Chanakyaniti: मुलींच्या पसंतीस उतरायचे असेल तर 'हे' तीन गुण पुरुषांना अंगी बाणावे लागतील! - आचार्य चाणक्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 14:42 IST2023-03-01T14:40:13+5:302023-03-01T14:42:12+5:30
Chanakyaniti : स्त्रियांना कोणती गोष्ट कधी आवडेल सांगता येत नाही, मात्र 'हे' तीन गुण हमखास त्यांच्या पसंतीस उतरतात हे नक्की!

Chanakyaniti: मुलींच्या पसंतीस उतरायचे असेल तर 'हे' तीन गुण पुरुषांना अंगी बाणावे लागतील! - आचार्य चाणक्य
चाणक्य नीतीमध्ये मनुष्य स्वभावाशी निगडित अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. चाणक्यनीती वाचली असता आचार्य चाणक्य यांनी किती बारकाईने विविध पैलूंचा अभ्यास केला आहे ते लक्षात येते. याठिकाणी लेखाचा विषय स्त्रियांना आकर्षून घेण्याचा मुद्दा नसून स्त्रीमन समजून घेणे हा आहे, ते लक्षात घेतले पाहिजे. त्यासाठी आचार्यांनी दिलेले मुद्दे समजून घेऊ.
व्यवहारात चोख : मुलांच्या तुलनेत मुली काटकसरी असतात. त्यांना उधळपट्टी करणारी मुलं सहसा आवडत नाहीत. व्यवहारात चोख असणारी व्यक्ती त्यांना जबाबदार आणि कर्तव्यदक्ष वाटते. अशा व्यक्तींवर मुली विश्वास ठेवतात. याउलट पाण्यासारखा पैसा खर्च करणाऱ्यांवर अविश्वास दाखवतात. म्हणून केवळ मुलींनी आपल्याशी बोलावे म्हणून नाही, तर आपल्या भवितव्याच्या दृष्टीने जमा खर्च हिशोब आणि गुंतवणुकीवर प्रत्येक पुरुषाने भर दिला पाहिजे!
चांगला श्रोता : प्रत्येकाला जशी बोलणारी व्यक्ती हवी असते तशी हक्काची ऐकणारी व्यक्तीही हवी असते. दरवेळी सल्ले उपयोगी पडत नाहीत, तर निमूटपणे ऐकून घेणारी व्यक्ती हवी असते, कारण भिंतीसमोर मन मोकळे करता येत नाही, तिथे व्यक्तीच हवी असते. पुरुषांना खोड असते पूर्ण ऐकून न घेता मध्येच बोलून विषय तोडण्याची! महिलांना या गोष्टीचा भयंकर राग येतो. त्यामुळे त्या अशा लोकांना टाळतात. मात्र जे पुरुष शांतपणे सगळं ऐकून घेतात, विश्वास संपादन करतात त्यांच्याशीच महिला मनमोकळेपणाने बोलतात.
प्रामाणिकपणा : समोरची व्यक्ती आपल्या विश्वासास पात्र आहे असे वाटेपर्यंत महिला पुरुषांशी बोलत नाहीत. पुरुषांच्या वागण्या बोलण्यात एकवाक्यता नसेल तर महिलांना ती व्यक्ती बोलण्यास योग्य वाटत नाही. महिला जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे आपले मन मोकळे करतात, त्याअर्थी त्यांनी त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास टाकलेला असतो, मात्र त्या विश्वासाला तडा देत समोरच्या व्यक्तीने त्यांच्याशी प्रतारणा केलेली त्यांना जराही सहन होत नाही. म्हणून पुरुषांनी त्यांच्यापासून कोणतीही गोष्ट न लपवता आहे ती परिस्थिती त्यांच्यासमोर ठेवली तर त्यांचा प्रामाणिकपणा महिलांना भावतो आणि असे पुरुष महिलांच्या विश्वासास पात्र ठरतात!
हे तीनही गुण प्रसिद्ध उद्योगपती नारायण मूर्ती आणि त्यांची पत्नी यांच्यात दिसून येतात, म्हणून त्यांची जोडी आदर्श जोडी मानली जाते. दोघांच्या संगनमताने संसार झाला तर मनुष्य शून्यातून विश्व उभे करू शकतो याचीही प्रेरणा त्यांच्या नात्यातून मिळते!