Budh Pradosh 2023: आयुष्यातील अडथळे दूर व्हावेसे वाटत असेल तर करा बुध प्रदोष व्रत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2023 17:39 IST2023-09-26T17:39:38+5:302023-09-26T17:39:55+5:30
Budh Pradosha 2023: २७ सप्टेंबर रोजी बुध प्रदोष आहे आणि २८ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी; महादेवाची आणि बाप्पाची उपासना करण्याची दवडू नका संधी!

Budh Pradosh 2023: आयुष्यातील अडथळे दूर व्हावेसे वाटत असेल तर करा बुध प्रदोष व्रत!
प्रदोष म्हणजे दोषांचे निराकरण करणारा. प्रत्येक महिन्याच्या शुद्ध व वद्य पक्षातील प्रदोषकालयुक्त त्रयोदशीस प्रदोष असे म्हणतात. प्रदोषकाल हा साधारणपणे सूर्यास्तानंतर तीन घटी असतो. प्रदोष म्हणजे आध्यात्मिकदृष्ट्या पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये, मन, बुद्धी, अहंकार या तेरा तत्त्वांचा मेळ असलेली मायाविशिष्ट प्रकृती आणि त्रयोदशी यांचा मेळ आहे. किंबहुना या तेरा तत्त्वातील संचित मायामल निरस्त होण्यासाठी प्रदोषव्रताची योजना आहे.
२७ सप्टेंबर रोजी बुधवार असल्याने आणि त्रयोदशी आल्याने ही तिथी बुध प्रदोष (Budh Pradosh 2023) म्हणून ओळखली जाईल. वारानुसार जुळून येणाऱ्या प्रदोष तिथीला सोम, भौम, गुरु, शुक्र, शनी प्रदोष अशी नावे दिली जातात. आज बुध प्रदोष निमित्त पुढीलप्रमाणे करा प्रदोष व्रत! बुध प्रदोषामुळे आपल्या वैयक्त्तिक आयुष्यातील अडथळे दूर होऊन प्रगतीची वाट सुकर होते. म्हणून हे व्रताचरण फार महत्त्वाचे आहे.
प्रदोष व्रताचा विधी:
प्रदोष व्रताचा प्रारंभ शक्यतो उत्तरायणात करावा. प्रदोषव्रतादिवशी दिवसभर उपवास, शिवाची आराधना, स्तोत्रवाचन आणि प्रदोषकाली शिवपूजा व पारणा (उपासानंतरचे भोजन) असा क्रम असून दुसऱ्या दिवशी आवर्जून विष्णूपूजन केले जाते. या व्रतासाठी आदिमायेसह साक्षात शंकर ही अधिदेवता असून नाममंत्राने त्यांना आवाहन केले जाते. प्रदोषव्रतात उपवास हे मुख्य अंग असते. शास्त्रानुसार कोणताही उपवास आदल्या रात्री दुसऱ्या प्रहरापासून सुरू होत असल्यामुळे आदल्या रात्रीच्या प्रथम प्रहरात अल्पाहार घ्यावा. मुख्य व्रतादिवशी शक्यतो जलोपवास अर्थात पाणी पिऊन करावा. तो प्रकृतीस मानवत नसेल, तर रसोपवास म्हणजे गोरस किंवा फळांचा रस किंवा अल्प प्रमाणात फराळ करावा. उपास शक्य नसेल तर शिवपूजा अवश्य करावी.
प्रदोषव्रताचा अधिकार :
प्रदोषव्रताचा अधिकार सर्व जातिधर्माच्या व सर्व वयोगटाच्या स्त्रीपुरुषांना आहे. विशेषत: संबंधात अडथळे आलेल्या, संतती कुमार्गास लागलेल्या, कर्जाने पीडित झालेल्या, सर्व कर्मात हटकून अपयश येणाऱ्या लोकांनी आवर्जून प्रदोषव्रत करावे. जितके काटेकोर, विधीपूर्वक, श्रद्धापूर्वक अंत:करणाने हे व्रत केले जाते, तितके त्याचे अधिकाधिक फळ मिळते.
प्रदोष काळ : प्रदोष काळ हा सायंकालीन संधिप्रकाश अर्थात सूर्यास्ताचा काळ असतो. आज पंचांगानुसार सूर्यास्ताची वेळ सायंकाळी सात वाजताची असल्याने पावणे सात ते साडे सात या कालावधीत शिवाभिषेक, स्तोत्रपठण, शिवमंत्राचा जप अवश्य करावा.
महादेव ज्याप्रमाणे संकट काळातही स्थिर, शांत वृत्तीने परिस्थिती सांभाळतात, त्याप्रमाणे शिवपुजेने आणि विशेषतः प्रदोष व्रताने मन शांत होते आणि परिस्थितीला सामोरे जाण्याचे व त्यावर मात करण्याचे बळ मिळते.