महत्त्वाचे मानले गेले आहे. भौम प्रदोष म्हणजे काय? प्रदोष व्रताचरण कसे करावे? कोणते उपाय उपयुक्त ठरू शकतात? जाणून घेऊया...
व्रत-वैकल्यांची रेलचेल असणारा चातुर्मासाचा काळ सुरू आहे. प्रत्येक महिन्यात त्रयोदशीला प्रदोष तिथी असते. या तिथीला शंकराच्या पूजनासाठी प्रदोष व्रत केले जाते. मंगळवारी प्रदोष तिथी असेल, तर त्याला भौम प्रदोष म्हटले जाते. प्रदोष हे शंकराला समर्पित व्रत असून, यामुळे मनोकामना पूर्ण होऊ शकतात. कुटुंबात सुख, समृद्धी वृद्धी होऊ शकते. शत्रूंपासून बचाव होऊ शकतो. यासह अनेकविध प्रकारचे लाभ प्राप्त होऊ शकतात, असे सांगितले जाते. तसेच या दिवशी केलेल्या व्रतामुळे कुंडलीतील मंगळ ग्रहाचा प्रतिकूल प्रभाव कमी होऊ शकतो, असे म्हटले जाते. मंगळवार, ०८ जुलै २०२५ रोजी भौम प्रदोष आहे.
भौम प्रदोष व्रत पूजा विधी
प्रदोष व्रत हे प्रदोष काळी म्हणजेच सायंकाळी दिवेलागणीला केले जाते. प्रदोष तिथीला शंकराचे पूजन केले जाते. काही पौराणिक उल्लेखानुसार, प्रदोष काळात शिव आणि पार्वतीची पूजा केल्याने संकटे दूर होऊ शकतात. प्रदोष व्रतामध्ये प्रदोष काळात म्हणजेच तिन्हीसांजेला, दिवेलागणीच्या वेळेला महादेव शिवाची पूजा केली जाते. शक्य असल्यास रुद्राभिषेक किंवा जलाभिषेक करावा. अनेक भाविक या दिवशी संपूर्ण दिवस उपास करतात. महादेवांची षोडषोपचार किंवा पंचोपचार पद्धतीने पूजा करावी. बेलपत्र, फुले अर्पण करावीत. धूप, दीप, नैवेद्य दाखवून आरती करावी. मनोभावे प्रसाद ग्रहण करावा. यानंतर महादेवांचे नामस्मरण, स्तोत्र पठण करावे, असे सांगितले जात आहे.
महादेवांच्या प्रभावी मंत्रांचा जप
प्रदोष व्रत काळात महादेव शिवशंकरांच्या प्रभावी मंत्रांचे जप करणे लाभदायक तसेच पुण्यफलदायी ठरू शकते, असे म्हटले जाते. 'ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र: प्रचोदयात्।' हा शिवाचा गायत्री मंत्र आणि 'ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् । उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॥' या मृत्यूंजय मंत्राचे पठण, जप अवश्य करावे, असे सांगितले जाते. महादेवांचे पूजन झाल्यानंतर शिव पंचाक्षर मंत्र 'ॐ नमः शिवाय'चा किमान १०८ वेळा किंवा यथाशक्ती जप करणे लाभदायक मानला जाते.
मंगळ दोषातून दिलासा देणारे भौम प्रदोष व्रत
भौम व्रत मंगळ ग्रहाशी संबंधित असल्यामुळे या व्रतामुळे मंगळ दोष दूर होतो आणि आर्थिक अडचणी दूर होऊन कर्जमुक्ती मिळते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. मंगळवारी प्रदोष असल्याने या दिवशी महादेवांच्या पूजेसह हनुमानाची पूजा, हनुमंतांचे नामस्मरण, स्तोत्र पठण करावे. हनुमंतांची उपासनाही मंगळ ग्रहाचा प्रतिकूल प्रभाव, मंगळ दोष यासाठी उपयुक्त ठरते, असे सांगितले जाते. तसेच धरणीगर्भसम्भूतं विद्युत्कान्तिसमप्रभम्। कुमारं शक्तिहस्तं च मङ्गलं प्रणमाम्यहम्॥, असा नवग्रह स्तोत्रातील मंगळाचा मंत्र आहे. ॐ अंगारकाय विद्महे शक्तिहस्ताय धीमहि तन्नो भोम: प्रचोदयात्॥, हा मंगळाचा गायत्री मंत्र आहे, शक्य असेल तर मंगळ ग्रहाच्या या मंत्राचे यथाशक्ती पठण करणे शुभ मानले गेले आहे. तसेच मंगळ ग्रहाशी संबंधित वस्तूंचे दान करणे लाभदायक ठरू शकते, असे म्हटले जाते.
॥ ॐ नमः शिवाय ॥
॥ हर हर महादेव ॥