ज्ञानेश्वर माउलींच्या परंपरेतील सत्पुरुष पावसचे स्वामी स्वरूपानंद महाराज यांची जयंती; वाचा कार्य 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 07:00 IST2025-12-16T07:00:00+5:302025-12-16T07:00:02+5:30

स्वामी स्वरूपानंदांच्या रचना खूप सुंदर आहेत. त्यांच्या सर्व अभंगांमधून त्यांचे उत्कट सद्गुरुप्रेम प्रकर्षाने जाणवते, त्यांच्या जयंतीनिमित्त साहित्याचा मागोवा!

Birth anniversary of Swami Swaroopanand Maharaj, the Satpurush Pavas in the tradition of Dnyaneshwar Mauli; Read the work | ज्ञानेश्वर माउलींच्या परंपरेतील सत्पुरुष पावसचे स्वामी स्वरूपानंद महाराज यांची जयंती; वाचा कार्य 

ज्ञानेश्वर माउलींच्या परंपरेतील सत्पुरुष पावसचे स्वामी स्वरूपानंद महाराज यांची जयंती; वाचा कार्य 

>> रोहन विजय उपळेकर

आज मार्गशीर्ष कृष्ण द्वादशी, पावसच्या स्वामी स्वरूपानंद महाराजांची जयंती !!

श्री.रामचंद्र विष्णू गोडबोले तथा स्वामी स्वरूपानंद यांचा जन्म मार्गशीर्ष कृष्ण द्वादशी, दि. १५ डिसेंबर १९०३ रोजी पावस येथे झाला. स्वामी स्वरूपानंद हे भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींच्या परंपरेतील सत्पुरुष, पुणे येथील श्री गणेशनाथ तथा बाबामहाराज वैद्य यांचे अनुगृहीत होते. त्यांच्यावर राजाधिराज श्री अक्कलकोट स्वामी महाराजांचीही कृपा होती. त्यांनी ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी या भगवान श्रीमाउलींच्या ग्रंथांचा सुलभ अभंगानुवाद केलेला असून, त्यांचे ते सर्व ग्रंथ खूप लोकप्रिय देखील आहेत. त्यांच्या अत्यंत मार्मिक व सुरेख अशा अभंगरचना 'संजीवनी गाथा' नावाने प्रसिद्ध झालेल्या आहेत. तरुणपणी पुण्यात विद्याभ्यास करीत असताना त्यांनी भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात हिरीरीने भाग घेतलेला होता. परंतु भगवंतांच्याच प्रेरणेने पुढे ते सर्व सोडून रत्नागिरी जवळ पावस येथे येऊन राहिले. येथेच त्यांचे सलग चाळीस वर्षे वास्तव्य होते. पावस सोडून ते कधीच बाहेर गेले नाहीत. आता तेथेच त्यांचे भव्य समाधी मंदिर बांधलेले आहे.

प. पू. गोविंदकाका उपळेकर महाराजांचा त्यांच्याशी अपार स्नेह होता. प. पू. गोविंदकाकांनी त्यांच्या 'हरिपाठ सांगाती' ग्रंथात स्वामींनी संकलित केलेल्या 'ज्ञानेश्वरी नित्यपाठ' या रचनेचा अंतर्भाव केलेला आहे. स्वामींच्या "उदारा जगदाधारा ... " या वरप्रार्थनेला स्वत: प.पू.काकांनी फार सुंदर चाल लावून काही भक्तांना शिकवली होती. पावसला म्हणतात त्यापेक्षा ही चाल वेगळी व अधिक भावपूर्ण आहे. स्वामी स्वरूपानंदांचे शिष्योत्तम स्वामी सत्यदेवानंद सरस्वती व स्वामी अमलानंद नेहमी फलटणला प. पू. श्री.काकांच्या दर्शनाला येत असत. प. पू. काका व स्वामी स्वरूपानंद हे दोघेही एकरूपच आहेत, असा दृष्टांत स्वामींच्या एका दिवेकर नावाच्या शिष्यांना झाला होता. ते दिवेकर पतीपत्नी फलटणलाही नेहमी दर्शनाला येत असत. प. पू. काका व स्वामी स्वरूपानंद आपल्या भक्तांना परस्परांच्या दर्शनाला मुद्दाम पाठवत असत. अशा अनेक भक्तांच्या विलक्षण हकिकती पू.काकांच्या आठवणींच्या संग्रहामध्ये नोंदवलेल्या आहेत. या दोघांचेही आराध्य एकच, भगवान श्री ज्ञानेश्वर माउली;  त्यामुळेही परस्परांची मैत्री अगदी दाट होती.

स्वामी स्वरूपानंदांच्या रचना खूप सुंदर आहेत. त्यांच्या सर्व अभंगांमधून त्यांचे उत्कट सद्गुरुप्रेम प्रकर्षाने जाणवते. " स्वामी म्हणे झाले कृतार्थ जीवन ।सद्गुरुचरण उपासितां ॥" असा आपला रोकडा स्वानुभव ते मांडतात. आपल्या नाथ सांप्रदायिक साधनेचे माहात्म्य सांगताना ते म्हणतात, "स्वामी म्हणे माझा नाथसंप्रदाय । अवघे हरिमय योगबळे ॥" त्यांची 'संजीवनी गाथा' साधकांसाठी खरेखरी 'संजीवनी'च आहे !

श्रीस्वामींनी श्रावण कृष्ण द्वादशीला, दिनांक १५ ऑगस्ट १९७४ रोजी पावस येथे देह ठेवला. त्या घटनेची माहिती प. पू. काकांनी फलटणला बसून सांगितली होती. दर्शनाला आलेल्या ती.अंबुताई फणसे यांनी पू.काकांना एक शाल घातली. त्याबरोबर पू.काका उद्गारले, " अगं, आत्ताच एका काळ्या पुरुषाने आम्हांला अशीच शाल पांघरली. " पू.काकांच्या गूढ बोलण्यातले संदर्भ कधीच पटकन् कळत नसत. ती.अंबुताईंना संध्याकाळी पुण्याला परत आल्यावर कळले की, जेव्हा हा प्रसंग फलटणला घडला, त्याच्या थोडा वेळ आधीच पावसला स्वामींनी देह ठेवला होता. पू.काका व स्वामी स्वरूपानंद या दोन्ही संतांची अंतरंगातील एकरूपताच या प्रसंगाने दृग्गोचर होते.

स्वामी स्वरूपानंदांचे व योगिराज सद्गुरु श्री गुळवणी महाराज व प.पू.मामासाहेब देशपांडे महाराजांचेही स्नेहबंध होते. पू.मामांची व त्यांची नेहमी ज्ञानेश्वरीच्या ओव्यांवर चर्चा चालत असे. कारण दोघेही रंगलेले ज्ञानेश्वरीप्रेमी व उत्तम सखोल अभ्यासकही होतेच. त्यांच्या ओव्यांवरील परस्पर चर्चा किती विलक्षण होत असतील, याची कल्पना करता येत नाही.

आज स्वामी स्वरूपानंद महाराजांच्या जयंतीदिनी, त्यांच्या अम्लान श्रीचरणीं सादर दंडवत  !!

Blog: http://rohanupalekar.blogspot.in )

Web Title : स्वामी स्वरूपानंद जयंती: ज्ञानेश्वर माउली की परंपरा के संत

Web Summary : पावस में जन्मे स्वामी स्वरूपानंद, ज्ञानेश्वर माउली की परंपरा के संत थे। उन्होंने माउली की रचनाओं का अनुवाद किया और भारत के स्वतंत्रता संग्राम में भाग लिया। उन्होंने चालीस वर्ष पावस में बिताए, जहाँ उनका समाधी मंदिर है। उनके भक्त अन्य संतों के साथ उनके गहरे संबंध और उनकी शिक्षाओं को याद करते हैं।

Web Title : Swami Swarupanand Jayanti: A Saint in Dynaneshwar Mauli's Tradition

Web Summary : Swami Swarupanand, born in Pavas, was a saint in the tradition of Dynaneshwar Mauli. He translated Mauli's works and participated in India's freedom struggle. He spent forty years in Pavas, where his समाधी मंदिर stands. His devotees remember his deep connection with other saints and his profound teachings.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.