Bhishma Ashtami 2023: पितृदोष निवारणाकरिता भिष्माष्टमीचे व्रत करतात, पण कसे? वाचा व्रत, विधी आणि धार्मिक महत्त्व!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2023 12:50 IST2023-01-27T12:49:34+5:302023-01-27T12:50:02+5:30
Bhishma Ashtami 2023: २८ जानेवारी रोजी भीष्माष्टमी आहे, यंदा रथसप्तमी आणि अष्टमी तिथी एकत्र आल्यामुळे सूर्योपासनेची सुवर्ण संधी अजिबात दवडू नका!

Bhishma Ashtami 2023: पितृदोष निवारणाकरिता भिष्माष्टमीचे व्रत करतात, पण कसे? वाचा व्रत, विधी आणि धार्मिक महत्त्व!
माघ शुद्ध अष्टमी ही तिथी भीष्माष्टमी म्हणून ओळखली जाते. कारण, या तिथीवर भीष्म पितामहांनी प्राणार्पण केले होते. त्यांच्या स्मरणार्थ हे व्रत केले जाते. भीष्म पितामहांना इच्छा मरणाचे वरदान होते, परंतु आपले तेवढे भाग्य नाही, म्हणून आपल्या वाट्याला येणारे मरण निदान विनासायास मिळावे आणि पूर्वजांच्या आत्म्याला सद्गती मिळावी म्हणून हे व्रत केले जाते.
भीष्माष्टमी व्रतामागची पौराणिक कथा:
महाभारताच्या युद्धात मृत्यू येऊनही अर्जुनाला सांगून भीष्म पितामहांनी शरशय्या बनवून घेतली. त्यांना इच्छा मरणाचे वरदान होते. ते जखमी झाले तेव्हा दक्षिणायन सुरु होते. उत्तरायण सुरु होण्यास काही दिवस बाकी होते. उत्तरायणात मरण आले असता सद्गती लाभते असे धर्मशास्त्रात म्हटले आहे. म्हणून त्यांनी माघ शुद्ध अष्टमीला सूर्याला वंदन करून प्राण सोडले. त्यानंतर भीष्म पितामहांना जशी सद्गती लाभली तशी आपल्याला आणि आपल्या पूर्वजांनाही लाभावी व पितृदोषातून आपली सुटका व्हावी म्हणून हे व्रत केले जाते. या दिवशी भीष्म पितामहांच्या स्मरणार्थ कुश, तीळ आणि पाण्याने श्राद्ध, तर्पण इत्यादी करणार्यांची पापे नष्ट होऊन त्यांना पितृदोषापासून मुक्ती मिळते, असे सांगितले जाते.
भीष्माष्टमी व्रताचा व्रत विधी :
या व्रतामध्ये फार काही करायचे नाही, फक्त भीष्मांचार्यांचे स्मरण करून सूर्योदयाच्या वेळी सूर्याला तीळ आणि पाण्याचे अर्घ्य द्यावे. सूर्यपूजा करावी. यात सातत्य ठेवले, अर्थात दर दिवशी ही उपासना केली तर निपुत्रिक लोकांना संततीची प्राप्ती होते. सूर्य उपासनेमुळे तेज, बुद्धी, शक्ती लाभते. सूर्योपासनेला सूर्यनमस्काराची जोड दिली तर काही काळातच आत्मविश्वास वाढतो.
भीष्म अष्टमी व्रताचा शुभ मुहूर्त :
माघ शुद्ध अष्टमी तिथी २८ जानेवारी रोजी शनिवारी सकाळी ८.४३ पासून रविवारी २९ जानेवारी सकाळी ९ वाजेपर्यंत असेल. मात्र सदर व्रत आपल्याला सूर्योदयाच्या वेळीच करायचे आहे
पितृदोषातून मुक्तता :
मृत्यू आपल्या हातात नसतो, पण तो भीष्म पितामहांच्या हातात होता. त्यांना जसे त्यांच्या इच्छे नुसार मरण आले आणि सद्गती लाभली तशी आपल्याही आत्म्याला मरणोत्तर तसेच पूर्वजांच्या आत्म्याला सद्गती मिळावी यासाठी हे व्रत करावे. धर्मशास्त्रात म्हटले आहे,
माघे मासि सिताष्टम्यां सतिलं भीष्मतर्पणम्।
श्राद्धच ये नरा: कुर्युस्ते स्यु: सन्ततिभागिन:।।
म्हणजे जो मनुष्य माघ शुक्ल अष्टमीला भीष्मासाठी तर्पण, जलदान इत्यादी करतो, त्याला सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते. यंदा रथसप्तमी आणि अष्टमी तिथी एकत्र आल्यामुळे सूर्योपासनेची सुवर्ण संधी अजिबात दवडू नका!