ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी अनेक चमत्कार घडवून चैतन्यमयी आयुष्याचा दाखवला मार्ग!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 11:33 IST2025-02-08T11:33:23+5:302025-02-08T11:33:43+5:30
९ फेब्रुवारी रोजी गोंदवलेकर महाराजांची जयंती आहे, राम नामाचा जप देत जीवन राममय कसे करावे याचा आदर्श वस्तूपाठ त्यांनी घालून दिला.

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी अनेक चमत्कार घडवून चैतन्यमयी आयुष्याचा दाखवला मार्ग!
९ फेब्रुवारी, माघ शुक्ल पक्ष द्वादशी. ही तिथी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची जयंती म्हणूनही ओळखली जाते. हा दिवस अनेक ठिकाणी उत्सव रूपाने साजरा केला जातो. 'श्रीराम जय राम जय जय राम' या मंत्राचे मोठ्या प्रमाणात सामुहिक पठण केले जाते. गोंदवलेकर महाराजांच्या पश्चात इतक्या वर्षांनीही त्यांनी सुरू करून दिलेल्या सेवेत आजतागायत खंड पडलेला नाही. यावरुन महाराजांचा अधिकार किती मोठा होता, हे आपल्या लक्षात येईल. महाराजांचे कार्य एवढे मोठे आहे, की त्यांच्या पश्चातही आज जगभरात त्यांचे अनुयायी गुरुउपदेशाचे पालन करत आहेत. काय होते त्यांचे कार्य? जाणून घेऊया.
ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी लोकांना भक्तीमार्गाकडे वळवले. त्यासाठी नामस्मरणाचा महिमा सांगितला. ते म्हणत, `एका नामामध्ये भगवंताच्या दर्शनासाठी लागणारे सर्व गुण आहेत. जेथे नाम आहे तेथेच मी आहे. तुम्ही तुमच्यापाशी नाही, इतका मी तुमच्याजवळ आहे. मला हाक मारा की मी पुढे आहेच. तुम्ही सतत नाम घेत रहा म्हणजे तुम्हाला सोडून मला राहताच येणार नाही. मी निर्लेप नामामध्ये राहतो. तुम्ही निर्लेप, निर्विकल्प, नाम घ्या. माझ्या सहवासाची प्रचीती आल्यावाचून राहणार नाही. तुम्ही भगवंताचे नाम घ्यावे यापलीकडे मला कसलीच अपेक्षा नाही. नाम घेणे म्हणजे माझ्या हातात आपला हात देणे होय. अशा रितीने ज्याने माझ्या हातात आपला हात दिला, तो मी सरळ रामाच्या हातात नेऊन पोचवला.
मला रामावाचून दुसरा जिवलग कुणी नाही. एका नामावाचून मी आजपर्यंत कशाचीही आठवण ठेवली नाही. ज्याच्याजवळ भगवंताचे नाम आहे, त्याच्या मागे पुढे मी आह़े मी तुमच्याजवळ आहे. नामात एका आनंदाशिवाय दुसरे काही नाही. वेदांती ज्याला ब्रह्म म्हणतात त्याला भक्त नाम असे म्हणतात. नामाशिवाय जगात दुसरे सत्य नाही. नामाला सोडू नका. माझ्या गुरुंनी मला जग रामरूप बघायला सांगितले. ते तसे मी बघितले. मला तुम्ही सगळे रामरूप दिसता. जो मी सांगितल्याप्रमाणे वागेल त्याचे काम मी रामाचा हात धरून त्याच्याकडून करून घेईन. कारण रामानेच हे काम करायला मला सांगितले आहे.
महाराजांनी व्यसनाधीनांना व्यसनमुक्त केले. विषयासक्त व्यक्तींना ते मोठ्या प्रेमाने धडा शिकवित. रामनामाच्या सामर्थ्यावर मृत मुलगा जिवंत असल्याचे महाराजांनी दाखवून दिले. स्वत:च्या कर्तृत्त्वाने त्यांनी बोटीतील जीव वाचवले. पत्नीच्या पातिव्रत्याच्या पुण्याईमुळे व महाराजांच्या आशीर्वादाने दानधर्मी सावकार बांधलेल्या शिळीवरून उठून बसला. कित्येकांना मृत्यूसमयी त्यांनी आपल्या मांडीवर घेऊन उत्तम गती प्राप्त करून दिली. भूत पिशाच्चाने पछाडलेल्यांची पीडा दूर केली.
अशा चैतन्यमूर्ती गोंदवलेकर स्वामींना त्यांच्या जयंती निमित्त मन:पूर्वक अभिवादन!