भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 04:38 PM2020-07-25T16:38:05+5:302020-07-25T16:45:05+5:30

माणूस केवळ भाकरीवर जगत नाही. जगण्यासाठी त्याला भावार्द्र  प्रेमाचा उबारा पाहिजे, जो शिष्याला गुरुपासून मिळतो..!

Bhavatitam Trigunarahitam Sadguru Tam Namami ..! | भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि..!

भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि..!

Next

- युवा कीर्तनकार ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी ( बीड, महाराष्ट्र ) 

( मागच्या ' तस्मै श्रीगुरवे नमः ' लेखात आपण गुरुच्या सहा प्रकारांची माहिती पाहीली, या  लेखांत आपण बाकी सहा प्रकारांची माहिती पाहूया..! ) 

७) स्पर्श गुरु तर परिसाप्रमाणे स्पर्शमात्रे करून शिष्याच्या जीवनात महान परिवर्तन घडवून आणतो. गुरूचा स्पर्श होताच गुरूची सर्व शक्ती शिष्यामध्ये संक्रमणीत होते, या प्रयोगाला शक्तिपात प्रयोग म्हणण्यात येते. गुरु स्वतःच्या शक्तीचा संचार शिष्यामधे करू शकतो पण त्याच्यासाठी पसंतीला पात्र बनणाऱ्या शिष्याच्या योग्यतेचे मूल्यांकन ही कमी ठरवता येणार नाही.

८) वात्सल्य गुरुच्या सहवासाने त्याच्या सर्व शक्तीचा संचार होत नसला तरी शिष्याला अशा गुरूची मदत व उबारा मिळतो, जो जीवन विकासात अतिशय उपयोगी आहे.

Man does not live by bread alone..!

माणूस केवळ भाकरीवर जगत नाही. जगण्यासाठी त्याला भावार्द्र  प्रेमाचा उबारा पाहिजे, जो शिष्याला गुरुपासून मिळतो.

९) कूर्म गुरूची कृपादृष्टी शिष्याच्या विकासाला कारणीभूत बनते. कासव जसे प्रेमळ नजरेने स्वतःच्या बालकांचे संवर्धन करते तशी कूर्म गुरूची मधुर दृष्टी शिष्यामध्ये प्रेम, शक्ती व तेजस्विता वाढवते.

१०) चंद्र गुरु दूर राहूनही शिष्याच्या जीवनात शीतलता व शांतीचे साम्राज्य स्थापन करतो. चंद्र जसा दूर राहूनही चंद्रकांत मण्याला पाझर फोडू शकतो तसा चंद्र गुरु स्वतःच्या प्रभावाने दूर असलेल्या शिष्याच्या जीवनातही परिवर्तन निर्माण करू शकतो.

११) दर्पण गुरु हा शिष्याला आत्मपरीक्षण करायला लावतो. दर्पणात पाहणे म्हणजे स्वतः च स्वतः ला ओळखण्याचा प्रयत्न करणे. दर्पणात पडणारे आपले प्रतिबिंब हा आपला खरा मित्र आहे. हा जर आपल्यावर नाराज असेल तर आपल्या जीवनातील शांती व स्वास्थ्य बिघडून जाईल. दर्पणात दिसणाऱ्या आपल्या जिवश्चकंठश्च मित्राला नाखूष करून प्राप्त केलेली समग्र विश्वाची प्रशंसा देखील कवडी मोलाची बनेल, तुच्छ ठरेल. प्रसिद्धीच्या शिखरावर पोचल्यानंतर माणसाने आत्मपरीक्षक बनून दर्पणासमोर उभे राहिले पाहिजे. त्याच्या आत असलेल्या आपल्या मित्राच्या डोळ्याशी डोळा भिडवताना जर आपण शरमिंदे बनत नसू तर आपण प्राप्त केलेली प्रसिध्दी ही प्रभूचा प्रसाद आहे, असे मानायला हरकत नाही.

Know thyself "तू स्वत:ला ओळख" आत्मज्ञानाकडे वळवणारे साॅक्रेटिसचे हे वाक्य दर्पणासमोर उभे राहिल्यानंतर वेगळ्याच संदर्भात समजले जाते. याप्रमाणे भौतिक, सांस्कृतिक किंवा आध्यात्मिक स्तरावर आपल्याला आपली स्वतःची खरी ओळख करवण्याची क्षमता दर्पण गुरुमधे असते.

१२) क्रौंच गुरु स्मरण मात्रेकरून शिष्याचे कल्याण साधू शकतो. क्रौंच पक्षाची मादी सहा सहा महिने दूर राहूनही स्वतःच्या अंड्यांचे पोषण करते. तसा हा गुरु देखील दूर असलेल्या परोक्ष स्मरण करून त्याच्या विकासात सहाय्यभूत बनू शकतो. शिष्य गुरूचे स्मरण करतो हा स्वाभाविक क्रम समजला जातो पण गुरु स्वतः शिष्याच्या स्मरणात स्वतः ला विसरुन जातो असा शिष्यही किती अनन्यनिष्ठ असला पाहिजे. भगवान भक्ताचे चिंतन करतो ह्यासारखे माधुर्य ह्यात आहे.

भारतात गुरुपरंपरा होती. ' मी कोणाचा तरी आहे. ' हा मधुर भाव त्यात आहे. ह्या भावनेत कृतज्ञता होती.
जनकाचे गुरु याज्ञवल्क्य होते तर शुक्राचार्यांचे गुरु जनक होते.

सांदीपनींचा शिष्य म्हणवून घेण्यात कृष्ण व सुदामा गौरव मानीत होते. विश्वामित्राची सेवा करण्यामध्ये राम व लक्ष्मण कधी थकत नव्हते.
वेद, उपमन्यू किंवा आरुणी ह्यांना धौम्य ऋषी गुरु लाभले, याबद्दल ते स्वतः ला धन्य समजत होते. द्रोणाबद्दल अर्जुनाच्या मनात असलेला नाजूक भावच त्याला युद्ध कर्तव्यात थोडा शिथिल बनवतो. परशुरामापासून ज्ञान प्राप्त करण्यासाठी कर्णाने खूप कष्ट घेतले. शुक्राचार्यांपासून संजीवनी विद्या प्राप्त करणाऱ्या कचाची ज्ञाननिष्ठा व गुरुभक्ती आजही आपल्याला नतमस्तक बनवते. गौडपदाचार्यांचे नाव येताच शंकराचार्य भावविभोर होत असत.
पाश्चात्य देशातही ' मी अमक्याचा शिष्य आहे ' असे मानण्यात गौरव  अनुभवतात. ' मी सॉक्रेटीसचा शिष्य आहे ' असे समजण्यात प्लेटो स्वतः ला कृतकृत्य समजत होता आणि ' प्लेटो माझा गुरु आहे ' असे सांगण्यात अॅरिस्टॉटल स्वतःचे जीवन धन्य समजत होता.

तर असे हे गुरूचे प्रकार अन् गुरु  परंपरा...!

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

( लेखक हे युवा कीर्तनकार आहेत, त्यांचा भ्रमणध्वनी 87 93 03 03 03 )

Web Title: Bhavatitam Trigunarahitam Sadguru Tam Namami ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.