Chaitra Navratri 2024: चैत्र गौरीचे माहेरपण कसे करायचे? जाणून घ्या कुळधर्म आणि कुळाचार!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 12:23 PM2024-04-10T12:23:23+5:302024-04-10T12:24:30+5:30

Chaitra Navratri 2024: चैत्र शुद्ध तृतीयेला अर्थात ११ एप्रिल रोजी आपल्या देवघरातच चैत्र गौरीची पूजा करायची, ते अक्षय्य तृतीयेपर्यंत; या सोहळ्याबद्दल सविस्तर वाचा. 

Chaitra Navratri 2024: How to worship Chaitra Gauri? Know religion, culture and rituals! | Chaitra Navratri 2024: चैत्र गौरीचे माहेरपण कसे करायचे? जाणून घ्या कुळधर्म आणि कुळाचार!

Chaitra Navratri 2024: चैत्र गौरीचे माहेरपण कसे करायचे? जाणून घ्या कुळधर्म आणि कुळाचार!

महाराष्ट्रात चैत्र शुक्ल तृतीयेला सुवासिनी देवघरातल्या अन्नपूर्णेची गौर म्हणून वेगळे आसन देऊन स्थापना करतात व  महिनाभर तिची पूजा करतात. त्यानिमित्ताने सोयीनुसार चैत्रातील कुठल्याही मंगळवारी अथवा शुक्रवारी हळदीकुंकू समारंभ करतात. त्यावेळी घरी आलेल्या लेकी सुनांचे पाय धुतात. त्यांच्या हातांना थंडाव्याचे प्रतीक म्हणून चंदनाचा लेप लावून मग त्यावरून शिंपल्याचा वरचा शिरांचा भाग फिरवतात. यावेळी भिजवलेल्या हरभऱ्यांनी फळासह ओटी भरतात. वाटली डाळ आणि कैरीचे पन्हे हा या समारंभातील आतिथ्याचा एक भाग असतो. यावेळी 'गौरीचे माहेर' नावाचे एक गाणे आरतीत म्हटले जाते. चैत्रात गौरी तिच्या माहेरी येते. सगळे कौतुकसोहळे करवून घेते आणि अक्षय्यतृतीयेला परत सासरी जाते, असे मानून सारे विधी केले जातात. ज्योतिर्भास्कर जयंत साळगावर या सोहळ्याचे सुंदर वर्णन करतात...

चैत्रांगण : गौरीसमोर अथवा गौरीसाठथी घराबाहेरील अंगणात एका चौकोनात वेगवेगळ्या सुबक रांगोळ्या काढणे हीदेखील एक महत्त्वाची गोष्ट असते. या रांगोळीला चैत्रांगण असे म्हणतात. या रांगोळ्या चंद्र, सूर्य, गोपद्म, कासव, हत्ती, तुळशीवृंदावन, फेर धरून नाचणाऱ्या मुली, शंख, चक्र, गदा, स्वस्तिक, कमळ, लक्ष्मीची पावले, राधाकृष्ण अशासारखे ठराविक विषय, प्रतीक म्हणून रेखाटल्या जातात. रोज सकाळी अंगण सारवून अशा रांगोळ्या काढून त्यांना हळद, कुंकू, फुले वाहतात.

चैत्रांगणाच्या निमित्ताने रांगोळ्या काढण्याच्या प्रथेमुळे मुलींमधील, स्त्रियांमधील सुप्त कलागुणांना प्रकट होण्यास वाव मिळतो. रांगोळी हे मांगल्याचे प्रतीक आहे. त्यामुळे वातावरण अधिक मंगलमय होते. नेत्रदीपक रांगोळी रेखाटल्याचे स्त्रीमनाला समाधान मिळते. चैत्रांगण रेखाटताना तोच आनंद मनाला व्यापून टाकतो. वसंत ऋतूबरोबर बहरणारी चैत्रपालवी चैत्रांगणाच्या निमित्ताने स्त्रीमनालादेखील उल्हसित करावी, हा त्यामागता हेतू!

पूर्वी हळदीकुंकवासारखे समारंभ घराचा उंबरठा सहसा ओलांडू न शकणाऱ्या स्त्रियांना विरंगुळा मिळावा, समाजातील, गावातील इतर स्त्रियांशी परिचय व्हावा, ताणतणावातून थोडा विसावा मिळावा, नित्याच्या कामातून घटकाभर करमणूक व्हावी म्हणून अतिशय उत्साहाने केले जात. आता स्त्रिया अर्थार्जनासाठी घराबाहेरच्या जगात वावरत असल्या, तरी त्यांनाही अनेक व्याप ताप असतात. चिंता, काळजी असते. या चिंता, विवंचना काही काळ विसता याव्यात, तणाव हलके व्हावेत म्हणून आजही असे हळदीकुंकू समारंभ आवश्यक आहेत. अशा समारंभात सर्व स्तरातील स्त्रियांनी एकत्र आले पाहिजे. सर्वांशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित करण्याची संधी देणारा हा चैत्र नवरात्रीचा आनंदसोहळा आहे.

Web Title: Chaitra Navratri 2024: How to worship Chaitra Gauri? Know religion, culture and rituals!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.