Chaturmas 2024: चातुर्मास विशेष : रोज एक अभंग, भावार्थ आणि निरूपण : अवघा रंग एक झाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 16:43 IST2024-07-22T16:42:40+5:302024-07-22T16:43:11+5:30
चातुर्मासानिमित्त सुरु केलेल्या या उपक्रमात आपण संतांनी लिहिलेल्या अभंगांचे चिंतन करत आहोत.

Chaturmas 2024: चातुर्मास विशेष : रोज एक अभंग, भावार्थ आणि निरूपण : अवघा रंग एक झाला
इंद्रधनुष्याचे रंग किती? असे विचारल्यावर लहान मुलही सांगेल, सात! मात्र, सूर्याच्या एका पांढऱ्या रंगातून हे सप्तरंग तयार झालेले असतात ना? या शास्त्रीय उदाहरणाप्रमाणे परमार्थातही अनेक रंग दिसत असले, तरी त्यांचा मूळ रंग एकच आहे. त्याच्यापाशी येऊन सगळे धर्म, पंथ, जात येऊन मिळतात. तो रंग कोणता, तर संत चोखामेळा यांची पत्नी संत सोयराबाई म्हणतात,
अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग।
मी तू पण गेले वाया, पाहता पंढरीच्या राया।
नाही भेदाचे ते काम, पळोनी गेले क्रोध काम।
देही असूनी तू विदेही, सदा समाधिस्थ पाही।
पाहते पाहणे गेले दुरी, म्हणे चोख्याची महारी।
संत चोखामेळा आणि त्यांचे कुटुंब विठ्ठल भक्तीत एवढे रमून गेले होते, की तो भक्तीरंग एक झाला होता. सोयराबाई म्हणतात, तो रंग मी अनुभवला आहे, पाहिला आहे, ज्या रंगात खुद्द श्रीरंगही रंगून जातो. त्या भक्तीची गोडी मी अनुभवली आहे, जिथे सारे भेद लयाला जातात आणि सगळे जीव एका पातळीवर येऊन पोहोचतात. काम-क्रोधाला तिथे अजिबात थारा नाही. सगळी सृष्टी विठ्ठलमय होते आणि विठ्ठल देहात असनही सर्वत्र दिसू लागतो. तो आत आहे, तसा बाहेरही. त्याला पाहताना समाधि लागते. कामात असूनही मन त्याच्या चरणी लागते. काम हाच ईश्वर होतो. ही भावावस्था केवळ भक्तीरंगात अनुभवता येते.
सोयराबाईंचे सांगणे केवळ शब्दरचनेतून नव्हे तर तो अभंग ऐकताना क्षणोक्षणी जाणवते. गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांच्या दैवी आवाजात हा अभंग आजवर आपण कितीतरी वेळा ऐकला असेल. जणू काही त्यांच्या स्वरातून सोयराबाई आपला आनंद व्यक्त करतात, विठ्ठलचरणी समाधी अनुभवतात आणि श्रीरंगाबरोबर रंगून जातात, असा आपल्यालाही भास होतो.
या अभंगाला संगीतही किशोरीताईंनी दिले आहे. त्यासाठी त्यांनी भैरवी रागाचा वापर केला आहे. भैरवी रागात बारा सूरांचा वापर होत असल्याने बैठकीत हा राग सर्वात शेवटी गायला जातो. किशोरीताईंनी सदर अभंगासाठी या रागाची निवड अतिशय चपखलपणे केली आहे. सर्व रंगांची, भावनांची, काम-क्रोधाची जिथे सांगता होते, त्या विठ्ठल नामापायी लागताना सूरांचाही रंग एक व्हावा, हा त्यामागील विचार असू शकतो. त्यांच्या सात्विक स्वराने आपण तो एक रंग अनुभवतोही.
जिथे एकरूप व्हायचे आहे, तिथे द्वैत असून चालत नाही. हे द्वैत नष्ट व्हावे, असे वाटत असेल, तर सर्वार्थाने भगवंताला शरण गेले पाहिजे. तरच आपणही संत सोयराबाईंप्रमाणे 'अवघा रंग एक झाला' या शब्दांची अनुभूती घेऊ शकू.