नववर्षातील पहिली संकष्ट चतुर्थी: बुधवारी गणेश पूजनाला विशेष महत्त्व; पाहा, महात्म्य, मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 14:55 IST2025-04-15T14:55:34+5:302025-04-15T14:55:57+5:30
Chaitra Sankashti Chaturthi April 2025: बुधवारी संकष्टी चतुर्थी येणे विशेष मानले गेले असून, या दिवशी गणपती पूजन करण्याला अनन्य महत्त्व असल्याचे सांगितले जाते. जाणून घ्या...

नववर्षातील पहिली संकष्ट चतुर्थी: बुधवारी गणेश पूजनाला विशेष महत्त्व; पाहा, महात्म्य, मान्यता
Chaitra Sankashti Chaturthi April 2025: हिंदू नववर्षाचा पहिला चैत्र महिना सुरू आहे. चैत्रात अनेक सण-उत्सव, व्रत-वैकल्ये उत्साहात साजरी केली जातात. चैत्र महिन्यात अनेक योग, राजयोग जुळून आले. या शुभ योगांमध्ये व्रत-वैकल्ये असल्याने याचे महत्त्व आणखी वाढले. संकष्ट चतुर्थीला मीन राशीत पंचग्रही योग जुळून आला आहे. तसेच काही राजयोगही जुळून आलेले आहेत. मराठी नववर्षाच्या पहिल्या चैत्र महिन्यातील संकष्ट चतुर्थी बुधवारी आली आहे. सर्वसाधारणपणे मंगळवार हा गणेश पूजनाचा वार मानला जातो. परंतु, बुधवारी केलेल्या गणेश पूजनाचे महत्त्व आणि महात्म्य अनन्य साधारण असते, असेही म्हटले जाते. बुधवारी संकष्टी चतुर्थी आल्याने या दिवशी नेमके काय करावे? जाणून घेऊया...
चैत्र संकष्ट चतुर्थी बुधवार, १६ एप्रिल २०२५ रोजी आहे. बुधवारी संकष्टी येणे आणि त्यादिवशी गणपती पूजन करणे हेही विशेष मानले गेले आहे. गणपती बाप्पा हे आबालवृद्धांचे आराध्य दैवत! तो समरांगणात अग्रस्थानी लढणारा, आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा, गोड-धोड आवडीने खाणारा, शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा असा देव आहे. प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य चतुर्थीला उपवास करून गणेशाची आराधना करण्याची परंपरा आदिकालापासून सुरू आहे. संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणाही करू शकते. प्रत्येक संकष्टीला गणेशभक्त आपापल्या परिने आणि पद्धतीने गणपती बाप्पाला भजत-पूजत असतात.
गणपतीला एक गोष्ट आवर्जून अर्पण करावी
कोट्यवधी गणेश भक्त या दिवशी उपवास करतात. या व्रताचरणामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफल देतो, असे मानतात. गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. संकष्ट चतुर्थीचे व्रत फार प्राचीन आहे. हजारो वर्षे हे व्रत भारतवर्षात निष्ठेने केले जाते. यातून या व्रताची थोरवी दिसून येते. परंतु, धकाधकीच्या आणि व्यस्त जीवनामुळे चातुर्मासातील पहिल्या आषाढ चतुर्थीला इच्छा असूनही व्रताचरण करता येईलच असे नाही. त्यामुळे या दिवशी बाकी काही जमले नाही, तरी गणपती बाप्पाला एक गोष्ट आवर्जुन अर्पण करावी, असे सांगितले जाते.
बुधवारी केलेल्या विशेष गणपती पूजन, भजन, नामस्मरणाला महत्त्व
महादेव आणि पार्वती देवींचा पुत्र गणेश प्रथमेश मानला गेला आहे. कोणत्याही कार्याची सुरुवात करताना प्रथम गणपती स्मरण केले जाते, हे सर्वश्रुत आहे. साधारणपणे मंगळवारी गणपतीचे विशेष पूजन, नामस्मरण करण्याला प्राधान्य दिले जाते. मात्र, बुधवारी केलेल्या विशेष गणपती पूजन, भजन, नामस्मरण यालाही अनन्य साधारण महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला वाणी, वाणिज्य, लेखन, कायदा आणि गणित यांचे कारक मानले गेले आहे. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध ग्रह कमकुवत असेल, तर बुधवारी गणपती बाप्पाची पूजा, नामस्मरण करणे लाभदायक ठरते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. गणपतीला प्रिय असलेल्या वस्तू अर्पण केल्याने बाप्पा प्रसन्न होतो, असे मानले जाते.
बुधवारी गणेश पूजनात बाप्पाच्या आवडता नैवेद्य अर्पण करा
गणपती बाप्पाला आवडणाऱ्या वस्तू, गोष्टी अर्पण केल्यास ते शुभ लाभदायक ठरू शकते, असे सांगितले जाते. गणपती पूजनानंतर गणपती बाप्पाला आवडणारे जास्वदाचे एखादे फूल वाहावे आणि लाडू किंवा मोदक यांचा नैवेद्य दाखवावा. लाडू किंवा मोदक नसतील, तर गोडाचा नैवेद्य दाखवावा, असे सांगितले जाते. तसेच गणपतीचा ‘ॐ गं गणपतये नम:’ हा मंत्र १०८ वेळा किंवा जितका शक्य असेल, तितक्या वेळा म्हणावा, असे म्हटले जाते.
बुधवारी गणेश पूजनात दुर्वा अर्पण करणे महत्त्वाचे
बुधवारी गणपतीला दुर्वा अर्पण करणे शुभ फलदायी मानले गेले आहे. या दिवशी २१ दुर्वांची जोडी अर्पण केल्याने गणपती प्रसन्न होतात आणि भक्तांना सुख-समृद्धी आणि बुद्धीप्रदान करतात, असे सांगितले जाते. धार्मिक पुराणांमध्ये गणपतीला बुद्धीचा देवता मानले गेले आहे. दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पाची पूजा पूर्ण होत नाही आणि पूजेचे पुण्यही लाभत नाही, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
|| गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया||